♠ सम्राटची लागली वाट ♠
दहावीच्या मेरिट लिस्टमध्ये आलेला सम्म्राट माझा शाळकरी मित्र. खूप वर्षांनी भेटला.
सम्राटचे डोळे खोलवर गेलेले होते. गालफाडे आत गेली होती. नैराश्याची लक्षणे त्यात जाणवत होती.
अजून त्याला नोकरी व छोकरी मिळाली नव्हती. चर्चेनंतर लक्षात आलं, सम्राट एका बाबाच्या नादी लागला आहे. त्याला बापू म्हणतात. बापू महाराजांच्या उपदेशाप्रमाणे सम्राट आठवड्यातून दोन दिवस पूर्णतः उपवास व कडक ब्रह्मचर्याचे पालन करतो व सारखा मंत्राचा जप करतो.
वय उलटून गेले तरी तो लग्न करायला मागत नव्हता. कामशक्तीची ऊर्जा व त्यात मंत्राचा उच्चार केल्यामुळे निर्माण होणारी ऊर्जा याचं तो दमन करत होता. वीर्यनाश म्हणजे मृत्यू. या महाराजांच्या उपदेशामुळे कामभावना दमन करत, तो हस्तमैथुनपण टाळत होता. मृत्यूनंतर स्वर्ग मिळविण्याची अपेक्षा करणारा सम्राट, मृत्यूपूर्वीच्या जीवनात रस घेत नव्हता. औदासिन्य त्याच्या चेहऱ्यावर दिसत होते. कामाग्नीचे दमन केल्यामुळे व निसर्गाच्या विरोधात दंड थोपटल्यामुळे तो रुग्ण वाटत होता. अमेरिकेत १०० मनोरुग्णांपैकी ७० मनोरुग्ण हे त्यांचं कामजीवन उद्द्धस्त झाल्यामुळे मनोरुग्ण झाले होते. असा अहवाल प्रकाशित झाल्याचे मी वाचले होते. हे मी सम्राटला त्याच्याबरोबर बसून व्यवस्थित समजावून सांगितले. हस्तमैथुन प्रमाणबद्ध केले तर अतिरिक्त ऊर्जा बाहेर पडून तणाव दूर होतो. त्याबद्दलची सविस्तर माहिती सांगून त्याला मी लग्न करण्याचा व नोकरी शोधण्याचा सल्ला दिला. दमन केल्यामुळे विकृतीला कसे सामोरे जावे लागते हे मी त्याला पटवून दिले. सम्राटला त्याची चूक समजली. संन्यस्त जीवन जगणे व कडक ब्रह्मचर्य पालन करणे, हे येड्या गबाळ्याचे काम नाही, त्यासाठी जन्मजात वैराग्य व साधना लागते.
हे मी त्याला समजावून सांगितले. सम्राट चौकटीतून बाहेर पडला व लग्न करून गृहस्थ जीवन जगू लागला.
त्याला मी माझ्या ओळखीने नोकरीही शोधून दिली.
काही दिवसांनंतर सम्राटला ‘ब्रह्मचर्य हेच जीवन’ सांगणारा बापू महाराज त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्याची बातमी पेपर मध्ये वाचायला मिळाली. खरोखर मित्रांनो बाबांच्या नादी लागू नका. ते वेगवेगळ्या पद्धतीने तुमच्या भावनांना हात घालत तुम्हाला मानसिक गुलाम बनवत असतात. म्हणून स्वतःच्या आतला आवाज ऐका. व स्वतःला ओळखा. निसर्गाने बनवलेल्या गुलाबाला मोगरा बनण्यास सांगणे म्हणजे गुलाबाचं स्वतःचं अस्तित्व नष्ट करणे. मग तो गुलाबपण राहत नाही आणि मोगरा पण होत नाही. त्यामुळे आपली तुलना इतरांशी करू नका. स्वतःचे महत्त्व ओळखा व आनंदाने जगा. मृत्यूनंतर स्वर्ग मिळेल, तेथे खूप सुख मिळेल या भ्रमामध्ये हे जीवन वाया घालवण्यापेक्षा आत्ता याक्षणी या पृथ्वीतलावर स्वर्ग निर्माण करा.
‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार,’ विचार बदला, म्हणजे आयुष्य बदलेल. रोज व्यायाम करा. कृतज्ञतेची साधना करा. संतुलित आहार घ्या. ध्यान करा. अनेक मार्गांनी नैतिकमूल्ये जपत उत्पन्न कसे येईल यावर काम करा. कोरोनाच्या कालावधीत अनेक जणांच्या नोकऱ्या गेल्या. एकाच माध्यमातून उत्पन्न असल्यामुळे त्यांचे खूप हाल चाललेत. त्यामुळे वेगवेगळ्या मार्गाने उत्पन्नाचा स्त्रोत चालू करा. आपला पैसा मालमत्ता आपल्या नावावर असू द्या. भावनेच्या आहारी जाऊ नका. लोक काय म्हणतील याचा विचार करू नका. भरपूर मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांच्याशी स्नेहाचे संबंध असू द्या. उसने पैसे देताना समोरच्या व्यक्तीने आपल्याला बुडवले तरी आपल्या आयुष्यावर फारसा परिणाम होणार नाही एवढ्याच पैशाचा व्यवहार करा.”
‘नाही म्हणायला शिका.”
“स्वतःवर प्रेम करा.”
“स्वतःबद्दलची इमेज स्वतःच्या मनात अभिमानास्पद ठेवा. तुम्हाला आयुष्यात दुर्दैवाने भविष्यात, वार्धक्यात, एकटेपणा आला तरी आनंदाने जगता आला पाहिजे अशी पैशाची तरतूद व मनाची सबलता (मानसिकता) बनवून ठेवा. आपल्या आतच आपला आनंद शोधायला शिका. बचत करायला शिका. स्वतःवर खर्च करायला शिका. राहणीमान उत्तम ठेवा. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक करू नका. दानधर्म करा. लोकांच्या बाह्य प्रक्षेपणावर भुलून जाऊ नका. वरतून अब्जाधीश असल्याचा रुबाब करणारी बरीचशी मंडळी प्रचंड कर्जबाजारी असल्याची मी पाहिली आहेत. लोकांच्या गोड गोड शब्दांवर किंवा आश्वासनांवर, वचनांवर विश्वास न ठेवता प्रॅक्टिकल वागायला शिका. पोपटपंची करून आमिष दाखवून आपलं काम करून घेणारे महाभाग सध्या जागोजागी भेटतील. राजकीय लोकांच्या मागे मागे पळू नका. त्यांच्या एखाद्या फोनने खुश होऊन, नको ती कामे करू नका. तुमच्यावर वाईट वेळ आल्यानंतर तुम्हालाच त्या प्रसंगाला तोंड द्यावे लागते.”
-डॉ. दत्ता कोहिनकर
(सुखाचा पासवर्ड या पुस्तकातून)
असेच इतर प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनेल लिंक : https://whatsapp.com/channel/0029Va9D3hlGZNChVf8FWO1S
