अपयशाने खचलेला, भविष्यातील करियरच्या चिंतेने नैराश्यात गेलेला तरुण, प्रेमभंग असह्य झाल्याने किंवा घटस्फोटामुळे आत्महत्यापर्यंतचा विचार करणारी मुले-मुली, दारुचे व्यसन सुटत नसल्यामुळे संसार रस्त्यावर यायची वेळ आलेली तरुण जोडपी, शिक्षणात अपयश, बेरोजगारी, मानसिक आजाराने त्रस्त झालेला युवा वर्ग, घरात होणाऱ्या त्रासाने घुसमटलेले स्त्री-पुरुष, न्युनगंड व भित्रा स्वभाव यामुळे आत्मविश्वास गमावलेले व जगायचं कशासाठी? या विचारांनी अर्धमेले झालेले विद्यार्थी- विद्यार्थिनी. पोटच्या मुलाकडून सुनेकडून होणाऱ्या छळाला वैतागलेले आजी-आजोबा, वासनेने, क्रोधाने, द्वेषाने लोभाने पछाडलेले मन, त्यामुळे जीवनात झालेली घालमेल नैराश्य, दुःख, वैफल्यता अशा अनेक गोष्टीतून बाहेर पडण्यासाठी निरनिराळ्या मार्गाचा शोध घेणारी मंडळी यांच्या कानात कोणीतरी सांगतो “जा आणि विपश्यना कर” तो विपश्यना ध्यान केंद्रावर जातात. १० दिवसाच्या निवासी शिबिरात सामिल होतात मनाचे मनानेच ऑपरेशन होते विकारावर विकार निघून मनाची शुद्धता होते आणि मरगळलेल्या चिंताक्रांत चेहऱ्यावर दहा दिवसानंतर हास्य उमलते सर्व शिबिर विनामूल्य, सांप्रदायविहिन असून, दहा दिवस राहण्या खाण्याचा सर्व खर्च जुन्या साधकांच्या दानावर चालतो सेवाभार्थी स्वयंसेवक, त्यांनी केलेली मेवा पाहून त्यातून कृतज्ञतेचा भाव जागतो आणि शिबिर संपताना डोळ्यातून अश्रू ओघळतात मन शांत व निर्मळ झालेले असते.
२५०० वर्षापूर्वी सिद्धार्थ गौतम बुद्धांनी दुख मुक्तीसाठी ‘विपश्यना’ ही महासंजीवनी शोधून काढली ही शास्त्रोक्त साधना असून, कालांतराने भारतातून लुप्त झाली १९६९ मध्ये पूज्य आचार्य श्री सत्यनारायण गोयंकाजीनी म्यानमारमधून भारतात आणली व प्रशिक्षण कार्यास आरंभ केला. इगतपुरी हे प्रमुख केंद्र असून जगात जवळजवळ १८० केंद्रे विनामूल्य चालविली जातात पुण्यात स्वारगेट जवळ नेहरु स्टेडीयम समोर व आळंदी जवळ मरकळ या गावी ही केंद्र चालविली जातात. दरमहा सरासरी १०० लोक प्रतिक्षायादीवर असतात www vridhamma.org या वेबसाईटवर ऑनलाईन बुकिंग करता येते ताणतणावाच्या या स्पर्धेच्या युगात आनंदाने जीवन जगण्यासाठी मनाला सबळ व निर्मळ करणं ही अत्यावश्यक बाब असल्यामुळे, मित्रांनो दहा दिवसासाठी नक्कीच या मनाच्या व्यायामशाळेत या मनाच्या व्यायामशाळेत जाता जाता आपण या मनासाठी एकच गाणं म्हणू या-
“आ चल-मैं तुझे,
मैं लेके चलूँ,
एक ऐसे गगन के तले,
जहाँ गम भी ना हो -आँसू भी ना हो, बस प्यार ही प्यार पले !”
आपला परिवार नागेबाबा परिवार
-डॉ. दत्ता कोहिनकर
(सुखी जीवनाची गुरुकिल्ली अर्थात मनाची मशागत या पुस्तकातून)
