‘रॉबिष’ कंपनीचे शेअर विक्रीसाठी फक्त दोनच दिवस उपलब्ध होते. सारंगला या कंपनीविषयी खूप चांगला अभ्यास होता. त्याला पूर्णतः माहीत होतं या कंपनीची प्रगती खूप चांगल्या पद्धतीने आहे. त्यामुळे शेअरला खूप चांगले मार्केट येणार आहे. म्हणून या कंपनीचे शेअर घेतले तर नक्कीच आपल्याला फायदा आहे, असा विचार त्याच्या मनात आला. परंतु तो फक्त मनापुरताच मर्यादित राहिला. त्याने शेअर घेण्याची कृती केलीच नाही. दोन दिवसाने शेअर मिळणे बंद झाले.
म्हणून मित्रांनो, विचारांना कृतीची जोड आवश्यक आहे. कृतीविना विचार काय कामाचे? मराठीत एक म्हण आहे ‘बोलाचीच कढी अन् बोलाचाच भात.’ त्यामुळे काही माणसं फक्त बोलतच राहतात. परंतु कृतीच्या बाबतीत त्यांचे पाऊल पुढे पडत नाही. त्यामुळे त्यांची म्हणावी तशी प्रगती होत नाही.
एका राज्यावर एकदा परकीय आक्रमण करणार अशी बातमी राजाला कळाली. राजाने त्वरित राजसभा बोलावून या आक्रमणाला तोंड देण्यासाठी काय काय करणे अपेक्षित आहे? यासाठी विचार विनिमय चालू केला. राज्याच्या बांधकामाचा प्रमुख म्हणाला, ‘आपण तटबंदी बांधून त्या भोवती खड्डा करूया म्हणजे आपण सर्वजण सुरक्षित राहू.’ सुतार म्हणाले, ‘लाकडाची मजबूत भिंत बांधू’ चर्मकार म्हणाले, ‘चामड्यासारखी मजबूत वस्तू जगात नाही. त्यामुळे त्याच्याच भिंती तयार करू.’ लोहार म्हणाले, ‘फॅब्रिकेशनंनी सगळी सीमा आपण लोखंडाची भक्कम वेल्डिंग करून टाकू.’ राजदरबारातील वकील म्हणाले, ‘आक्रमण करणाऱ्यांना तुम्ही दुसऱ्याची मालमत्ता लुबाडता ही चूक आहे हे युक्तिवादाने पटवून देऊ.’ काही अध्यात्मिक माणसे म्हटली, ‘आपण यज्ञ करून देवदेवतांना प्रसन्न करून घेऊ.’
मित्रांनो, सर्वजण आपापल्या परीने या चर्चासत्रात बोलतच राहिले. हे चर्चासत्रात तब्बल दोन दिवस चालले होते. त्याविषयी लवकर एकमत झाले नाही. त्यामुळे विलंब झाला आणि कोणत्याही प्रकारची कृती केली गेली नाही. दोन आठवड्यांनी डायरेक्ट परकीय लोकांनी आक्रमण केले व सर्वांना आपल्या ताब्यात घेऊन राजधानी काबीज केली.
म्हणून मित्रांनो, नुसती चर्चा करत बसणे, यातून काहीही साध्य होत नाही. नुसता विचार करत बसला आणि कृती केली नाही, तर आपला पराभव हा ठरलेला आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळे विचारांना कृतीची जोड द्या. व जीवनामध्ये कृतीला महत्त्व द्या. कॅल्क्युलेटेड रिस्क घेण्यास घाबरू नका.
आपला परिवार नागेबाबा परिवार
-डॉ. दत्ता कोहिनकर
(सुखाचा पासवर्ड या पुस्तकातून)
