अभय, मला वेळ घेऊन ऑफिसवर भेटायला आला. आल्यानंतर मी अभयला म्हटलं, ‘बोला साहेब काय सेवा करू?’
अभयच्या डोळ्यात एकदम पाणी आले. अभय अश्रू पुसत म्हणाला, ‘सर, माझा मुलगा व्यसनाच्या विळख्यात अडकला आहे. दारू व सिगारेटच्या पूर्णतः आहारी गेला आहे. आत्तापर्यंत त्याने घरामध्ये माझे व पत्नीचे पैसे चोरले. पण अलीकडे तो बाहेर देखील चोऱ्यामाऱ्या करायला लागला आहे. परवा तर त्याने बिल्डिंग मधील मर्सिडीज कारचा लोगो काढून घेतला व तो विकला. सीसीटीव्ही फुटेज मध्ये ते दिसून आल्यामुळे बिल्डिंगमध्ये माझी पार अब्रू गेली आहे. शिक्षणाकडे नीट लक्ष देत नाही. घरामध्ये थांबत नाही. रात्री उशिरा मध्यरात्री घरी येतो. काही बोलायला गेलं तर शिवीगाळ करतो. माझा एकुलता एक मुलगा आहे. त्यामुळे मला काही सूचेनासं झालंय. सर याबाबत मला मदत करा.’
मित्रांनो, मी ताबडतोब अभयच्या मुलाला एका व्यसनमुक्ती केंद्रामध्ये अॅडमिट केले. व्यसनमुक्ती केंद्रातून बाहेर आल्यानंतर त्याला विपश्यनेच्या शिबिराला पाठवले. आता तो व्यसनातून बाहेर आला आहे. वेळीच टाका टाकल्यामुळे शर्ट जास्त फाटला नाही. बंधू-भगिनींनो गोष्ट सांगायचे कारण हेच की, बरेच पालक मुलांकडे दुर्लक्ष करतात. मुलगा आहे त्याला कोण खातंय? तो कुठेही फिरू शकतो, त्याची काय काळजी करायची? असा विचार करतात. त्यामुळे आपला मुलगा कोठे असतो? कोणाबरोबर असतो? काय करतो? या सर्व गोष्टीपासून पालक अनभिज्ञ असतात. तरुण वयामध्ये वैचारिक अपरिपक्वता असल्याने चुकीची संगत मिळाली की, मुले व्यसनांच्या किंवा वाईट गोष्टीच्या, नशेच्या आहारी लवकर जाऊ शकतात. त्यातून त्यांचे आयुष्य उध्वस्त होऊ शकते. बरीचशी तरुण मुलं आज गुन्हेगारी क्षेत्रामध्ये अडकल्याचे दिसून येते. त्यामुळे जशी आपण आपल्या मुलीची काळजी घेतो. तशी पालकांनी मुलांवर देखील दुरून का होईना पूर्णतः लक्ष ठेवले पाहिजे. काळजी घेण्याबाबत मुलगा आणि मुलगी हा भेदभाव आता करता कामा नये. वेळीच लक्षात आले तर त्यांना सावरणं खूप सोपं होतं. म्हणून आपल्या मुलाचीपण योग्य ती काळजी घ्या, म्हणजे आपणास काळजी करावी लागणार नाही.
आपला परिवार नागेबाबा परिवार
-डॉ. दत्ता कोहिनकर
(सुखाचा पासवर्ड या पुस्तकातून)
