एक फुगेवाला जत्रेमध्ये फुगे विकून उदरनिर्वाह करायचा. त्याच्याकडे लाल, निळे, पिवळे आणि हिरवे वगैरे विविध रंगांचे फुगे असायचे. विक्री कमी होऊ लागली की एखादा फुगा तो सिलिंडरमधून हेलियम वायू भरून हवेत सोडायचा. उंच उंच जाणारा फुगा बघून मुले फुगे घेण्यासाठी गर्दी करत आणि मग त्याचा धंदा परत जोरात सुरू होई. असे तो दिवसभर करत राही.
असंच एकदा फुगे विकताना फुगेवाल्याच्या लक्षात आलं की कोणीतरी आपलं जाकीट ओढतंय. त्यानं मागे वळून पाहिलं तर तिथं एक लहान मुलगा उभा होता. मुलानं त्याला विचारलं, “काका, काळ्या रंगाचा फुगा हवेत सोडला तर तोसुद्धा उडेल का?” मुलाच्या जिज्ञासेचं त्याला कौतुक वाटलं आणि मोठ्या प्रेमानं त्यानं उत्तर दिलं, “बाळ, फुगा रंगामुळं उडत नाही, तर त्याच्या आत जे काही आहे त्यामुळं तो हवेत उंचच उंच जातो.”
हीच गोष्ट आपल्या दैनंदिन आयुष्यालाही लागू पडते. आपल्या अंतरंगात जे काही असते त्यामुळे आपण उंचीवर जातो. अंतरंगातील ही गोष्ट म्हणजे आपला दृष्टिकोन, आपली मनोवृत्ती !
काही विशिष्ट व्यक्ती, संस्था किंवा देश हेच अतिशय यशस्वी का झाले असतील याचा तुम्ही कधी विचार केला आहे का?
खरं म्हणजे हे काही फार मोठं रहस्य नाही. यशस्वी ठरलेल्या लोकांच्या विचार करण्याच्या आणि काम करण्याच्या पद्धती अधिक प्रभावी असतात. उपलब्ध मनुष्यबळ हीच सर्वाधिक महत्त्वाची साधनसामग्री आणि तिच्या साह्यानंच कुठलंहीं काम प्रभावीपणे करता येते, ही गोष्ट त्यांनी ओळखलेली असते. व्यक्ती, संस्था किंवा देश हे यशस्वी होतात ते तिथल्या माणसांमुळे, त्यांच्या गुणवत्तेमुळे !
जगभर हिंडून मोठमोठ्या व्यापारी संस्थातील अधिकाऱ्यांशी या विषयावर मी चर्चा केली आहे. मी त्यांना नेहमी एक प्रश्न विचारत असे, “समजा, तुम्हाला एखादी जादूची कांडी दिली तर उत्पादनक्षमता आणि नफा वाढून बाजारपेठेवर वर्चस्व निर्माण व्हावे म्हणून तुम्ही जादूच्या कांडीकडे काय मागाल?” सर्वांचं एकच उत्तर होतं, “कर्मचाऱ्यांचा सकारात्मक दृष्टिकोन.”
काम करणाऱ्या लोकांचा दृष्टिकोन विधायक असेल, त्यांच्या मनात काम करण्याची खरीखुरी इच्छा असेल, तर ते मिळून मिसळून आपापलं काम करतील. वायफळ खर्च, नासाडी टाळतील. कामाबद्दलची निष्ठा बाळगतील आणि एकूणच सर्व संस्थेत मनापासून काम करण्याचं वातावरण किंवा मानसिकता निर्माण होईल.
हार्वर्ड विद्यापीठातील विल्यम जेम्स म्हणतात, “आजच्या काळात माणसाला एक मोठंच सत्य गवसलं आहे आणि ते म्हणजे आपल्या दृष्टिकोनात बदल करून आपले आयुष्यच माणूस बदलू शकतो.
आपला परिवार नागेबाबा परिवार
लेखक – अज्ञात
