तीन-चार वेळा भेटून घ्या

प्रशांत माझ्या मित्राचा मुलगा त्याला आम्ही विवाहासाठी मुलगी पाहत होतो. प्रशांतला एक अधिकारी मुलीचे स्थळ आलं होतं. प्रशांतही उच्चशिक्षित ऐश्वर्य संपन्न होता आम्ही त्या मुलीला पाहायला गेलो. चहा पोह्याच्या बैठकीनंतर प्रशांतला मुलगी पसंत पडली. त्यांनाही प्रशांत आवडला माझा मित्र मला म्हणाला, “दत्ताजीराव कसं पुढे जायचं?’ त्यावेळी मी प्रशांतला सुचवले की, “एकदोन वेळा का होईना त्या मुलीला अजून भेटून घे, तिच्याशी बोलून घे, दोघेही एकमेकांना थोडा वेळ द्या व जाणून घ्या”. मी सुचवल्याप्रमाणे प्रशांत त्या मुलीला वेळ घेऊन भेटावयास गेला. दोघेही प्रशांतच्या कारमधूनच चहा घेण्यासाठी बाहेर पडले चहा घ्यायला कुठे जायचे? हा प्रश्न प्रशांतने तिला विचारताच, तिने ३ स्टार हॉटेलची निवड केली. हॉटेलमध्ये गप्पा मारत असताना, ती मुलगी मोजकेच बोलत होती. अधिकारी पॅटर्नमुळे ती मुलगी प्रशांतकडे व सभोवताली त्याचपद्धतीने पाहत होती. तिने चहापण पूर्ण पिला नाही अर्घाकप चहा तसाच सोडला. कॉन्व्हेंटमध्ये शिक्षण घेतल्यामुळे मध्येच ती इंग्रजीमध्ये फाडफाड बोलत होती. चहा घेऊन हॉटेलच्या बाहेर पडताना एका पोलीस कॉन्स्टेबलने तिला पाहिले व जोरात सॅल्युट मारला होता. ती प्रशांतशी खूपच अंतर ठेवून वागली. पहिल्याच भेटीत प्रशांत खूपच अस्वस्थ झाला. त्याने घरी आल्याआल्या वडिलांना, बाबा ती खूप हाय-फाय मुलगी आहे. मी तिच्याशी लग्न नाही करणार असे सांगितले.
राणी आणि व समीर यांची एकमेकांची चहा व पोह्याच्या बैठकीत पसंती झाली. बैठकीला मी पण होतो. दोघेही उच्चशिक्षित, एकमेकांना अनुरूप, लग्न ठरल्याप्रमाणेच होते. मी सुचवल्याप्रमाणे दोघे एकमेकांना चहा घेण्यासाठी परत भेटले. गप्पा सुरू झाल्या. चहा झाल्यानंतर राणी समीरला म्हणाली, “चला मी निघते, पप्पांना मी तुम्हाला भेटले अजिबात आवडणार नाही. ते खूप कडक आहेत. दत्ता काकांनी आग्रह केला म्हणून मी तुम्हाला भेटायला आले.”
पप्यांचे नाव घेताच, तुझा पप्पा खूप चौकशी करत होता माझी, इकडं तिकडं बऱ्याच जणांकडून त्याने खूप चौकशी केली हे माझ्या कानावर आलं. माझं तर डोकं फिरलं होतं तुझ्या पप्पांवर काय समजतो काय स्वतःला? असे ओरडत समीरने एकदम राणीच्या पप्पांविषयी एकेरी भाषा वापरून राणीबरोबर वाद घातला. सरळमार्गी सुसंस्कृत घरातील राणीला हा सर्व प्रकार नवीन होता. तिला जागेवर रडू कोसळले. व ती घरी आल्या आल्या, आई मी त्या मुलाशी मी लग्न करणार नाही असे तिने आपल्या आईला सांगितले. आम्ही लगेच त्यांना नकार कळवला.
रवी व लक्ष्मीची एकमेकांची पसंती झाली होती. पण नंतरच्या चौथ्या भेटीत लक्ष्मीला रवी हा थोडा गतिमंद असल्याचे जाणवले. तिने घरी गोष्ट सांगून लग्न करण्यास नकार दिला.
बंधु-भगिनींनो, आजकाल घटस्फोटाचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यामुळे ऐन उमेदीच्या काळात तरुण मुले-मुली डिप्रेशनमध्ये जात आहेत. आयुष्याची वाताहत होत आहे. काही जणांना हे दुःख पचवता नाही आले की, ते आत्महत्येकडे कळत आहेत. पूर्वी कांदापोहे व चहाच्या बैठकीत ठरलेली लग्न आज मोडत आहेत. पहिल्याच वर्षात संसाराची राखरांगोळी झालेली बऱ्याच ठिकाणी दिसत आहे. त्यातून घटस्फोट दावा, पोलिस, कोर्टकचेरी, कौन्सेलिंग, एकमेकांना दहशत, भांडणे, प्रसंगी मारामाऱ्या, अपत्यांची हेळसांड यांसारख्या भयंकर प्रकारांनी आज विवाहसंस्था पोखरली जात आहे. पोटगी किंवा घटस्फोटासाठी एकरकमी पैसे दिले किंवा घेतले तरी मनाच्या जखमा, भावभावनांचा खून थांबवणे अवघड झाले आहे, प्रचंड मानहानीने घरे रस्त्यावर येताना दिसत आहेत. हा प्रकार थांबवण्यासाठी बैठकीतं पसंती झाली तरी आपल्या मुलामुलीना काही काळ का होईना भावी जोडीदाराबरोबर घालवू द्या. एकमेकांना समजुन घेण्यासाठी त्यांना काही महिने तरी द्या, त्यांना खातंत्र्य द्या, स्पेस द्या. काही महिन्यानंतर दोघेही स्वभावाने-प्रेमाने एकामेकांच्या पसंतीवर उतरले तरच विवाहबंधनाचा निर्णय घ्या.
जुन्या चालिरीती जर जीवनात दुःख आणत असतील तर त्या बदला. या बदलाची आज नितांत गरज आहे. संस्कृतीच्या नावावर अंधानुकरण करणाऱ्या लोकांनी आज समाजाची मोठी हानी केलीय. लग्न करणे फार सोपे असते. घटस्फोट अर्थात, विभक्त होणे फार अवघड व वेदनादायक असते. विभक्त होण्याची व एकट राहण्याची वेळ कोणावरही येऊ नये, म्हणून हा लेखनप्रपंच.

 

आपला परिवार नागेबाबा परिवार

-डॉ. दत्ता कोहिनकर

(सुखाचा पासवर्ड या पुस्तकातून)

error: Content is protected !!