शब्दांची ताकद

 

♦ एक घटना –

चर्चिलने सभागृह चालू असताना एका बाईला फार बोलू दिले नाही. तिला कमी वेळ दिला. ती बाई अत्यंत अहंकारी, चिडखोर होती. सभागृहाचे काम आटोपून चर्चिल बाहेर पडत असताना ती महिला चर्चिलकडे रागाने बघत क्रोधयुक्त अंतःकरणाने चर्चिलला म्हणाली, तू जर माझा नवरा असतास तर तुला मी विष पाजून मारून टाकले असते. त्या चिडलेल्या महिलेचे हे वाक्य ऐकताच चर्चिल तिच्याजवळ येऊन आदरयुक्त नजरेने तिच्याकडे बघत म्हणाला, “मॅडम, खरं सांगू का? तुम्ही जर माझ्या पत्नी असता तर ते विष मी आनंदाने पिले असते, एवढ्या तुम्ही छान आहात.” चर्चिलच्या या वाक्यानंतर ती महिला एकदम लाजली व गालातच हसली. पुढे काय बोलावं? हे तिला सुचलेच नाही. त्यानंतर मात्र ती चर्चिलची फॅन बनली. चर्चिलला सभागृह चालवताना तिने कधीच विरोध केला नाही.

 

♦ दुसरी घटना –

एक छोटा कारखाना त्या मालकाला बंद करायचा होता. व्यवसाय तोट्यात असल्यामुळे सरकारनेदेखील मालकाला परवानगी दिली होती. कित्येक वर्षांपासून सात कामगार त्या कारखान्यात काम करत होते. सातही कामगारांनी मालकाला भेटून, मालकाला त्याने त्यांच्यावर किती मेहरबानी केली हे सांगितले . या कर्मचाऱ्यांच्या तोंडातून ,मालक , तुम्ही आम्हाला नोकरी दिली, तुमच्यामुळे आम्ही घर बांधू शकलो, तुमच्यामुळे मुलांची शिक्षणे झाली, तुमच्यामुळे मुलांची लग्नं झाली, आज जे दोन घास आम्ही कुटुंबात खातोय मालक ते तुमच्यामुळेच. अशा बोलण्यातून हे कर्मचारी कृतज्ञता व्यक्त करत असताना त्यांच्या डोळ्यांत पाणी तरळले. मालकाला कर्मचाऱ्यांच्या कृतज्ञतेचे हे शब्द ऐकून गहिवरून आले. त्याने या सर्वांना आपल्या भावाच्या कारखान्यात नोकरीस ठेवून घेतले . शब्दांची केवढी ही मोठी ताकद. औद्योगिक क्षेत्रात एका कारखान्यात करारासाठी फार मोठा संप घडून आला होता. कर्मचारी एवढे चिडले होते की त्यांनी गेटवर ठिय्या आंदोलन करून मालमत्तेची हानी करणे, गाड्यांच्या काचा फोडणे, धक्काबुक्की करणे, असे प्रकार चालू केले. शेवटी व्यवस्थापनाने पोलिसांची कुमक मागवली. कामगार व पोलीस यांच्यात हमरातुमरी झाली. शेवटी एस. आर. पी. ला पाचारण करावे लागले. लाठीमार झाला. काहींची डोकी फुटली. हिंसाचार झाला. हा प्रकार कामगारांच्या घरच्यांना समजताच घरची सर्व कुटुंबातील सदस्य आई-वडील, भाऊ, पत्नी, मुलं कंपनीच्या गेटजवळ आली. सर्व कामगारांचे कुटुंब रस्त्यावर बसले. राजकीय मंडळी, पत्रकार, चॅनेलवाल्यांची गर्दी झाली. वेगवेगळ्या पक्षांच्या संघटना कामगारांना पाठिंबा देण्यासाठी झेंडे घेऊन गेटवर आल्या. उपोषण चालू झाले. काही कामगार दवाखान्यात ऍडमिट झाले. कुटुंबासह हे आंदोलन पेटवू लागले. कंपनीचे मुख्य चेअरमन हेगडे साहेबांनी युनियन लीडर ला स्वतः फोन करून उद्या मी सिंगापूरवरून तुम्हाला भेटायला येतोय. गेटवर आपल्या कर्मचाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना न बसवता कंपनीच्या आत असलेल्या प्रशस्त हॉलमध्ये बसवा. मी आपल्याला व आपल्या कुटुंबीयाना भेटण्यासाठी व तुमच्याशी व त्यांच्याशी वार्तालाप करण्यासाठी उद्या येतोय, अशी विनंती केली दुसऱ्या दिवशी सर्व कर्मचारी व कुटुंबीय कंपनीच्या आतील प्रशस्त हॉलमध्ये ठिय्या धरून बसले होते. हेगडे साहेबांचं आगमन झाले . आल्याआल्या त्यांनी सर्व कर्मचाऱ्यांना व त्यांच्या कुटुं‌बियांना वाकून नमस्कार केला. व माईक हातात घेऊन ते म्हणाले बंधु भगिनींनो आणि मित्रांनो मला जी गोष्ट कळली व येथे गेटवर जे घडले याचे मला तीव्र दुःख होत आहे. आजच्या परिस्थितीत तुमच्या कुटुंबाच्या समोर मी उभा आहे. आपली सर्वांची एक फॅमिली आहे. आपण सर्वजण एकाच कुटुंबाचे घटक आहोत. तुमच्या सर्वांच्या परिश्रमामुळे आज हा कारखाना उभा आहे. आपले सर्वांचे यासाठी फार मोठे योगदान आहे. हा कारखाना भरभराटीस आणण्यासाठी आपण जे कष्ट उचलले त्याला माझा सलाम. आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे मीदेखील चेअरमन पदावर निश्चिंतपणे आजपर्यंत काम करू शकलो. मित्रांनो, तुम्ही माझ्याबरोबर बोलणी करायला तयार झाला म्हणून मी सिंगापूरवरून सुरक्षितपणे येथे येऊ शकलो. युनियनच्या प्रतिनिधींना व त्यांच्या कुटुंबियांना मी पहिल्यांदाच भेटत आहे. मी तुम्हाला एवढेच सांगतो की जे झाले ते गैरसमजातून व अहंकारातून झाले असावे. परंतु मी चेअरमन असेपर्यंत कोणत्याही कामगाराच्या नोकरीला धक्का लागणार नाही. सर्वांचे गुन्हे मागे घेतले जातील.
लवकरच मला आपल्या कुटुंबाबरोबर गेट-टुगेदर करून त्यांना आनंदाने भेटायचं आहे.
मित्रांनो, तुम्ही सर्वजण सभ्य आहात. माझे म्हणणे ऐकून कंपनीच्या आत जमला म्हणून तुम्हाला धन्यवाद. तुमचे माझे अनेक जन्माचे नाते असल्यासारखे मला वाटते. आमच्या लोकांकडून काही चूक झाली असेल तर मी ‘सॉरी’ म्हणतो. आपण आजच दुपारी मीटिंग घेऊन करार फायनल करू. येथून पुढे करारामध्ये मी स्वतः लक्ष घालत जाईन याची मी आपणास खात्री देतो. हे करताना आपण सर्वजण कंपनीच्या व्यवस्थापनाचा, आपल्या कुटुंबाचा, सप्लायर्सचा व शेअर होल्डर्सचा विचार करुन योग्य तो मार्ग काढाल याची मला खात्री आहे. तुम्ही सर्वजण माझे भाऊ आहात.
मित्रांनो, हेगडेसाहेबांचे हे भाषण ऐकून सर्वांच्या डोळ्यांत पाणी आले व त्याच दिवशी करार फायनल झाला. पाहिली शब्दांची केवढी ही ताकद शत्रूंना मित्रांमध्ये बदलणाऱ्या शब्दांचे ते भाषण होते.
तथागत भगवान बुद्धदेखील म्हणतात, “वैऱ्याला जिंकाचे प्रेमाने, युद्धाने वाढते युद्ध .”
वैरभावाने भरलेल्या माणसाला धार्मिक शिक्षणाचे, नीतिमूल्यांचे डोस पाजून, फारसा फरक पडत नसतो. त्यापेक्षा करुणा, मैत्री, कमीपणा या गुणांनी त्याला जिंकता येते.
मित्रांनो, जेथे गुळ आहे तेथे माशा जमतात. लक्षात ठेवा धाक, दडपशाही, दरारा याने एखादी गोष्ट साध्य करताही येईल. पण ती फार काळ टिकत नाही. तलवारीच्या जोरावर मिळवलेले राज्य ज्या क्षणी हातातील तलवार निसटते त्याक्षणी संपलेले असते. पण प्रेमाने मिळवलेल्या राज्याचे रक्षण जनताच करत असते. म्हणून छत्रपती शिवाजीमहाराज म्हणायचे, हे रयतेचे राज्य आहे.
मैत्रीच्या, सहानुभूतीच्या, प्रेमाच्या, करुणेच्या मार्गाचा शेवटी विजय होतो. संवादासाठी विचारशक्ती, शब्दशक्ति व ज्ञानभक्ती लागते. शब्दांचे सामर्थ्य प्रचंड असते. म्हणून तर संत तुकाराम महाराज म्हणतात…

“आम्हा घरी धन-शब्दांचीच रत्ने।

शब्द शब्दांचीच शस्त्रे-यत्न करू।।”

शब्द हे शस्त्र आहे. ते जपून वापरायला शिकणे ही साधना आहे. शब्द हसवतात, शब्द रडवतात, म्हणून सुखी जीवनासाठी शब्दांचे महत्त्व समजून घेणे गरजेचे असते. संत-महंत म्हणतात,

“शब्दांमुळे दंगल । शब्दांमुळे मंगल ।।
शब्दांचे हे जंगल । जागृत राहावे ।।”

 

आपला परिवार नागेबाबा परिवार

 

-डॉ. दत्ता कोहिनकर

(सुखाचा पासवर्ड या पुस्तकातून)

error: Content is protected !!