आनंद देण्यात सुद्धा आनंद असतो….

शनिवार आणि रविवार म्हणजे जरा आरामाचा किंवा सर्व गोष्टी फूरसतसे..

 

सहज म्हटलं दोन दिवस जरा पुण्याच्या मित्रांना भेटून येऊया.

 

एकटाच माझी मारूती एस् क्रॉस गाडी घेऊन जरा लवकरच निघालो. मधे कुठेतरी नाष्टा करून जेवायला पुण्यात एका मित्राकडे दुपारच्या जेवायला पोहोचायचं.

 

माझी गाडी नवीनच , चकचकीत आणि उत्कृष्ट कंडीशन मधे. त्यामुळे ड्रायव्हिंगला पण मजा येत होती. बेलापूर रोडला पण फारसा ट्रॅफिक नव्हता. तरी पण मी आपला ताशी ५०-६० गतीने एकटाच ड्राईव्ह करत जात होतो. तुर्भे येथे थोडा ट्रॅफिक जाम होता. त्यामुळे हळूहळू चाललो होतो. तेव्हढ्यात माझं लक्ष माझ्या बाजूच्या एका जून्या फियाट कडे गेलं. लक्ष जायचं खरं कारण म्हणजे त्या गाडीत १०-१२ वर्षाची चार पाच मुलं खुपच दंगा करत होती. गाडीचा ड्रायव्हर म्हणजे त्याचा काका, याला सारखी गाडी पुढे न्यायला , फास्ट चालवायला प्रेरित करत होती. तो काका बिचारा आपली जूनी फियाट जमेल तशी चालवत होता. गाडी जुनी असल्याने आणि गाडीची कंडीशन यथा तथाच असल्याने , तो आपला आरामात चालला होता. पण खरा आनंद मुलांना गाडीतून फिरण्यात होता. मुलं सुद्धा आरडा ओरडा करत आनंदात , मजेत प्रवास करत होती. पण बिचा-या मुलांना त्यांची गाडी जुनी आहे याचं मात्र अजिबात भान नव्हते. मुलांना आपलं आपली गाडी इतर गाड्यांच्या पुढे जावी असं मनोमन वाटत होतं आणि तसं ती त्यांच्या काकाला सारखं सांगत होती.

 

खरं तर हळूच मलाही माझं बालपण आठवून गेलं..

 

तेव्हढ्यात ट्रॅफिक जाम सुटला आणि वाशीच्या पुढे सगळ्याच गाड्यांची गती वाढली.

 

मी आपली मुलांची मजा बघत जवळपास त्यांच्या बरोबरच चाललो होतो. मधेच मुलांची गाडी माझ्या चकचकीत गाडीच्या पुढे जात आहे हे पाहिल्यावर मुलांनी आरडा ओरडा करत आनंद साजरा केला. काका बिचारा आपल्या गतीने जात होता. मी आपला एक्सप्रेस हायवे लागल्यावर त्या गाडीला मागे टाकून पुढे निघालो. मला पुढे जाताना पाहून मुलांची आरडाओरड बंद झाल्याचं जाणवलं.

 

मी खोपोली टोलवर जरा खाली उतरलो आणि पाय मोकळे केले , पाणी प्यायलो आणि गाडीत बसून गाडी सुरू केली , तो पर्यंत या मुलांची गाडी आली आणि माझ्या पुढे गेली. माझ्या पुढे जाताना त्या मुलांनी आनंदोत्सव साजरा करत जो कल्ला केला तो अविस्मरणीयच होता. खरंच किती निख्खळ आनंद…

 

फियाट गाडी कंडीशन मधे नसल्याने ती माझ्या गतीने जाणार नाही हे नक्कीच होतं. मी पण त्यांच्या पुढे निघाल्यावर पुन्हा मुलांचा कल्ला थांबून जरा निराशा पसरल्याचं जाणवलं.

 

मला मनात आलं की या मुलांना आपण त्यांचा आनंद परत देऊया. मी खंडाळा फाट्यावर गाडी बाजूला लावली. ऊगीचच बाॅनेट उघडून ठेवलं आणि मुलांच्या गाडीची वाट पहात बसलो. खरंच पाचच मिनिटांत मुलांची गाडी आली. मुलांनी माझी गाडी बघीतली आणि जल्लोष केला. त्या गाडीचे ड्रायव्हर काकांनी पण थोडी गाडी पुढे बाजूला लाऊन माझ्याकडे येऊन अगदी अदबीने विचारले ,

 

” सर काही मदत करू का ? मी मेकॅनिक आहे . ”

 

मी त्याला म्हटलं ,

 

” अरे माझी गाडी नवी कोरी एकदम ठीक आहे. गाडीला काहीही झालेलं नाही ”

 

काकांनी विचारलं ,

 

” सर मग गाडी का थांबवली आणि बाॅनेट का उघडून ठेवलत ? ”

 

मी त्याला सहजंच म्हटलं ,

 

अरे मला तूझ्या मुलांचा रेस जिंकण्याचा आनंद , जल्लोष परत करायचा होता . आता मला तू आणि तूझ्या गाडीने हरवलं आहेस . मुलांना जाउन सांग आपण रेस जिंकलो आहेत. त्यांचा आनंद आणि जल्लोष मला परत ऐकायचा आहे. ”

त्याला सहजच विचारलं ,

 

” कुठे चालला आहात ? ”

 

काका म्हणाले ,

 

” मुलांना फिरायला बाहेर पडलो. आता लोणावळ्याला हाॅटेल आदर्श नाष्टा करणार आणि परत फिरणार. ”

 

मी त्याला सहजंच म्हटलं,

 

” चल मी पण येतो तूमच्या बरोबर नाष्टा करायला. ”

 

तो पुढे निघून लोणावळ्याला हाॅटेल आदर्श मधे रेस्टॉरंट मधे गेला. त्याच्या पाठोपाठ मी पण गाडी लाऊन रेस्टॉरंट मधे गेलो. मला बघितल्यावर मुलं एकदम जल्लोषात म्हणाली ,

 

” आम्हीच रेस जिंकली …… ! ”

 

मी पण हात वर करून कबूल केले की ,

 

” हो तूमचा काका उत्तम ड्रायव्हर आहे , म्हणून तूम्ही जिंकलात . ”

 

क्षणात त्या मुलांनी काकांच्या नावाने जल्लोष केला.

 

मी आपलं रेस्ट हरल्या बद्दल प्रत्येक मुलाला आइस्क्रीम दिलं आणि त्यांचा निरोप घेतला.

 

मी गाडी काढत होतो तेव्हा ते काका आले आणि हात जोडून म्हणाले ,

 

” सर तूम्ही देव माणूस आहात. स्वतः हारून मुलांना आनंद देण्यात स्वतःला कृतकृत्य समजलात. खरंच तूमचं मन खूप मोठं आहे. ”

 

 

खरंच …

आनंद देण्यात सुद्धा आनंद असतो

असा आनंद आयुष्यभर वेचत जावा….

 

 

 

 

 

आपला परिवार नागेबाबा परिवार

 

 

 

लेखक – मुकुंद सखाराम देवधर (982 060 1212)

 

error: Content is protected !!