लोक अनुकरण करतात

समुद्राच्या किनाऱ्यावर भरती-ओहोटीचा वेग जोरात चालू असतो. भरतीची लाट जोराने किनाऱ्यावर आदळल्यानंतर त्यात बरेचसे मासे किनाऱ्यावर आदळून पडायचे व लाट पूर्वपदावर जायची, त्यामुळे काही मासे किनाऱ्यावर पाण्याचा संपर्क तुटल्यामुळे तडफड करायला लागायचे एका मुलाने या माशांना तडफड करताना पाहून, त्यांना उचलून तो समुद्राच्या पाण्यामध्ये भिरकवून टाकू लागला. त्याचं हे कृत्य बघून अनेक जण त्याचे अनुकरण करून किनाऱ्यावर तडफडत असलेले मासे पाण्यात फेकू लागले. त्यामुळे शेकडो माशांचा जीव वाचू लागला.
मित्रांनो, माणसे अनुकरणप्रिय असतात. एखाद्याने सिग्नल तोडल्यानंतर काही जण लगेच त्याचे अनुकरण करावयाला लागतात. अनुकरणाबाबत महात्मा गांधींची एक गोष्ट मुद्दाम सांगावीशी वाटली. गांधीजी सकाळी फिरायला जात असताना त्याच्या लक्षात आले की, आश्रमाच्या बाहेर महिलाश्रमाकडे जाण्यासाठी जो रस्ता होता, त्या रस्त्यावर खूप खड्डे पडले होते. त्यामुळे बऱ्याच महिलांना चालताना खूप त्रास व्हायचा. पाय अडखळायचा. ठेच लागायची. त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने पक्का रस्ता होणे आवश्यक होते. महात्मा गांधीजींनी याच्यावर एक स्वत. च उपाय शोधला. सकाळी फिरायला जाता-येता ते आपल्या पंचामध्ये दगड उचलून आणायचे व त्या खड्यांमध्ये टाकत राहायचे. त्यांचं हे काम पाहून त्यांच्या सोबतच आलेले बरेचसे आश्रमातील लोकांनी त्यांचं अनुकरण करणे सुरू केले. आणि रोज शेकडो लोक छोटे छोटे दगड आणून त्या खड्क्यांमध्ये टाकू लागले. काही जणांनी पिशवीमध्ये माती आणून त्या खड्ड्यांत टाकली. त्यांच्यासोबत फिरायला येणाऱ्या आश्रमातील सगळ्यांनी हा प्रयोग चालू केला व पाहता पाहता महिलाश्रमाचा तो रस्ता एकदम व्यवस्थित झाला.
मित्रांनो, माणसं अनुकरणप्रिय असतात. त्यामुळे तुम्ही चांगल्या गोष्टी केल्या की, लोक तुमचा अनुकरण करू लागतील. सार्वजनिक कामात सर्वांनी कर्तव्यभावनेने आपापला वाटा उचलला तर, काम लवकर, चांगलं आणि सुंदर होऊन निश्चितच आपला व समाजाचा विकास होतो.

 

आपला परिवार नागेबाबा परिवार

-डॉ. दत्ता कोहिनकर

(सुखाचा पासवर्ड या पुस्तकातून)

error: Content is protected !!