पाय जमिनीवर असू द्या

रामभाऊ सुपरवायझर म्हणून कंपनीत कामाला लागला. त्याचे चांगले काम बघून कंपनीने त्याला मॅनेजर पदावर प्रमोशन दिलं. मॅनेजर झाल्यानंतर रामभाऊचा अहंकार वाढला. तो लोकांशी बोलताना अरे-तुरे बोलू लागला. लोकांना दरडाऊ लागला. आपल्या अहंकाराला पुष्ट करण्यासाठी त्याने लोकांना सांभाळून न घेता लोकांवर कारवाया चालू केल्या. कामगारांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला. मॅनेजर कामगार हा भेद त्याने पुष्ट केला. त्यामुळे त्याच्या विरोधात आंदोलन झाले. याचे पर्यवसन व्यवस्थापनाने रामभाऊला कामावरून कमी केले.
मित्रांनो, बघा अहंकाराला बिलगल्यामुळे काय होऊ शकते. म्हणून नेहमी नम्र रहा. पद, प्रतिष्ठा बाजूला ठेवा व माणुसकीचा विकास करा.
या संदर्भातली एक गोष्ट मला मुद्दाम सांगावीशी वाटते. अमेरिका स्वतंत्र झाल्यानंतर रस्त्याच्या कडेला एक लष्कराची गाडी खड्ड्यामध्ये फसली गेली होती. गाडीतील शिपाई उतरून तिला खड्ड्यातून बाहेर काढण्यासाठी ढकलण्याचा प्रयत्न करत होते, परंतु त्यांचा जो अंमलदार होता, तो फक्त हुकूम देत लांबच उभा होता. तो त्यांना मदत करत नव्हता. त्याने जर मदत केली असती तर गाडी निधणे सोपे झाले असते. परंतु मी अधिकारी हा पदाचा मान तो डोक्यात घेऊन थांबला होता. थोड्यावेळाने पाठीमागून एक गाडी आली. त्या गाडीतून एक गृहस्थ उत्तरला व त्याने या शिपायांना गाडी खड्ड्यातून बाहेर काढण्यासाठी अर्थात ढकलण्यासाठी मदत केली. गाडी खड्यातून बाहेर निघाली. त्या ठिकाणावरून निघताना तो सज्जन त्या अंमलदाराला म्हणाला, ‘परत कधी तुला गरज पडली तर मला नक्की बोलाव’ आणि त्याने आपले व्हिजिटिंग कार्ड त्या अंमलदाराला दिले. त्या अंमलदाराने ते वाचले व त्याला दरदरून घाम फुटला. कारण मदतीला आलेला तो सज्जन अमेरिकेचा सर्वेसर्वा अध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन होता.
मित्रांनो, कितीही मोठे झाला, तरी चांगल्या कामासाठी पुढे या व लोकांना मदत करा. आपले पाय जमिनीवर असू द्या. पद प्रतिष्ठा हे सर्व क्षणभंगुर आहे.

 

आपला परिवार नागेबाबा परिवार

-डॉ. दत्ता कोहिनकर

(सुखाचा पासवर्ड या पुस्तकातून)

error: Content is protected !!