अपयशाने खचू नका

मित्रांनो, ‘अपयश ही यशाची एक एक पायरी आहे.’ असं आपण बऱ्याच वेळेला ऐकलं असेल, वाचलं असेल. त्यामुळे जीवनामध्ये कधीकधी अपयश आलं तरी खचून जाऊ नका. लांब उडी मारण्यासाठी कधीकधी दोन-तीन पावलं मागं जावं लागतं. आणि मग लांब उडी मारणं सहज सुलभ होऊन जातं.
सुपरस्टार अमिताभ बच्चन साहेबांचे सुरुवातीचे बरेच चित्रपट अपयशी ठरले. कालांतराने त्यांच्या ‘अँग्री यंग मॅन’च्या प्रतिमेने त्यांना प्रसिद्धी मिळवून दिली. ऐंशीच्या दशकात चित्रपटाच्या सेटवर त्यांना भीषण अपघात झाला. रुग्णालयात मृत्यूशी झुंजत राहिले आणि कित्येक महिन्या नंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला, पण बोफोर्स प्रकरणामुळे तीनच वर्षात त्यांना निवृत्ती पत्करावी लागली. पुढे कित्येक वर्षे ह्या बोफोर्स प्रकरणाने त्यांना पिच्छा सोडला नाही. ते चित्रपटात परत आले, पण त्यांचे चित्रपट बॉक्स ऑफिस वर अपयशीच होत राहिले. पुढे जाऊन त्यांनी ए.बी.सी.एल. कंपनी सन २००० त्यांच्यासाठी निर्णायक ठरली. त्यांनी ‘कौन बनेगा करोडपती’ ह्या कार्यक्रमाचे सूत्रसचालन स्वीकारले. कार्यक्रम अतिशय यशस्वी झाला व पुढे त्यांचे काही चित्रपटही यशस्वी ठरले. आज तर ते बॉलिवूडमधले सर्वात भरवशाचे आणि सर्वात यशस्वी असे कलाकार आहेत.
एखाद्याच्या आयुष्याला ‘रोलर कोस्टर राईड’ची उपमा द्यायची झाली तर ती अमिताभच्या आयुष्याला देता येईल. यश आणि अपयश दोन्ही मुबलक प्रमाणात त्यांच्या वाट्याला आले आहे. पण प्रत्येक अपयशानंतर ते नव्या उमेदीने उभे राहिले. ‘दुर्दैव ही सुदैवाची पहिली पायरी आहे.’ ह्या थोरो ह्यांच्या उक्तीचे ते एक जिवंत उदाहरण आहेत. त्यामुळे अपयश आले तरी खचून जाऊ नका. आपल्या मनाची उमेद वाढवा. आपल्या ध्येयावर फोकस देऊन काम करत रहा.

‘मंजिले उन्ही को मिलती है,
जिनके सपनोंमे जान होती है,
कुछ नही होता बहुत पंख होनेसे,
हौसलो से उडान होती है….

म्हणून मित्रांनो, आपल्या मनाची उभारी सतत वाढवत रहा. त्यासाठी ध्यानधारणा करा.

 

आपला परिवार नागेबाबा परिवार

-डॉ. दत्ता कोहिनकर

(सुखाचा पासवर्ड या पुस्तकातून)

error: Content is protected !!