आपले विचार आपल्याला घडवतात हा विचार बहुतांश तत्त्वज्ञानात मांडला गेला आहे, मग ते भारतीय तत्त्वज्ञान असो किंवा पाश्चिमात्य तत्त्वज्ञान असो. स्वर्गीय सद्गुरू वामनराव पैंदेखील त्यांच्या अनुयायांना “तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार” हाच मंत्र देत होते आपल्याही सर्व जीवनदर्शी तत्त्वज्ञानांमध्ये हेच सांगितले आहे की जसे तुमचे विचार तशी तुमची घडण.
मानसशास्त्रीयदृष्ट्याही याला दुजोरा दिला जातो. कारण विचार हे आपल्या मेंदू आणि मनात तयार होतात. अनेक मानसशास्त्रीय आजार मेंदूतल्या याच विचारांमुळे जडतात. सध्या याविषयी बराच अभ्यास झाल्यानंतर त्याच्यावर उपचार केले जातात. मात्र नैराश्य, चिंता या सर्व गोष्टी आजाराचे रूप धारण करण्यामागे विचार हेच प्रमुख कारण असते. आपण जसा विचार करू तसे घडू शकते, त्यामुळे सकारात्मक विचारांना जागा देणे हे शिकलो तर आपल्या जीवनात बदल घडू शकतात.
एक उदाहरण पाहूया. अमेरिकेत एका कैद्याला मृत्युदंडाची शिक्षा द्यायची असते. त्याच्यासमोर एका पिसाळलेल्या कुत्र्याला विषारी इंजेक्शन देण्यात आले, तो कुत्रा तडफडून मेला. मृत्युदंडाच्या शिक्षेची वाट पाहणाऱ्या या कैद्यासमोरच हे सर्व घडत असल्याने त्याच्या मनात त्या इंजेक्शनविषयीचे विचार सुरू झाले होते. त्यानंतर कैद्याला तिथेच ग्लुकोजचे साधे इंजेक्शन दिले. मात्र दोन तासातच तो मृत्युमुखी पडला व पोस्टमार्टममध्ये त्याच्या शरीरात विषनिर्मिती झालेली दिसून आली. याचे कारण सरळ होते की त्या कैद्याने आपल्यालाही विषारी इंजेक्शन दिल्याची कल्पना केली होती आणि त्यातून ग्लुकोजच्या इंजेक्शननंतरही त्याच्या शरीरात विषारी स्त्रावांची निर्मिती झाली. त्यामुळे त्याच्या हृदयावर ताण येऊन त्याचा मृत्यू ओढवला होता. खरेतर ग्लुकोज हे ऊर्जा वाढवणारे असते, परंतु कैद्याच्या बाबतीत मात्र उलट झाले होते कारण कैद्याचे विचार विषारी इंजेक्शनविषयी होते त्यामुळे ग्लुकोजचे इंजेक्शन देऊन त्याला ऊर्जा मिळण्याऐवजी तो ऊर्जाहीन म्हणजेच एनर्जीलेस झाला.
आपल्या भारतीय तत्वज्ञानाप्रमाणे बौद्ध तत्त्वज्ञानात बुद्ध म्हणतात,
What you think you become What you feel you attract What you imagine, you create
मध्यंतरी माझ्या वाचनात ‘द अल्केमिस्ट’ नावाचे पुस्तक आले होते. जगप्रसिद्ध ब्राझिलियन लेखक पाऊलो कोएलो यांनी लिहिलेले हे पुस्तक. त्याने गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये विक्रमी खपाचे पुस्तक म्हणून जागा मिळवली आहे. कोणत्याही खजिन्याच्या शोधात बाहेर कशाला फिरावे, तो आपल्यापाशीच असतो असा सर्वसाधारण पुस्तकाचा गाभा आहे. यातला आपल्यापाशी असणारा खजिना कोणता तर आपले सकारात्मक विचार. विविध प्रतीके, शकुन म्हणजे निसर्गाचे संदेश पारखून आपण वाटचाल केली तर आपली स्वप्नं सत्यात येऊ शकतात हेच या पुस्तकातून सांगितले आहे. म्हणजे काय तर आपली स्वप्नं साकार करताना सकारात्मक विचार करायला हवा. सकारात्मकता ही फक्त विचारांमध्ये नसते तर ती वर्तणुकीत, भावनांमध्ये, बोलण्यामध्ये, प्रत्यक्ष अनुभवांमध्ये, घटना, व्यक्ती, संवाद या सर्वामध्ये असते. थोडक्यात, आपण जितके सकारात्मक विचार करू तेच आपल्याला मिळते. आला दिवस जातो तसेच परिस्थितीही बदलणार असते. दिवसामागून रात्र येते त्याचप्रमाणे आनंदामागे नैराश्य, दुःख येते. आपण विचारांच्या माध्यमातून परिस्थितीला सामोरे गेलो तर दुःखाची परिस्थिती फार काळ टिकू शकणार नाही.
आपल्या स्वप्नांचा पाठलाग करताना एकदाही मनात नकारात्मक विचार आणू नका, सातत्याने सकारात्मक विचार ठेवा. बोलताना सकारात्मक बोला, स्वप्न साकार झाले असेच स्वप्न पहा. ‘लॉ ऑफ अट्रॅक्शन’ हा विश्वाचा नियम समजून घ्या. विश्व आपल्या सर्व भावना ऐकते तर तेव्हा नकारात्मक तरंग पाठवण्याऐवजी सकारात्मक तरंग पाठवले तर आपले स्वप्न साकार व्हायला वेळ लागणार नाही.
आपला परिवार नागेबाबा परिवार
-डॉ. दत्ता कोहिनकर
(सुखाचा पासवर्ड या पुस्तकातून)
