सागर हा दहावीच्या परीक्षेमध्ये बोर्डामध्ये पहिल्या पाचमध्ये आला होता. पेपरमध्ये त्याचे फोटो छापून आले होते. बारावीतदेखील तो बोर्डात आला होता. त्या भागातील लोकांनी त्याचा जंगी सत्कार केला होता नातेवाइकांनीदेखील सर्वांनी एकत्र येऊन सागरचा सत्कार समारंभ केला होता. उच्च शिक्षणासाठी सागर अमेरिकेला गेला. उच्च शिक्षण घेतल्यानंतर त्याच ठिकाणी सागरला एका मल्टिनॅशनल कंपनीमध्ये फार मोठी पोस्ट मिळाली. कंपनीच्या वतीने सागरला फ्लॅट व गाडी देण्यात आली. सागरने तीनचार वर्षात मोठी कमाई करून त्या ठिकाणी मोठा बंगला घेतला व अमेरिकेत लग्न करून सागर तेथेच स्थायिक झाला. परंतु दुर्दैवाने मल्टिनॅशनल कंपनीला वाईट दिवस आले. कंपनी तोट्यात गेली व सागरला नोकरी सोडावी लागली. एवढ्या मोठ्या पगाराची नोकरी सागरला दुसरीकडे कुठे मिळेना, त्यामुळे सागर नैराश्यात गेला आणि एके दिवशी सागरने घरात कोणी नसताना आत्महत्या केली.
मित्रांनो, पहिल्यापासून सागरने फक्त यश आणि यशच बघितले होते. जीवनामध्ये अपयश येऊ शकते, वाईट दिवस येऊ शकतात याचा अनुभव त्याने कधी घेतलाच नव्हता कायमस्वरूपी यश मिळाल्यामुळे मनामध्ये एक प्रकारचा अहंकार निर्माण झाला होता.
अपयशाला कसे तोंड द्यायचे हे त्याला माहीत नव्हते आता लोक काय म्हणतील? या भीतीने व पुढे आपले कसे होणार? या विचारांनी त्याने टोकाचा निर्णय घेतला होता. कमी पगाराची नोकरी करायला त्याचं मन तयार नव्हतं.
म्हणून मित्रांनो, आपल्या मुलांना यशाबरोबर जीवनात अपयश देखील येते हे समजावून सांगा व जीवनात प्रत्येक गोष्ट बदलणारी असते हे त्यांच्या मनावर बिंबवा.
सागर लहानपणापासून फक्त पुस्तकामध्ये आणि कॉलेज आणि घराच्या चौकटीमध्ये वाढला होता. आणि यशाची त्याला भुरळ पडली होती. म्हणून आपल्या मुलांना नुसतं अभ्यास कर असे म्हणत पुस्तकातले किडे बनवू नका. त्यांना फिरू द्या. चौकात जाऊ द्या. मित्रांबरोबर फिरायला जाऊ द्या. चौकामध्ये बसून टवाळक्या करू द्या.
तुमच्या मुलांना शिट्टी मारता आली पाहिजे. त्याला जगाच्या बाजारात विषम परिस्थितीत कसं जगायचं? याचं नॉलेज मिळण्यासाठी घराबाहेर व चौकात जाऊ द्या. फक्त दुरून लक्ष ठेवा. ‘चौक’ एक युनिव्हर्सिटी आहे. जी मुलं चौकांमध्ये लहानाची मोठी होतात त्या मुलांना जगात कसं जगायचं? आणि विषम परिस्थितीत कसं वागायचं? याचं नॉलेज ‘चौक’ नावाच्या विद्यापीठात मिळते. ही पोरं जीवनात कितीही अपयश आले तरी कधी आत्महत्या करत नाहीत. मुलांना पुस्तकी किडे आणि घरकोंबडा न बनवता घराबाहेर सोडा.
त्यांना यशापयशाचा सामना करू द्या त्यातूनच उद्याची सशक्त पिढी घडेल.
आपला परिवार नागेबाबा परिवार
-डॉ. दत्ता कोहिनकर
(सुखाचा पासवर्ड या पुस्तकातून)
