आनंदाच्या शोधात

सॅम्युअल अत्यंत श्रीमंत मनुष्य होता. भल्यामोठ्या आलिशान गाडीतून आपल्या कौन्सिलरकडे गेला. आणि म्हणाला, “सर! मला असे वाटते की माझे संपूर्ण आयुष्य निरुपयोगी आहे, त्याला काही अर्थ नाही. तुम्ही मला आनंद मिळविण्यासाठी मदत कराल का?” कौन्सिलरने तिथे काम करणाऱ्या एका वृद्ध महिलेला बोलावले आणि तिने आपल्या जीवनात आनंद कसा मिळाला हे सांगण्यास सांगितले. त्या वृद्ध स्त्रीने तिची केरसुणी खाली ठेवली, आणि सांगायला सुरुवात केली, “माझ्या नवऱ्याचा हार्टअटॅकमुळे मृत्यू झाला. मला कोणीही नव्हते. मी अगदी एकटी झाले, माझ्या आयुष्यात काहीही शिल्लक राहिले नाही. मी झोपू शकत नव्हते, खाऊ शकत नव्हते, माझे हसणेही थांबले होते.”
मीही माझे स्वतःचे जीवन संपवण्याच्या विचार करण्यास सुरवात केली होती.
एक दिवस मी कामावरून घरी येत असताना एक लहान मांजराचे पिल्लू माझ्यामागे येत होते, बाहेर खूप थंडी होती, म्हणून मी त्या बाळाला आत येऊ दिले. त्या बाळासाठी मी थोडेसे दूध गरम करून दिले. पिल्लाने प्लेटमधले दूध चाटूनपुसून प्यायले मग ते माझे पाय चाटू लागले. बऱ्याच महिन्यांनंतर मी त्या दिवशी हसले. मग मला वाटले की, या पिल्लाची मदत केल्याने मला आनंद झाला आहे, ह्याला माझी गरज आहे,
त्यानंतर मी माझ्या गच्च्चीमध्ये बसून कावळे, चिमण्या व इतर पाखरांसाठी धान्य व पाणी ठेवू लागले. त्या पाखरांबरोबर माझी घट्ट मैत्री झाला बऱ्याचदा ही पाखरे माझ्या हातातून घेऊन खातात.
मला खूप आनंद मिळू लागला. कदाचित इतरांसाठी काहीतरी केल्याने मला अधिक आनंद होईल. म्हणून दुसऱ्या दिवशी मी माझ्या घराजवळ असलेल्या वृद्धाश्रमात जाऊन सगळ्यांना छान चॉकलेट दिले. सगळ्यांबरोबर गप्पा मारल्या. सगळ्यांना खूप आनंद झाला..
“दररोज मी काहीतरी नवीन आणि असे काहीतरी करते जे इतरांना आनंदित करते आणि त्यांचा आनंदी चेहरा पाहून मला खूप आनंद होतो.” हे ऐकून त्या श्रीमंत माणसाला आनंद मिळवण्याचा मार्ग सापडला. मित्रांनो, आपण जे लोकांना द्याल ते कित्येक पटीने आपल्याकडे येत असते, निसर्गाचा नियम आहे
जो दुसऱ्यांना सुख, आनंद, प्रेम देतो, त्याला जीवनामध्ये सुख, आनंद, प्रेम कधीच कमी पडत नाही.
साधू वासवानी म्हणतात, “तुम्हाला सुख हवे ना, मग इतरांना सुखी करा.”

 

आपला परिवार नागेबाबा परिवार

 

 

-डॉ. दत्ता कोहिनकर

(सुखाचा पासवर्ड या पुस्तकातून)

error: Content is protected !!