उच्चशिक्षित संजय एका मल्टिनॅशनल कंपनीत सुपरवायझर म्हणून कामाला लागला. संजय कामांमध्ये अत्यंत हुशार होता. त्यामुळे त्याला कारखान्यात मोठ्या प्रमाणात मानसन्मान होता. कमी दिवसांमध्ये बढती मिळणाऱ्या लोकांमध्ये तो एक होता. सुपरवायझर म्हणून रोल करताना त्या व्यक्तीला कामगारांकडून प्रॉडक्शन करून घेणे, व्यवस्थापनाची मागणी पूर्ण करणे, कामगार व कामगार युनियन यांच्याशी सलोख्याचे संबंध ठेवणे व स्वतःच्या करिअरमध्ये प्रगती करणे यासारख्या अनेक गोष्टीवर एकाच वेळी काम करावे लागते. हे अत्यंत कौशल्याचं काम असून त्यासाठी मनाची शांती व समता असणे आवश्यक असते. संजय कामामध्ये अत्यंत हुशार व कष्टाळू होता, पण त्याचा स्वभाव अत्यंत क्रोधी होता. त्याच्या मनाविरुद्ध काही झाले तर त्याला प्रचंड राग येत असे. त्यामुळे, हाताखालच्या लोकांचे व संजयचे नेहमी खटके उडत असत. अशाच एक-दोन प्रकरणांमध्ये संजय ला कामगार युनियन व मॅनेजमेंट ने योग्य ती समज दिली होती. आपल्याला खूप राग येतो हे संजयला माहित होते. ते त्याला कळत होते, पण वळत नव्हते. एक दिवस कामावरून संजयची एका कामगाराबरोबर जोरात भांडणे झाली. कामगार हा तरुण असल्याने त्याने ही संजयला चढ्या आवाजात उत्तर दिले पर्यावसन धक्काबुक्कीत झाले व क्रोशा नियंत्रण मिळवता न आल्याने संजयने त्या कामगारांच्या नाकावर फाईट मारली. त्या कामगाराच्या नाकातील घोळणा फुटून तो रक्तबंचाळ झाला त्याची मेडिकल करून झाल्यानंतर व्यवस्थापन व कामगार प्रतिनिधीनी या विषयावरची मीटिंग संजय बरोबर घेतल्यानंतर त्या मीटिंगमध्येदेखील संजयने उद्धटपणाने उत्तरे दिली त्यामुळे व्यवस्थापनाने संजयला कामावरून कमी केले काही दिवस त्याच्याकडे बँकेत असलेल्या शिल्लक पैशातून त्याने घरखर्च चालवला संजयने बऱ्याच ठिकाणी दुसरी नोकरी शोधण्याचा प्रयत्न केला. पण मागील कंपनीतील चौकशीमध्ये त्याच्या भांडणाची गोष्ट ही लोकांना माहीत होत असे त्यामुळे त्याला इतर कंपन्यांमध्ये जॉब मिळणे अवघड झाले होते. संजयने शेवटी रिक्षा चालवण्यास सुरुवात केली कसेबसे हातावर पोट भरू लागला. त्यातच लॉक डाऊन जाहीर झाला रिक्षा पासून येणारे इन्कमपण बंद झाले. शेवटी पत्नी मुलेबाळे यांचा सांभाळ करताना पैशाची चणचण त्याला भासू लागली. कंपनीच्या दारात येऊन तो त्याच्या मित्रांना हात जोडून रडवेल्या अवस्थेत घरखर्चासाठी पैसे मागू लागला.
नंतर मित्र त्याला बघून लांब जाऊ लागले. शेवटी संजयला नैराश्य आले म्हणून त्याला कौन्सेलिंगसाठी माझ्याकडे मित्राने आणले असता, मी त्याला कौन्सेलिंग करून लवकरच ध्यान शिबिराला बसवण्याचा निर्णय घेतला आहे. व त्याच्या नोकरीसाठीदेखील प्रयत्न करणार आहे. मित्रांनो येरवडा जेलमध्ये ज्या वेळेस कैद्यांसाठी तणाव मुक्तीच्या कार्यशाळा मी घेत असतो, अनेक उच्चशिक्षित सुसंस्कृत घरातील मुले मला तेथे भेटतात क्रोधावर ताबा न ठेवल्यामुळे त्यांच्याकडून मोठा गुन्हा घडलेला असतो. व कित्येक वर्षांची शिक्षा तेथे भोगत असतात. मी मी म्हणणारे डॉन, भाई जेलमध्ये गेल्यानंतर पश्चातापाने होरपळत असताना मी पाहतो. सार्वजनिक जीवनामध्ये, हातपाय तोडून टाकीन, संपवून टाकीन, असा शब्दप्रयोग करणाऱ्या अनेक भाईंना जेलमध्ये गेल्यानंतर या सर्व दादागिरीमधील फोलपणा लक्षात येतो. व पोलिस कस्टडी व शिक्षा भोगून ते मांजर होऊन जातात हे मी स्वतः पाहिलेले आहे.
म्हणून मित्रांनो, क्रोधावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. एका क्षणार्धात क्रोधावरचे नियंत्रण सुटले तर तुमचं जीवन उद्ध्वस्त होऊ शकत. म्हणून क्रोधावर नियंत्रण मिळवण्यासाठी ध्यानधारणा ही काळाची गरज आहे. कोणी तुम्हाला विनाकारण त्रास देत असेल तर शक्यतो मारामारीच्या फंदात न पडता कायदेशीर बाबीचा आधार घेणे, कायद्याची मदत घेणे ही आज काळाची गरज आहे. भारतासारख्या लोकशाहीप्रधान देशामध्ये कायद्याविषयक माहिती मिळवणे व त्या माहितीचा यथायोग्य वापर करणे ही आज आवश्यक अशी गोष्ट आहे. पोलीस यंत्रणा २४ तास आपल्या सेवेसाठी उपलब्ध असते. चांगले चांगले मी मी, म्हणणारे भाई पोलिसांना बघून पळ काढतात, लपून बसतात. त्यामुळे पोलीस यंत्रणेचा आपल्यावर झालेल्या अन्यायासाठी सपोर्ट घेणे हे आज आवश्यक झालेले आहे. त्यासाठी तुम्हाला कायद्याचे बऱ्यापैकी ज्ञान मिळवणे ही काळाची गरज झाली आहे. अब्राहम लिंकनने मुलाच्या मुख्याध्यापकाला लिहिलेल्या पत्रात म्हटले होते, “माझ्या मुलाला गुंडांना भीत जाऊ नको त्यांना नमवणे खूप सोपे असते हेही शिकवा.” असे म्हटले होते म्हणून क्रोधाचा त्याग करा व लोकशाही मार्गाने पुढे चला.
क्षणाचा क्रोध तुमचं जीवन उद्ध्वस्त करू शकतो. गीतेत म्हटले आहे,
“क्रोधात भवति संमोहः संमोहात स्मृतिविभ्रमः
स्मृतिभंशात बुद्धीनाशः बुद्धीनाशात प्रणश्यति।।
(क्रोधामुळे व्यक्तीचा विवेक सुटतो, तो सुटल्यामुळे स्मृतिदोष जडतो.स्मृतिदोषामुळे बुद्धिनाश होतो व त्यामुळे व्यक्तीचा विनाश होतो. ‘आती राग आणि भीक माग.) क्रोधामुळे मनुष्य हिंसक बनतो. त्यामुळे त्याच्या हातून वाईट कृत्ये घडू शकतात. कुटुंबात वडील क्रोधी असतील तर त्याचे दुष्परिणाम मुलांच्या कोवळया मनावर होतात. त्यामुळे मुले दुर्बल आणि भित्री होतात. क्रोधामुळे मनुष्य विचारहीन होतो. त्याच्या हातून रागाच्या भरात खूनही होऊ शकतो. क्रोधामुळे व्यक्तीला रक्तदाबाचे विकार बळावतात त्याची मज्जा संस्था दुर्बल होते. मनुष्य समाजापासून घरापासून दूर फेकला जातो. त्याच्या जीवनात अपयश येते. क्रोध विचारात विसंगती आणतो व त्या मनुष्याची वाटचाल नैराश्याकडे होते. क्रोधामुळे डोळे लाल होणे, छातीत धडधडणे, नाकपुड्या फुगणे, शरीर थरथरणे, अन्नावरची वासना उडणे, रक्तातील साखर वाढणे, अल्सर, हृदयविकार उद्भवणे. असे अनेक दुष्परिणाम शरीरावर दिसून येतात. क्रोध व्यक्त केल्यानंतर लक्षात येते ज्या कारणासाठी आपण रागावलो ते कारण कीती शिल्लक होते पण आपण प्रतिक्रिया देऊन दुःखाचे भागीदार झालेलो असतो. काही गोष्टीसाठी क्रोध उपकारकदेखील ठरतो. आपल्या स्वातंत्र्यवीरांना आपल्यावर अन्याय करणाऱ्या परकीयांबद्दल क्रोध आला म्हणून तर त्यांनी स्वातंत्र्यसंग्रामाचा लढा देऊन आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले. पण आपले मन आपल्या ताब्यात ठेवणे, त्याला सबल व सशक्त करणे ही आजच्या काळाची गरज आहे. नाहीतर आपले आयुष्य कधीही उद्ध्वस्त होऊ शकते म्हणून या मनाला सबल व निर्मल करण्यासाठी रोज योगा, प्राणायाम, ध्यान धारणा त्यांचा अभ्यास करा. आयुष्यात एकदा का होईना दहा दिवसीय विपश्यना ध्यान शिबिर करा. नाहीतर संजय सारखी एखादी घटना मन ताब्यात न ठेवता आल्यामुळे आपल्याकडूनही घडू शकते.
त्यावेळेस आपल्या मनातदेखील विचार येईल काय करून बसलो ? पण त्यावेळेस वेळ निघून गेलेली असेल.
आपला परिवार नागेबाबा परिवार
-डॉ. दत्ता कोहिनकर
(सुखाचा पासवर्ड या पुस्तकातून)
