उसाचा रस आणि अननसाचा तुकडा

कालचीच गोष्ट. दुपारची वेळ. प्रवासातून येताना दुपारी काहीतरी खायला थांबलो. जिथे थांबलो तिथेच एक उसाचं गुऱ्हाळ होतं. खाल्ल्यावर छान उसाचा रस प्यावा म्हणून त्या गुऱ्हाळावर गेलो. एकाद दुसरं गिऱ्हाईक होतं. “एक बिनाबरफ फुल ग्लास द्या”. माझी ऑर्डर सुटली. त्याने त्याच्या खुळखुळणाऱ्या गुऱ्हाळाच्या यंत्राच्या खालच्या पोटखणातुन दोन छान ऊस काढले आणि ते यंत्रात घातले. उसाच्या रसाच्या चिळकांड्या उडाल्या आणि ते यंत्र त्या उसातून रस पिळून काढू लागलं. ते दोन ऊस त्या यंत्रातून काढल्यावर त्याने त्या उसाच्या चिपाडाचा अर्धा भाग केला आणि त्यात एक अर्ध्या लिंबाची फोड आणि एक अननसाचा तुकडा सरकवला आणि पुन्हा त्या यंत्रात ती उसाची चिपाडं सरकवली. मी उसाच्या रसात लिंबु घातलेलं या पूर्वी पाहिलं होतं पण अननसाचा तुकडा घातलेला मी प्रथमच पाहत होतो. मी त्याला त्याबद्दल विचारलं तेव्हा तो म्हणाला, साहेब लिंबू काय कोणी पण मिसळतंय, मग माज्या रसात वेगळं काय वो ?. ह्यो अननसाचा तुकडा घातला की माझ्या उसाच्या रसाला एक वेगळीच चव येती. तुमच्यासारख्या कुणी ‘जेंटलमेंट’ (Gentleman चा त्या गावाकडचा अपभ्रंश असावा) लोकांनला कायतरी पेशल देयाला पाहिजे नको काय? नायतर तुमी माज्याकडे पुन्हा लक्षात ठेऊन रस प्यायला याला काय?”

 

कोर्पोरेट जगात ‘कस्टमर सर्व्हिस’ वरून आता ‘कस्टमर डिलाईट’ कडे प्रवास सुरु आहे आणि हे शिकवण्यासाठी कार्यशाळांवर लाखो रुपये खर्च केले जातात. तेच ज्ञान या रसवाल्याने किती सोप्या शब्दात सांगितलं होतं. त्यावेळी मला अमेरिकेतल्या माझ्या पहिल्या बॉसने सांगितलेली गोष्ट आठवली. माझा बॉस मला म्हणाला होता, Rajendra, The difference between the Ordinary and Extraordinary is that little ‘Extra मला माझ्या बॉसचं म्हणणं मनापासून पटलं आणि तेव्हापासून मी माझ्या व्यावसायिकआणि वैयक्तिक कामात मी काय Little Extra घालू शकतो याचा मनःपूर्वक प्रयत्न करू लागलो. ते वाक्य त्या रसवाल्याकडे बघितल्यावर मला पुन्हा आठवलं आणि हेही लक्षात आलं की हे वाक्य केवळ कॉर्पोरेट मध्येच नव्हे तर अगदी रोजच्या जीवनात आपण करत असलेल्या लहान लहान गोष्टीत अमलात आणण्यासारखं आहे.

 

अर्थात, प्रत्येक कृती करत असताना त्यात ‘Little Extra’ घालण्यासाठी तो अननसाचा तुकडा कुठला हे ज्याने त्यानं प्रत्येकानं ठरवायचं.

 

 

 

 

आपला परिवार नागेबाबा परिवार

 

 

 

 

लेखक – राजेंद्र वैशंपायन

 

error: Content is protected !!