ओळख साधुत्वाची

भगवान बुद्धांचा एक दोहा मी ऐकला. त्याचा आशय असा होता की, जटा वाढवून किंवा मोठमोठ्या माळा घालून, वेगवेगळ्या रंगाची वस्त्रे धारण करून, कोणी साधू होत नसतो तर जो आपले चित्त शुद्ध करतो, लोकांशी करुणा, मैत्रीचा व्यवहार करतो, तो खऱ्या अर्थाने साधुत्वाच्या मार्गावर असतो.
त्यावेळेला मला स्वामी विवेकानंदांची एक गोष्ट आठवली. स्वामी विवेकानंद भारत परिक्रमेसाठी मठाबाहेर पडण्याच्या तयारीत होते. इतक्यात त्यांना कुणी तरी सांगितले की, शारदामाता त्यांना बोलावत आहेत. स्वामीजी लगबगीने तिथे गेले. पाहतात तर शारदामाता स्वयंपाक करीत होत्या. त्या म्हणाल्या, ‘आलात. या! तुम्ही आता भारतभ्रमणाला निघत आहात. जाताना माझ्या हातचा प्रसाद खाऊन जा.’ स्वामीजी तिथे बसले. शारदामाता स्वयंपाक करताकरता त्यांच्याशी बोलत होत्या. अचानक त्यांनी स्वामीजीना कोपऱ्यातील कपाटात ठेवलेली सुरी आणण्यास सांगितले. स्वामीजी कपाटाकडे गेले. ती सुरी त्यांनी हातात घेतली. ते माताजींजवळ आले. पण माताजींकडे सुरी देताना त्यांनी पात्याची धारदार बाजू आपल्या बोटांत धरली होती व लाकडी मुठीची बाजू शारदामातांकडे होती. हे पाहून माताजी हसल्या. म्हणाल्या, ‘नरेंद्र, तुम्ही परीक्षेत यशस्वी झालात. आता सुखाने भारतभ्रमणाला जा. जीवनातले धारदार कटू अनुभव असेच स्वतःकडे ठेवा. इतरांना त्याचा त्रास होणार नाही याची काळजी घ्या.’
मित्रांनो, इतरांच्या आयुष्यात दुःख न निर्माण करता सुख देण्याचा प्रयत्न करणे हीच साधुत्वाकडे नेणारी वाटचाल आहे.

 

आपला परिवार नागेबाबा परिवार

-डॉ. दत्ता कोहिनकर

(सुखाचा पासवर्ड या पुस्तकातून)

error: Content is protected !!