कुठेतरी वाचलेली एक सुंदर गोष्ट आठवली. दोन प्रवासी रेल्वेने प्रवास करत होते… दोघांनाही एकाच ठिकाणी जायचे असल्यामुळे, बोलण्याबोलण्यामधुन ओळख झाली.
चार दिवसांनंतर जेंव्हा ते ठिकाण आले….त्यावेळी खाली उतरल्यावर त्यातील एक प्रवासी दुसऱ्याला म्हणाला,
“आपण चार दिवस एकत्र राहिलो. तुम्ही मला खरोखरच ओळखलंत का?”
दुसरा प्रवासी म्हणाला,“ नाही, मी ओळखलं नाही, परंतु आपण एकत्रच प्रवासात होतो, फक्त बोलणं झालं एवढं मात्र खरं…”.
त्यानंतर पहिला प्रवासी : “ साहेब , मी एक प्रसिद्ध चोर आहे पण तुम्ही माझ्यापेक्षा हुशार आहात… तुम्ही तर माझे गुरुच निघालात….!”
हे ऐकून दुसरा प्रवासी म्हणाला : “ कसं काय?”
पहिला प्रवासी : “ काहीतरी तुमच्याकडे सापडेल या आशेने मी चार दिवस तुमच्या सर्व पिशव्या, बॅग बघितल्या….पण काहीच मिळाले नाही….तुम्ही तर श्रीमंत वाटता पण तुमच्याकडे तर काहीच नाही ! तुम्ही पूर्णपणे रिकाम्या हाताने आला आहात की काय ?”
दुसरा प्रवासी म्हणाला “ माझ्याकडे एक मौल्यवान हिरा आणि सोन्याची नाणी आणि खर्चासाठी काही पैसे आहेत.” आणखी काय पाहिजे यापेक्षा दुसरं?
परत पहिला प्रवासी म्हणाला : “ मग खूप प्रयत्न करूनही मला ते का सापडले नाहीत?”
हे ऐकून हसत दुसरा प्रवासी बोलला “ मी जेव्हा कधी बाहेर जायचो, तेव्हा मी हिरा , नाणी आणि पैसे तुमच्या पिशवीत ठेवत असे, इतके दिवस तुम्ही माझी पिशवी शोधत राहिलात ! पण स्वत:ची कधी शोधण्याची तसदी घेतली नाही….. मग तुम्हाला काहीतरी सापडेल, अशी अपेक्षा कशी करायची ?
बोध
माणसाचं खऱ्या आयुष्यात यापेक्षा काय वेगळं आहे? “तुझं असुन तुजपाशी…परी तु जागा चुकलाशी ” अशी अवस्था होते. ईश्वर नेहमी आपल्या झोळीत आनंद ठेवतो, पण आपल्याला त्याकडे बघायला वेळ आहे कुठं? ज्या दिवशी आपण इतरत्र सुख, आनंद शोधणे बंद करू, तेव्हाच आपण समाधानी होऊ. स्वतःला ओळखा, विकसित करा मग बघा सुखच सुख…. आनंदच आनंद!
आपला परिवार नागेबाबा परिवार
लेखक – अज्ञात
