मंगलमय मार्गाचा जनक

 

इ.स. पूर्व ६२४ मध्ये राजा शुद्धोधन व राणी महामायेच्या पोटी वैशाख पौर्णिमेच्या दिवशी लुम्बीनी वनात- निसर्गाच्या सान्निध्यात सिद्धार्थ गौतम बुद्धाचा जन्म झाला. या बालकामध्ये महापुरूषाची लक्षणे पाहून ऋषी असित कालदेवने भाकित केले की हा फार मोठा महापुरुष होऊन समग्र मानवजातीला दुःखमुक्तीचा मार्ग दाखवेल. भाकिताप्रमाणे सिद्धार्थ गौतम बुद्धांनी दुःखमुक्तीच्या मार्गाचा वैज्ञानिक शोध लावला व लोकांना कर्मकांडापासून, अंधश्रद्धेपासून दूर नेले. ते लोकांना नेहमी सांगायचे ‘मी सांगतो म्हणून एखादी गोष्ट मान्य करू नका, तर तुमच्या अनुभूतीवर उतरल्यावरच ती स्विकारा. तुम्हीच तुमचे गुरू आहात, तुम्हीच तुमचे निर्माते आहात. मी सांगितलेल्या मार्गावर चाला व स्वतः अनुभूती घ्या.
आधुनिक स्पर्धेच्या युगात ताणतणावाचे प्रमाण प्रचंड वाढले असून, मनोरूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आत्महत्या, गुन्हेगारी, घटस्फोट, मानसिक आजारांचा आलेख दिवसेंदिवस उंचावत चाललेला दिसून येतो. मनुष्यप्राण्याला आपल्या मनातील विकारांना तोंड न देता आल्यामुळे संपूर्ण समाज आज नैराश्याने पोखरलेला आहे. दुःखी-कष्टी झाला आहे. जगण्यातील मजाच आज हरवलेली आहे. जगाचे मंगल व्हावे म्हणून भगवान गौतम बुद्धांनी ८२,००० उपदेश केले होते. बुद्धांच्या काळी अनुयायी असलेल्या गृहस्थांची संख्या खूप होती म्हणून या गृहस्थांनी दैनंदिन जीवनात संसार करता-करता काय केले पाहिजे म्हणजे त्यांचे कल्याण होईल हा उपदेश बुद्धांनी केला भगवान बुद्धांनी मानवाचे श्रेष्ठ मंगल कशात आहे ते सांगताना म्हटले ‘अज्ञानी लोकांपासून दूर राहणे, ज्ञानी लोकांची संगत करणे, पूजनीय लोकांची पूजा करणे, उपयुक्त देशात राहणे, पूर्वकर्माचे संचित पुण्य असणे, स्वतः सम्यक रूपाने समाहित राहणे, अनेक विद्या, कला-कौशल्यात निपुण असणे, विनयी राहून सुशिक्षित होणे, सुभाष्य होणे, आई वडिलांची सेवा करणे, परिवाराचे पालनपोषण करणे, आकुल-व्याकुल करणार नाही असा व्यवसाय करणे, दान देणे, धर्माचरण करणे, नातेवाईक व संबंधितांना मदत करून सांभाळणे, वर्जित दुष्कर्मे न करणे, तन-मनाने पापाचा त्याग करणे, मद्यपानापासून दूर राहणे, कुशल धर्माचं पालन करण्यात नेहमी जागरूक असणे, पुण्य व्यक्तींचा गौरव करणे, नेहमी विनम्र राहणे, संतुष्ट राहणे, कृतज्ञ राहणे, योग्यवेळी धर्मश्रवण करणे, सहनशीलता वाढवणे, आज्ञाधारक असणे, श्रमणांचे दर्शन करणे व योग्यवेळी धर्मचर्चा करणे, तपाचरण करणे, ब्रह्मचर्याचे पालन करणे, चार आर्य-सत्याचे दर्शन करणे, निर्वाणाचा साक्षात्कार करणे, चित्त विचलित होऊ न देणे, शोकरहित निर्मळ व निर्भय राहणे, लाभ-नुकसान, यश-अपयश, निंदा-स्तुती व सुख-दुःख यात मनाची समता ढळू न देणे. वरील मंगल धर्माचे पालन केल्याने मनुष्याचे उत्तम मंगल होते है सांगताना बुद्धांनी शीलपालन करण्याचा उपदेश केला हत्या करू नये, चोरी करू नये, व्यभिचार करू नये, खोटे बोलू नये, असे कुठलेही काम करू नये ज्यामुळे दुसऱ्याची हानी होईल. अनंत मैत्री जागवून – शत्रूवर प्रेम करा हे सांगणाऱ्या गौतम बुद्धांना शरण जावून त्यांच्या उपदेशाला आपल्या दैनंदिन जीवनात आचरणात आणूया, त्यासाठी ध्यानाने (विपश्यना ध्यान साधनेने) मन शुद्ध करूया, हीच खरी बुद्धवंदना होय.
“सारे मानव प्राणी-ना उच-नीच ना कोणी, कोणीही यावे, शुद्ध व्हावे -बुद्धांच्या चरणी !”

 

आपला परिवार नागेबाबा परिवार

-डॉ. दत्ता कोहिनकर

(सुखी जीवनाची गुरुकिल्ली अर्थात  मनाची मशागत या पुस्तकातून)

 

error: Content is protected !!