शुभम शिकेंच्या खुनाची बातमी वाचली, टि व्ही. सिरियलचा आधार घेवून हे कृत्य केल्याची त्या अल्पवयीन मुलांनी कबुली दिली पालक मित्रांनो सावधान! आपण स्वतःच आपल्या मुलांना संकटाच्या भयानक दरीत फेकत आहोत सावधान आज मुले अॅडमिट होत चालली आहेत. बऱ्याच घरांमध्ये आज विद्यार्थीदशेतच गुंड, मवाली, व्यसनी, व्याभिचारी, स्वार्थी, चोरटी जमात वाढत आहे याला जबाबदार कोण? पालकमित्रांनो ज्या वयात विद्यार्थ्यांना श्यामची आई, साने गुरुजीच्या कथा, राजा शिवछत्रपती, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीच्या लेकी ही पुस्तके वाचावयास द्यायची होती त्याच वयात आपण त्यांना ६० चॅनेलचा रिमोट दिला. इंटरनेट कनेक्शन दिले मुलाला सोबतीची गरज असतानाही दोघेही पती-पत्नी नोकरी करण्यासाठी घराबाहेर पडले. दिवसभर तो इंटरनेटवर व टि व्ही. वर काय बघतो हे कोण बघणार? ज्या वयात आईचा मायेचा हात, मायेची कुस त्याला हवी असते त्याचवयात त्याला स्वतंत्र खोली दिली जाते. त्याच्या ममतेची निघृण हत्या केली जाते त्याच्या अवास्तव मागण्या प्रेमापोटी पुऱ्या केल्या जातात. पैशाचे बंडल त्यांच्याकडे फेकले जातात. त्याच्या समोर ज्यावेळेस घरात आई-बाबांची प्रचंड भांडणे अक्षरशः मारामाऱ्या होतात. त्यातून ते मूल काय शिकणार ? कधी कधी उतू आलेलं आईबाबांचं प्रेम या मुलांसमोरच वेगळ्या पद्धतीने प्रदर्शित होतं त्यावेळेस या मुलांच्या कोवळ्या मनावर आपण काय कोरतोय याची कल्पना पालकांनी करणे ही काळाची गरज आहे. आपल्या मुलांसमोर दारू पिणारे पालक, काही पालक तर मुलींना सांगतात अगं गोव्याला सहलीला चालली का? मग तेथील… अवश्य घेऊन ये.
मुलांनी टि.व्ही. बघताना दरडावणारा पालक स्वतःच तासनतास टि.व्ही. समोर सिगारेटचा धुर सोडत बसलेला आज पहावयास मिळतोय. मुलींना झाशीची राणी, डॉ. आनंदीबाईची चरित्रे देण्याऐवजी माझ्या मुलीने मॉडेल व्हावे, डान्सर व्हावे म्हणून कमी कपड्यात स्टेजवर “मुनी बदनाम हुई” गाण्यावर नाचणाऱ्या आपल्या छकुलीला दाद देणारे पालक नक्की काय साधणार आहेत? मुलांचे मुलीचे मित्र कोण हे पालक कधी जाणून घेणार? आईच तोकडे कपडे घालून लिपस्टीक लावून मिरवृ लागली, तिलाच मित्रांचे फोन येत असतील तर मुलीना “संस्कारक्षम आई” भेटणार कधी?
भ्रष्टाचार करून घरी दोन नंबरचे पैसे आणणारा बाप मुलांना काय संस्कार देणार? आज मुलांना फार कमी वयात समज येऊ लागली आहे त्यांच्या भावांना पेटवणारे चॅनेल अश्लील पुस्तकांना, पब, रेव्ह पार्ट्याना आज जोरात मागणी होत आहे. पूर्वी घराच्या कोपऱ्यात असलेली छडी आज हरवली गेल्यामुळे मुलांच्या आयुष्याची घडी विस्कटलेली आहे. त्यात मुलांवर अनेक अवास्तव अपेक्षा लादल्या जात आहेत. न आवडणारा अभ्यासक्रम त्यांच्या माथी मारला जात आहे दप्तराचे, क्लासचे ओझे त्यांना असह्य होतंय. संस्कृतीचे विद्रुप रूप तो न्याहाळत आहे. त्यामुळे विद्यार्थी या स्पर्धेच्या युगात नैराश्याकडे वळत आहे. तरूणांच्या आत्महत्या हा आपल्यासमोर गंभीर प्रश्न आहे. गुन्हेगारीमध्ये तरूणांची संख्या दिवसेदिवस वाढत आहे. आपण काय केले याऐवजी आता काय करू शकतो याचा विचार करणे आवश्यक आहे. म्हणून पालकमित्रांनो मुलांना आता सुट्या पडतील, एखाद्या उन्हाळी शिबिराला मोठी फी भरून आपण मोकळे होण्याचा बेत करत असाल? तर थांबा आपल्या मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी पुणे विपश्यना समिती देखील दरवर्षी उन्हाळी शिबिरे “आनापान ध्यान शिबिर” आयोजित करते. वय ९ ते १८ व १६ ते १९ वयोगटाच्या मुलामुलींसाठी या शिबिराचे आयोजन केले जाते. ही संपूर्ण शिबिरे पूर्णपणे विनामूल्य असतात. जुन्या साधकांच्या दानावर हे काम चालते.
या शिबिरांमुळे मुलांची स्मरणशक्ती, बुद्धीमत्ता, एकाग्रता वाढते, भय कमी होते, चंचलता दूर होते, त्यांची शारिरीक, मानसिक व अध्यात्मिक प्रगती साधते. महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवांनी सर्व शाळेत “आनापान ध्यान” सक्तीचे असा अध्यादेश जारी केला आहे. आपल्या मुलांना खऱ्या अर्थाने नैतिकतेचे धडे देण्यासाठी सबल व सशक्त पिढी घडवण्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे, या संधीचा आपण आपल्या कुटुंबासह लाभ घ्या.
वेबसाईट : http://www.vridhamma.org
आपला परिवार नागेबाबा परिवार
-डॉ. दत्ता कोहिनकर
(सुखी जीवनाची गुरुकिल्ली अर्थात मनाची मशागत या पुस्तकातून)
