ताटात वाढलेलेलं भविष्य

ती पहाटेची वेळ… सुमारे पाच वाजता
सगळी गल्ली कॉलनी अजूनही गाढ झोपेत असायची. आणि मी मात्र माझ्या घराच्या गॅलरीत फेरफटका मारत असायचो.
पेपरवाला द्देखील याच वेळेला सायकलच्या घंटीबरोबर माझ्या दारासमोरून जायचा, आणि दरवेळी म्हणायचा,
“नमस्कार सर !”

 

हळूहळू वेळ बदलत गेली आणि माझी दिनचर्याही.
आता मी सकाळी सातला उठू लागलो.
कदाचित काही दिवस मी त्याला न दिसल्याने चकित झाला असेल.
एक रविवार, तो सकाळी नऊ वाजता माझ्या घरी आला. चेहऱ्यावर काळजी होती, पण बोलण्यात आदर.

 

“सर,” त्याने हात जोडत सांगितले,
“एक गोष्ट सांगू का?”

 

मी हसून म्हटले,
“नक्की, सांगा.”

 

तो म्हणाला,
“तुम्ही सकाळी लवकर उठणं का बंद केलंत?
मी रोज एसटी स्टँड वरून सर्वात आधी तुमच्यासाठी पेपर उचलतो आणि विचार करतो, सर वाट पाहत असतील’.
म्हणून सर्वात आधी तुमचंच घर गाठतो.”

 

मी थोडासा आश्चर्यचकित झालो:
“तू एवढ्या लांबून येतोस?”

 

“हो सर, तिथूनच वृत्तपत्र किंवा पेपरच वितरण सुरू होतं.”

 

“मग तू झोपेतून किती वाजता उठतोस?”

 

“पहाटे साडेतीन वाजता. सव्वा चार पर्यंत तिथे पोचतो.
सातपर्यंत सर्व पेपर वाटून घरी जातो, थोडा वेळ झोपतो आणि मग दहाला दुसऱ्या कामावर निघतो…
सर! मुलं मोठी करायची आहेत, शिकवायचं आहे… करावंच लागतं.”

 

त्याचं समर्पण ऐकून मी निशब्द झालो.
फक्त एवढंच म्हणू शकलो,
“ठीक आहे, मी तुझी गोष्ट लक्षात ठेवीन.”

 

काही वर्षे लोटली…

 

पंधरा वर्षांनंतर, तो पुन्हा एके सकाळी माझ्या घरी आला.
हातात एक सुंदर आमंत्रणपत्रिका होती.
“सरजी! मुलीचं लग्न आहे… सगळ्यांसह जरूर मुलीच्या लग्नाला या. सर्वांनी लग्नाला यायचं बर का”

 

मी लग्नपत्रिका पाहिली…
एक डॉक्टर मुलगी, एक डॉक्टर जावई.

 

आश्चर्याने विचारलं,
“तुझी मुलगी?”

 

तो हसला, आणि म्हणाला:
“काय बोलताय सर! हो, माझीच मुलगी. तीने एमबीबीएस केलंय. आणि जावईही एमडी आहे. दोघेही डॉक्टर आहेत.
आणि मुलगा? तो इंजिनीअरिंगच्या शेवटच्या वर्षात आहे.”

 

त्याचा साधेपणा आणि यश बघून काही क्षण मी स्तब्ध झालो.

 

“आता निघतो, सर … अजून खूप लग्नपत्रिका वाटायच्या आहेत.”

 

तो गेला…
पण माझ्या मनात एक वेगळंच भावचक्र सुरू झालं होतं.

 

———————————————————-

 

दोन वर्षांनंतर तो पुन्हा भेटला.

 

“मुलगा आता जर्मनीमध्ये एका मोठ्या कंपनीमध्ये काम करतोय,” गले लठ्ठ पगाराचे पॅकेज लाखोच्या घरात भेटल,असं अभिमानाने सांगितलं.

 

मी थोडं कुतूहलाने विचारलं,
“इतक्या मर्यादित उत्पन्नात हे सगळं कसं शक्य झालं?”

 

तो सौम्य हसला आणि म्हणाला:
“सरजी! पेपर वाटण्याबरोबरच इतरही काहीतरी करत राहिलो.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे खर्चावर काटकसर.
जे स्वस्त, जे हंगामातलं.. तेच खात होतो.
कधी कधी फक्त दोडका, भोपळा, वांगी…”

 

थोडा थांबला, मग हळूच म्हणाला:

 

“एक दिवस मुलगा ताट पाहून रडला. म्हणाला,
‘रोज हीच कोरडी भाजी! दुसऱ्यांच्या घरात काय काय बनतंय बघा.’

 

मी त्याच्याजवळ गेलो, त्याचे अश्रू पुसले आणि म्हटलं,
‘बाळा, आधी स्वतःचं ताट पाहा.
दुसऱ्यांची ताटे पाहशील, तर स्वतःचंही हरवून बसशील.
ही कोरडी भाजी नाहीये,
या ताटात मी तुझं भविष्य वाढतोय…
त्याचा अपमान करू नकोस.’

 

तो माझ्या डोळ्यांत पाहत राहिला, हसला… आणि चुपचाप सगळं खाल्लं.
त्या दिवसानंतर त्याने कधीही तक्रार केली नाही.”

 

 

————————————————————————-

 

आज, ही आठवण शब्दांमध्ये उतरवत असताना,
माझं मन विचारात गुंतून जातं…

 

 

आजकालची मुलं, आपल्या पालकांची परिस्थिती न समजता,
ती प्रत्येक गोष्ट मागतात जी दुसऱ्यांकडे असते.
कोण त्यांना समजावेल,
की कधी कधी कोरड्या ताटातही
पूर्ण भविष्य वाढलेलं असतं…
फक्त डोळ्यांत पाहण्याची दृष्टी लागते…!🌹🙏

आणि.. माझ्या ओठातून शब्द पुटपुटले.. सलाम त्यांच्या कार्याला

 

 

 

 

 

 

 

 

 

आपला परिवार नागेबाबा परिवार

 

 

 

 

 

 

 

लेखक – अज्ञात

error: Content is protected !!