मला वाटलंच होतं

एका रात्रीत यशस्वी होणाऱ्या व्यक्ती निराळ्या आणि बोटावर मोजण्याइतक्याच असतात. एखादी यशस्वी व्यक्ती नजरेत भरते ती त्याने मिळवलेल्या यशामुळे. पण जेव्हा ती अयशस्वी असते, परिस्थितीने गांजलेली असते तेव्हा आजूबाजूच्या तथाकथित यशस्वी किंवा काही करून दाखवलेल्या लोकांकडून हीन वागणूकच दिली जाते. हा या दुनियेचा रिवाजच आहे जणू.
परिस्थितीने गांजलेल्या किंवा व्यवस्थेकडून नाकारले गेल्यानंतर स्वतःच्या बळावर जेव्हा व्यक्ती निखळ यश मिळवते तेव्हा ऐकू येणारा स्वर असतो तो म्हणजे “मला वाटलंच होतं.’
याचे उत्तम उदाहरण म्हणजे महानायक अमिताभ बच्चन, ऑल इंडिया रेडिओमध्ये त्यांच्या आवाजाची चेष्टा करून त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला होता तेच अमिताभ बच्चन महानायक आहेत. अनेकांचा आदर्श आहेत. त्यांनीच नंतर चित्रपटसृष्टीवर राज्य केले. याच महानायकाबरोबर काम करण्याची संधी मिळावी म्हणून अनेकजण दुवा करतात. आज त्यांचा आवाज कुठे नाही ऐकला जात, त्यांच्यासारख्या आवाजाची कितीतरीजण नक्कल करतात. कितीतरी जण आवाजाला त्यांच्या सारखा बेस यावा म्हणून धडपडतात. आजही त्यांच्या आवाजातल्या शेरोशायरी, कवितांची लोकांना भुरळ पडते. आजही हा महानायक लोकांच्या मनावर राज्य करतो आहे मात्र त्यांच्या धडपडीच्या काळात त्याला बोल लावणारे, दोष दाखवणारे भेटलेच होते. त्यांनी सिल्व्हर ज्युबिली चित्रपट द्यायला सुरुवात केल्यानंतर मग मात्र मला वाटलंच होतं की हा चित्रपटसृष्टी गाजवणार असे म्हणणारे तेच लोक होते, ज्यांनी त्यांना कमी लेखले होते.
मी स्वतः अशाच लोकांचा आभारी राहिलो आहे. परिस्थितीने ग्रासले होते तेव्हा लोकांनी मानहानीची वागणूक दिली ती सहन केली. जवळच्या लोकांनी तू काय करणार म्हणत लायकी काढली. तेव्हा अंतःकरणातून आवाज आला की ‘स्वतःला सिद्ध करायची हीच वेळ आहे’. बुडाला आग लागली की रॉकेट वेगाने आकाशात झेपावते. स्वतःच्या आत डोकावून पाहिले. शांतपणे बसून आपल्याकडे काय आहे, काय कमतरता आहे ते जाणून घेतले, स्वतःच्या क्षमता विचारात घेतल्या. तेव्हा लक्षात आलं की वक्तृत्वकला, लेखनकला व महापुरुषांचे विचार गाठीशी आहे. मग हळू हळू लिहू लागलो, लोकांसमोर विचार मांडू लागलो. त्यासाठी अभ्यास करू लागतो. अनेक प्रकारचे प्रशिक्षण घेतले, त्यासाठी पैसेही खर्च केले. माध्यमामध्ये शिरकाव केला, लोकांना प्रोत्साहन देणारे, प्रेरणा देणारे लेख लिहू लागलो. स्तंभलेखन सुरू झाले.
हळूहळू लोक ओळखायला लागले, मग चॅनेलवर मुलाखती झाल्या.
प्रेरणा देणारी, लोकांना जीवनाची दिशा दाखवू शकणारी पुस्तके लिहिली, ती भरपूर खपली. मनाची मशागत पुस्तकाला तुफान प्रतिसाद मिळाला, त्यातूनच लोकांची मन परिवर्तन करण्याची गरज भासली. त्यातून महाराष्ट्रभर ‘माईंड पॉवर’ या विषयावर कार्यशाळा सुरू झाल्या. सामान्य माणसांपासून ते पोलिस, लष्करी अधिकारी यांच्यासाठी कार्यशाळा घेऊ लागलो. तेव्हा सरकारी दिव्याची गाडी न्यायला येते. दिव्याच्या गाडीत मागे बसून जाताना लोकांच्या नजरेस पडू लागलो. आधी नावे ठेवणारी, लायकी काढणारी लोकं कार्यक्रमात भेटू लागली. मुलाखती, बातम्या वाचू लागली. जेव्हा प्रत्यक्ष भेटू लागली तेव्हा तीच निंदा करणारी माणसे म्हणू लागली, ‘आम्हाला वाटलंच होतं की तू काही मोठे काम करशील.’
आणि माझ्या डोळ्यासमोर तो काळ असतो जेव्हा हेच लोक तू काय करणार अशी माझी लायकी काढत होते. त्यामुळेच प्रत्येकाने स्वतःला सिद्ध करायला हवे, त्यासाठी कौशल्य वाढवा, कर्तृत्व सिद्ध करा. मग पहा निंदेकरी कधी तुमचे चाहते होतील तुम्हालाच कळणार नाही.

“बहोत मुश्किल है उस शक्स को गिराना, जो ठोकर खाकर चलना सीखा है ।”

 

आपला परिवार नागेबाबा परिवार

-डॉ. दत्ता कोहिनकर

(सुखाचा पासवर्ड या पुस्तकातून)

error: Content is protected !!