मी माझ्याच प्रेमात…

काल माझा सत्तरावा वाढदिवस मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. ‘हॉटेलात कशाला ? घरीच करुया की’, असं वगैरे मी काही म्हणत नाही. किती बिल आलं ? हे विचारण्याच्या भानगडीत मी पडत नाही. आजकाल घरातील प्रत्येक event खूप मजेत पार पडतो. काही टेन्शन नसते.

 

आता राज्य पुढच्या पिढीचे आहे.
आता फ्रंट सीटवर मुलगा सून बसले आहेत. जनरेशन गॅप भरपूर, त्यामुळे सर्वच पद्धती बदलल्या आहेत.

 

ते जे म्हणतात ते मी सहर्ष ऐकते. मी एक गोष्ट नक्की ठरवली आहे… जमाने के साथ चलो. नेहमी टीमचा मेंबर रहायचं.

 

कोणाला जेवायला बोलावायचे आहे तर आपण यावेळेस डेक्कनवरील त्या नवीन हॉटेलमध्ये जाऊ, असे मीच सुचवते. मग मुलांच्या सुविधेनुसार ते वेळ, जागा वगैरे ठरवितात आणि आम्ही दोघे तयार होतो.

 

आम्ही नवीन जगाशी adjust झालो आहोत.’आमच्या वेळेस’,एवढा खर्च कशाला?घरात नाही करता येत का ?काय सारखं बाहेर जेवायचं? कामाचा कंटाळाच आहे यांना’ या सर्व गोष्टी मी अजिबात बोलत नाही. रडगाणी गात नाही. काय गरज आहे याची!!

 

आजपर्यंत खूप कष्ट केले. खूप पैसे वाचविले.तो काळ वेगळा होता.पगार जेमतेम होते. येणारे जाणारे भरपूर असतं. तेव्हा या आधुनिक पद्धतीचे प्रचलन नव्हते आणि परवडणारे पण नव्हते.आता मजेत रहायला मिळतंय. घरात सर्व कामाला मावशी आहेत. On line बरीच कामं होतात. मग बिघडलं कुठे ?

 

पन्नास वर्षांपूर्वी जीवनाची परिभाषा आजच्या तुलनेत वेगळी होती. एवढे आधुनिक विचार नव्हते. मनोरंजनाची परिभाषा वेगळी आणि सीमित होती. नातेवाईकांचे घरी येणे, भरपूर दिवस राहणे, या सामान्य गोष्टी होत्या. लोन काढणे वगैरे गोष्टी नव्हत्या. अंथरूण पाहून पाय पसरावे ही गोष्ट मनावर एवढी बिंबवली होती की ती लक्ष्मण रेषा ओलांडायला हिम्मत लागायची. हॉटेलिंगची गणना मौजमस्तीमध्ये होत असे. एवढी चमकधमक ही नव्हती. एवढ्या सोयी सुविधा नव्हत्या. झोमॅटो, स्वीगीचा जन्म झाला नव्हता.

 

अर्धअधिक आयुष्य या परिस्थितीत गेलं. म्हणजे त्याचं मला अजिबात दुःख नाहीये. तेव्हा पण मी मजेतच होते. त्यावेळच्या परिस्थितीप्रमाणेच वागले. आता जबाबदारी संपली आहे, असं जरी मी म्हणत असले तरी अजूनही मी मुलांकडे, घराकडे लक्ष देतेच.

 

मी मनाशी एक पक्कं ठरवलंय…जुन्या गोष्टींचा पाढा वाचत बसण्यापेक्षा आताचे दिवस enjoy करायचे. तेव्हा आरशात स्वतःला बघायला वेळ मिळायचा नाही. आता माझा फोन नेहमी ‘सेल्फी मोड’मध्येच असतो. माझे माझे फोटो काढते आणि ‌आपल्याच नादात राहते.

 

स्वतःमध्ये रमता आलं की स्वतः पेक्षा बेस्ट option दुसरा काहीच वाटत नाही.

 

प्रेशर कुकर सारखं जगायचं. बाहेर कितीही आग लागू दे, आत कितीही प्रेशर असू दे,शिट्या वाजवत मजेत जगायचं… हे सगळं समजेपर्यंत बराच काळ निघून गेला.म्हणजे आयुष्याची सत्तर वर्षे संपली. त्यावेळी मोबाईल नव्हते. मोबाईल आल्यावरही माझ्या हातात येईपर्यंत वेळ गेलाच.

 

जसा काळ बदलत गेला, तसं माझ्या आजूबाजूचं रिंगण वाढत गेलं. अनेक गोष्टी समजत गेल्या. स्वतःचा आनंद कशात आहे हे आपल्यालाच शोधायचे असते, हे खूप उशीरा कळलं.

 

स्वतः कसं जगायचं? हे आपणच ठरवायचं असतं म्हणे, हे समजायला आणि पचायला बराच वेळ लागला. घरच्या, आजूबाजूच्या, आपल्याच माणसांमध्ये मी एवढी बिझी असायचे की मला ‘मी’ च शोधता आले नाही.

 

आपल्या साठी वेळ देणे हे चूक नाही, हा गुन्हा नाही, हे फार उशीरा कळलं.
मला चांगलं आठवतंय…. अजयचं लग्न झालं होतं तेव्हा त्याने अनिताला सांगितलं होतं की माझ्या आई बाबांनी माझ्यासाठी खूप कष्ट केले आहेत. माझ्या लहानपणी मी पैशाची चणचण बघीतली आहे. महागड्या वस्तू स्वस्त वाटेपर्यंत कष्ट करायचे आणि तसे पैसे कमवायचे हे मी तेव्हाच ठरवलं होतं. आई बाबांनी आणि मी शिक्षणावर पूर्ण लक्ष दिलं, त्यामुळे आज मी चांगल्या नोकरीत आहे.माझं असं अजिबात म्हणणं नाही की तू घरची कामं कर. तुम्ही दोघीही मजेत रहा.

 

अजय, अनिताने आमच्या दोघांचे दिवस पालटले. लग्नानंतर अजयला जेव्हा नवीन कार घ्यायची होती तेव्हा आम्ही त्याला सिक्स सीटर कार घे, म्हणजे अनिताचे आईबाबा पण आपल्याबरोबर बाहेर येऊ शकतील, असा सल्ला दिला. आज बरेचदा आम्ही सर्व एकत्र बाहेर जातो. दोन्हीकडच्या आई बाबांना मुलं छान सांभाळतात.

 

आधी TV, आणि नंतर मोबाईलमुळे आज जगण्याची दशा, दिशा, गती सर्वच बदललंय. विचारांमध्ये तर क्रांतीच आली आहे.

 

आज ज्येष्ठांसाठी आपले शौक, आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. वाचक मंच, जेष्ठ नागरिक संघ, अनेक गोष्टी आहेत.

 

पुढच्या पानावर काहीतरी भारी लिहिलं असेल या विचाराने मी रोज एक पाऊल पुढे टाकते. फार विचार करत बसत नाही. कोणी सोबत येणार असेल तर “With you” नाही तर “Without you” असा सरळ सोप्पा हिशोब ठेवते.

 

सध्या मी माझ्याच प्रेमात आहे. मस्त बिनधास्त जगतेय. कारण आता एक लक्षात आलंय…. शेवटी रोजचे खात्यात जमा झालेले १४४० मिनिटे मी कसे घालवायचे हे माझं मलाच ठरवायचं आहे.

 

 

 

 

आपला परिवार नागेबाबा परिवार

 

 

 

लेखिका – संध्या बेडेकर.

 

error: Content is protected !!