ध्यानधारणा …

परवा एका मित्राचा फोन आला. तो म्हणाला, “माझं मन खूप बैचेन आहे, मला पटकन खूप राग येतो. त्यामुळे माझं खूप नुकसान होत आहे व मला खूप त्रास होतोय. मी काय करू?” हा प्रश्न त्याने विचारल्यानंतर मी त्याला त्वरीत ध्यान साधना करण्याचा सल्ला दिला.
मित्रांनो, जंगली हत्तींना नियंत्रणात आणण्यासाठी पूर्वी वापरण्यात येणारी पद्धत म्हणजे, त्यांना खांबाला बांधले जात असे. दोरखंडाने बांधल्यामुळे हत्ती खूप अस्वस्थ होत असे आणि आगपाखड करीत असे. आगतिक झालेला तो जीव पुढील कित्येक दिवस त्वेषाने चीत्कार करत असे.
पुढे जसजसे त्याच्या लक्षात येत असे की, ह्यातून सुटका होणे अशक्य आहे, तसा तो शांत होत असे. याक्षणी मग माहूत हळूहळू व योग्य सुरक्षेखाली त्याला खाऊ घालणे व काही आवश्यक क्रिया करायला शिकवणी सुरु करीत असे. हळूहळू मग माहूत कोणत्याही दोरखंडाशिवाय
पूर्णतः मोकळ्या झालेल्या त्या हतीला शिकवणी देत असे.
ध्यान करणाऱ्या साधकांच्या मते, माणसाचे मन हे ह्या जंगली प्राण्याप्रमाणे असून जागरूकता हा दोरखंड असून ध्यानधारणा हा तो स्थिर खांब आहे. त्या जंगली हत्तीला जसे दोरखंड आणि खांब शांत करू शकतात, तसेच मानवी मनाला ध्यानधारणा आणि जागरूकता कह्यात ठेऊ शकतात.
सुदैवी व्यक्ती आपल्या मनाला अशा प्रकारे कह्यात ठेवण्यासाठी अनोख्या पद्धती शोधून काढतात. आणि अशाप्रकारे त्यांच्या आयुष्यातल्या वेगवेगळ्या प्रसगांना ते सामर्थ्यांने तोंड देऊ शकतात. मित्रांनो ध्यानाच्या अनेक पद्धतीमध्ये ‘विपश्यना’ नावाची ध्यानसाधना अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीची आहे व अत्यंत लाभदायक आहे. एकदा का होईना ही साधना अवश्य करा. साधना पूर्णपणे मोफत असून जुन्या साधकांच्या दानावर सर्व काम चालते. श्वास व संवेदनांच्या आधारावर सर्व ध्यानपद्धती असल्यामुळे कुठल्याही संप्रदायाचा, वर्णाचा, धर्माचा माणूस ही साधना सहजपणे करू शकतो.
कोणत्याही परिस्थितीत स्थितप्रज्ञ राहण्याचे महत्त्व पटवून देणारी विपश्यना ध्यानसाधना एकदा का होईना जरूर करा. आनंदाने जीवन जगण्याची ती एक गुरुकिल्ली आहे. त्यामुळे मनाची सबलता व निर्मलता वाढते.

 

आपला परिवार नागेबाबा परिवार

-डॉ. दत्ता कोहिनकर

(सुखाचा पासवर्ड या पुस्तकातून)

error: Content is protected !!