स्पर्धा इतरांशी नको

आयुष्यामध्ये बऱ्याचदा आपण इतरांशी आपली तुलना करत असतो. त्याने एवढं मिळवले, मला का नाही मिळवता आले. तो एवढा पुढे गेला, मी का मागे राहिलो? त्याला एवढी प्रतिष्ठा मिळाली, मला का नाही लोकं सन्मान देत ? अशा अनेक प्रश्नांनी स्वतःला त्रास करून घेत असतो.
मित्रांनो, प्रत्येक व्यक्ती ही भिन्न आहे. प्रत्येक व्यक्तीचा मानस हा वेगळा आहे. एखादी व्यक्ती एखाद्या विषयात एक्सपर्ट असेल, तर दुसरी व्यक्ती दुसऱ्या विषयात एक्सपर्ट असेल. त्यामुळे इतरांशी स्पर्धा करण्याच्या क्रियेत पडाल तर मानसिक त्रासच पदरात पडेल. त्यापेक्षा स्वतःची स्पर्धा, स्वतःबरोबर करा.
अकबर बादशहाने बिरबलाला एक कोंबडा दिला व सांगितले, ‘बिरबला, या कोंबड्याला एक महिना कुठल्याही कोंबडी किंवा कोंबड्याशी संपर्कात येऊ देऊ नकोस. एक महिन्यानंतर या कोंबड्याची झुंज शाही कोंबड्यांबरोबर मी लावणार आहे. तू त्याला असं ट्रेनिंग दे की, शाही कोंबड्याचा त्याने पराभव केला पाहिजे.’
बिरबलाने राजाचे हे आव्हान स्वीकारले. एक महिन्यानंतर बिरबलाचा कोंबडा व शाही कोंबडा एकमेकांसमोर सोडले. बिरबलाच्या कोंबड्याने शाही कोंबड्याला मारुन मारुन पार घायाळ करून टाकले. अगदी रक्तबंबळ केले आणि बिरबलाचा कोंबडा जिंकला.
राजाने बिरबलाला विचारले, ‘एकही कोंबडा किंवा कोंबडी संपर्कात न आणता याला तू हे ट्रेनिंग कसे दिले?’ त्यावेळेला बिरबलाने सांगितले, ‘महाराज, मी याला एका खोलीमध्ये बंद करून ठेवले होते. या खोलीला आतून सर्व बाजूने आरसे लावले होते. त्यामुळे आरशात हा स्वतःचं प्रतिबिंब पाहायचा आणि झेप घेऊन स्वतःवरच अटॅक करायचा. स्वतःशी लढाई करण्याची याला पूर्ण महिनाभर सवयच लावून ठेवली होती. त्यामुळे शाही कोंबड्याला याने पराभूत केले. कारण, रोज हा स्वतःशी लढून मजबूत बनण्याचा प्रयत्न करत होता.
मित्रांनो, स्वतःशी लढाई ही खूप महत्त्वाची असते. काल आपण जे होतो, त्याच्यापेक्षा आज अजून जास्त काय मिळवले आहे? यावर आपलं भविष्य अवलंबून असतं. म्हणून कालच्यापेक्षा आज प्रगत व्हा. कालच्या पेक्षा आज ज्ञान वाढवा. अशा त-हेने स्वतःशी स्पर्धा करत तुम्ही आपल्या जीवनाचे सोने करू शकता. त्यामुळे स्पर्धा स्वतःशी करा. इतरांशी तुलना करणे हे पाप आहे.

 

आपला परिवार नागेबाबा परिवार

-डॉ. दत्ता कोहिनकर

(सुखाचा पासवर्ड या पुस्तकातून)

error: Content is protected !!