बीजिंगमधील एक शेतकरी आपल्या शेतात नांगरणीसाठी एक म्हातारा घोडा वापरत असे. एके दिवशी तो घोडा त्याच्या शेतातून टेकडीच्या दिशेने पळून गेला. शेजाऱ्यांनी शेतकऱ्याच्या दुर्दैवावर दुःख व्यक्त केले. त्यावर शेतकरी म्हणाला की, ‘कुणास ठाऊक हे सुदैव आहे की दुर्दैव?’ त्यानंतर शेतकऱ्याने नांगरट करण्यासाठी मुलाला त्याच्या मित्राकडून घोडा आणावयास लावला. तो घोडा अत्यंत चपळ होता. घोड्याला आवाक्यात आणताना शेतकऱ्याचा मुलगा घोड्यावरून खाली पडला व त्याच्या पायाला इजा झाली. प्रत्येकाला असेच वाटले की हे एक दुर्दैवच आहे.
गावातल्या लोकांना वाटले याचा घोडा पळून गेला व दुसऱ्या घोड्यावरून यांचा पोरगा खाली पडला आणि फॅक्चर झाला. किती दुर्दैव आहे यांचे. परंतु काही काळाने शेजारील राजाचे सैन्य त्यांच्या गावात घुसले व प्रत्येक सशक्त आणि धडधाकट तरुणाला बंदी बनवून घेऊन गेले पण शेतकऱ्याचा मुलगा अधू पायामुळे मागेच राहिला.
आता जे काही झाले ते सुदैव होते की दुर्दैव? तुम्हीच विचार करा. काही वेळेस आपल्या आयुष्यामध्ये वाईट घटना घडली तर आपण निराश होतो, पण त्यामागे निसर्गाची काहीतरी योजना असते हे आपल्याला लक्षात येत नाही. एका उद्योगपतीचं विमान चुकलं व करोडो रुपयांच्या धंद्याच्या मीटिंगचा त्याग करावा लागला. त्याला खूप वाईट वाटलं. तो रात्रभर झोपू शकला नाही. परंतु दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये ते विमान कोसळल्याची बातमी वाचण्यात आली. आणि त्याने ते विमान त्याला वेळेवर गाठता न आल्यामुळे ईश्वराचे आभार मानले.
त्यामुळे आयुष्यात काही वाईट घडलं तरी व्याकूळ न होता सत्कर्म करत राहा, यातच तुमच्या जीवनाच्या कल्याणाचं सार आहे. आज तुम्ही जे पेराल हेच भविष्यात उगवत असते… म्हणून नेहमी चांगलं कर्म करण्याचा प्रयत्न करा.
आपला परिवार नागेबाबा परिवार
-डॉ. दत्ता कोहिनकर
(सुखाचा पासवर्ड या पुस्तकातून)
