कौटुंबिक न्यायालयामध्ये सुनीताने आपल्या पतीच्या विरोधात फारकत मिळण्यासाठी अर्ज केला होता. समुपदेशकांनी समुपदेशन केले. परंतु सुनीता नवऱ्याकडे राहायला तयार नव्हती, आणि घटस्फोट घेण्यासाठी ३० लाख रुपयांची मागणी करत होती. थोडंफार अॅडजस्ट करून पती तिला नांदवायला पण तयार होता. परंतु घटस्फोट घेण्याचा सुनीताचा निर्णय ठाम होता. ३० लाख रुपयासाठी ती चार वर्ष कोर्टामध्ये चकरा मारत होती. परंतु समजोता करायला तयार नव्हती. सुनिताचं आणि माझं या विषयावर बोलणं झालं.
सुनीताला मी एक गोष्ट सांगितली. सुनिता, एक फार मोठा अब्जाधीश माणूस होता. त्याने करोडो रुपये कमावले होते. एक दिवस यमराज त्याला नेण्यासाठी आला आणि यमराजाने त्याला सांगितलं की, ‘पाच मिनिटात आता आपल्याला निघायचं आहे.’ त्या वेळेला त्या माणसाने यमराजाला विनंती केली की, ‘आयुष्यामध्ये बायका मुलांबरोबर कधी वेळच घालवला नाही. कधी आयुष्यात मजा पण केली नाही. आयुष्याचा आनंद पण घेतला नाही. तू मला एक दिवस वाढवून दे, तुला मी पन्नास कोटी रुपये देतो.’ यमराजाने त्याला सांगितले, ‘फक्त चार मिनिट उरली आहेत. लवकरात लवकर निघायची तयारी कर.’ यमराजचे हे उत्तर ऐकून तो यमराजाला एक दिवस आयुष्याचा वाढवून देण्यासाठी निम्मी संपत्ती द्यायला तयार झाला. यमराज म्हणाला, ‘तीन मिनिटे उरले आहेत, लवकरात लवकर निघण्याची तयारी कर.’ शेवटी तो यमराजाला म्हणाला, ‘माझी आख्खी संपत्ती तुला देतो, पण एक दिवस वाढवून दे.’ यमराजाने त्याला सांगितले, ‘अजिबात नाही. दोन मिनिट राहिली आहेत, तुला माझ्याबरोबर निघायचं आहे.’ सुनिता, अख्खी संपत्ती, करोडो रुपये देऊन देखील यमराज एक दिवस आयुष्य वाढवून द्यायला तयार नाही. आता ३० लाख रुपये मिळाले व सायंकाळी मृत्यू आला तर आयुष्यातली चार-पाच वर्षे आपण मनावर किती प्रकारचे ओरखडे ओढले आहेत. स्वतःला किती त्रास करून घेतला आहे, मनाची किती हानी करून घेतली आहे, याचा विचार कर व मध्यम मार्ग काढ. ती भानावर आली. मध्यम मार्गाला तयार झाली. दोघांनीही आपापले रस्ते निवडले. दोघेही आज सुखात आहेत. मध्यम मार्ग हा नेहमी सुखाकडे नेतो. हे लक्षात ठेवा.
आपला परिवार नागेबाबा परिवार
-डॉ. दत्ता कोहिनकर
(सुखाचा पासवर्ड या पुस्तकातून)
