रांजणगाव भागामध्ये माझ्या ‘मनाची अमर्याद शक्ती’ या कार्यशाळेमध्ये मी श्रोत्यांना म्हणालो, ‘मित्रांनो, काही गैरसमजाने किंवा आपल्या अहंकारामुळे जर एखादी व्यक्ती आपल्यापासून दूर गेली असेल तर, त्या व्यक्तीला शांतपणे डोळे मिटून डोळ्यासमोर आणा व त्याच्याविषयी चांगल्या भावनेने मंगलमैत्रीचा अभ्यास करा. त्या व्यक्तीला एक मिस कॉल द्या.’
त्या गावातील एका शेतकरी कुटुंबामध्ये त्याच्या मुलाबरोबर वडिलांची थोडी कुरबुर झाली होती. त्यामुळे मुलगा आपल्या कुटुंबाला घेऊन जवळच एका चाळीमध्ये भाड्याने राहायला गेला होता. हा शेतकरी त्याच्या पत्नीचे निधन झाल्यामुळे एकटा होता. त्यामुळे तो खानावळीत जाऊन जेवायचा. परंतु अहंकारामुळे सहा महिने मुलगा व वडील एकमेकांशी बोलत नव्हते व भेटतही नव्हते. शेतकऱ्याला नातवंडाची खूप आठवण यायची. कधीकधी एकटा असताना रडू यायचे. कधीकधी पोराला व नातवंडाला भेटायची इच्छा व्हायची. परंतु लगेच माझ्या मनात यायचे की, पोरानेच माझी माफी मागावी, मी कशाला त्याला फोन करू.
शेतकरी व्याख्यानांमधली ही गोष्ट ऐकून अत्यंत भाऊक झाला व त्याने मुलाला मिसकॉल दिला. वडिलांचा मिसकॉल पाहून, मुलाचा सायंकाळी शेतकऱ्याला फोन आला. मुलगा रागातच म्हणाला, ‘काय फोन केला होता का? काय काम आहे?’
शेतकऱ्याला मुलाचा आवाज ऐकून रडू कोसळले. वडिलांचे फोनवरील हे रडणे ऐकून, मुलगा म्हणाला, ‘दादा, रडू नको मी आलोच.’ शेतकऱ्याचा मुलगा शेतकऱ्याच्या नातवंडाला घेऊन घरी आला. शेतकऱ्याने मुलाला व नातवंडाला एकदम जवळ घेतले व ओक्साबोक्सी रडला. मुलाने शेतकऱ्याची माफी मागितली व त्यांचे संबंध सुधारले.
मित्रांनो, आता मुलगा रोज वडिलांना घरचा डबा आणून देतो. नातवंडांना शेतकऱ्याजवळ सोडतो. मुलगा व सुनबाई शेतकऱ्याची काळजी घेत आहे. शेतकरी आज खूप आनंदी आहे. थोडा अहंकार दूर ठेवून आपल्यापासून दूर गेलेल्या व्यक्तीला एक मिसकॉल देऊन बघा. हा मिसकॉल जादू करू शकतो. व ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात परत येऊ शकते. शेवटी सारा खेळ कर्माचाच.
आपला परिवार नागेबाबा परिवार
-डॉ. दत्ता कोहिनकर
(सुखाचा पासवर्ड या पुस्तकातून)
