मानवजन्म ही एक शोधयात्रा आहे शोध कशाचा तर सत्याचा, शांतीचा आणि आत्मसाक्षात्काराचा.
या प्रवासात साधकाला अनेक प्रश्न पडतात , मी कोण? का आलो? आणि कुठे चाललोय?
या प्रश्नांची उत्तरं शोधताना जेव्हा तो थकून जातो, भरकटतो, निराश होऊ लागतो – तेव्हा त्याला गुरु भेटतो.
तो शब्दशः उत्तर देत नाही, पण शोधायची दिशा मात्र दाखवतो आणि मार्ग चुकल्यास पुन्हा साधकाला योग्य दिशेने नेतो.
ज्या क्षणी शिष्याचा अहं विरघळतो, त्या क्षणी साधकाच्या आयुष्यात गुरूंच खरं अस्तित्व प्रकट होतं.
हा मार्ग म्हणजे न थकता, न थांबता, गुरूकृपेवर पूर्ण विश्वास ठेऊन पुढे चालत राहणं हाच होय.
हा मार्ग सहनशीलतेचा, अंतर्मुखतेचा आणि प्रेमाचा असतो.
एकाला कठीण वाटतो तर दुसऱ्याला सोपा. पण त्यावर चालणाऱ्या साधकाला प्रत्येक क्षणी वाटतं — कोणीतरी माझ्यासोबत आहे.
तो कोणीतरी म्हणजे आपले गुरूवर्य श्री संत मनोहर मामा
ते त्यांच्या साधनेची, सिद्धींची, ज्ञानाची आणि अनुभवाची शिदोरी घेऊन आपल्या सोबत चालत असतात आणि जेव्हा ते आपल्या साथीला असतात तेव्हा तो मार्ग हा शाश्वत गुरुमार्ग होऊन जातो.
शाश्वत गुरुमार्ग हा:
बाह्य गोष्टींना मागे टाकतो,
अंतर्मनात शुद्धता निर्माण करतो,
मौनातून आत्मज्ञान प्रकट करतो.
यामध्ये ग्रंथ पुराण ह्या पुस्तकी ज्ञानापेक्षा श्रद्धा अधिक महत्त्वाची ठरते,
आणि आपल्या सदगुरूंची कृपा अखंड राहावी हीच साधकाची खरी साधना होऊन जाते.
शाश्वत गुरुमार्ग म्हणजे जीवाला – शिवा पर्यंत नेणारी अमोघ वाट.
|| गुरूवर्य श्री संत मनोहर मामा ||
आपला परिवार नागेबाबा परिवार
लेखक – प्रदीप परशुराम बुरकुल
