गुलाबाला मोगरा बनवू नका.

दहावी बारावीचे निकाल लागले. आता पालकांना आपल्या मुलांच्या भवितव्याचे वेध लागले आहेत. कुठल्या साईडला मुलांना टाकावं? हा त्यांच्यासमोर प्रश्न आहे. प्रत्येक पालकांना आपल्या मुलाला जगामध्ये कुठला ट्रेण्ड जोरात चालला आहे. त्या साईडला प्रशिक्षणासाठी घालावेसे वाटते. परंतु त्याच्या मनाच्या ट्रेण्डकडे मात्र पालक दुर्लक्ष करतात. खरोखरच तुम्ही तुमच्या मुलांना महान आणि ऐतिहासिक बनवू इच्छित असाल तर त्याच्या आत असलेली कला ओळखा. कृपा करून त्यांच्यात वाहत असलेल्या कलेच्या प्रवाहाला रोखण्याऐवजी त्याला अधिक जोमाने प्रवाहित करण्यासाठी प्रोत्साहन द्या. तुमचं मूल हे सामान्य आयुष्य जगण्यासाठी जन्माला आलेलं नाही, त्याला निसर्गाचं वरदान समजा. तो मोठा होऊन काहीतरी करून दाखवण्याची क्षमता घेऊन जन्माला आला आहे, त्याचा आनंद घ्या! शिवाय हाही विचार करा, की एखाद्या मुलाला साहित्यात रुची असेल, आणि तो लहानपणापासूनच फक्त लिहीत आणि वाचत राहिला तर तो मोठा झाल्यावर एक दिवस ‘शेक्सपियर’सारखा मोठा लेखक होणार नाही का? म्हणूनच, कृपा करून या उमलणाऱ्या फुलांचा स्वाभाविक सुगंध हिरावून घेऊन त्यांना कागदी फुलं बनवू नका.
त्याचप्रमाणे मुलांनीही स्वतःमध्ये उमलणाऱ्या या कलेसाठी स्वतःला समर्पित केलं पाहिजे. हजारो दबाव आणि अपयश यांचा सामना करावा लागला तरीही ती कला सोडता कामा नये. असं केल्याने एक ना एक दिवस अशी मुल अतिउच्च शिखरावर विराजित होतील. बंधू-भगिनीनो गुलाब गुलाब आहे त्याला मोगरा व्हायला सांगू नका जर त्याला मोगरा करण्याचा प्रयत्न कराल तर तो गुलाब पण राहणार नाही आणि मोगरा पण होणार नाही… म्हणून मुलांना आवडत्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी तो capable असेल तर प्रोत्साहन द्या… मुलांच करिअर शोधण्यासाठी डी एम आय टी, एप्टीट्यूड, यासारख्या काही चाचण्या उपलब्ध आहेत. त्याचा देखील मुलांना उपयोग होऊ शकतो. थोडक्यात त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात ती प्रगती करू शकतील ज्यामुळे त्यांचा भवितव्य उज्वल होईल अशा क्षेत्रात त्यांना प्रोत्साहन द्या. यातच तुमच्या मुलाचे हित दडले आहे.

आपला परिवार नागेबाबा परिवार

-डॉ. दत्ता कोहिनकर
(सुखाचा पासवर्ड या पुस्तकातून)

error: Content is protected !!