कोरोनामध्ये संजयची नोकरी गेली. संजय एका कारखान्यात टूल विभागात काम करत होता. त्यामुळे त्याला टूलस्क्रिप्टचे चांगले ज्ञान होते. नोकरी गेल्यानंतर आता काय करायचे? या विचाराने तो खूप अस्वस्थ झाला व नशिबाला दोष देऊ लागला काही महिन्यानंतर त्याच्या अंतर्मनाने त्याला वेगवेगळ्या कंपन्यांना टूलची गरज असते, ते सप्लाय करण्याची आयडिया दिली. त्याने वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये जाऊन संपर्क करून काम मिळवले व आज तो अनेक कंपन्यांचा टूल सप्लायर म्हणून कोट्यावधी रुपयाचा टर्नओव्हर करत आहे. दरमहा पगारापेक्षा चारपट जास्त रुपये त्याला मिळत आहे.
मित्रांनो, काही आपत्ती ईश्वर आपणास देतो. त्यावेळेला आपल्याला खूप वाईट वाटतं. परंतु त्या आपत्तीच्यामागे ईश्वराची वेगळी रचना असते. त्या रचनेमुळे आपला लाभच होतो. त्याला इष्ट आपत्ती असे म्हणतात. अशीच एक घटना मुद्दाम सांगावीशी वाटली.
भर समुद्रात एक बोट फुटली, एक माणूस वाचला आणि एका छोट्या बेटाच्या किनाऱ्याला लागला. तो म्हणाला, देवा, तुझा चमत्कार अद्भुत आहे. तू माझा जीव वाचवलास. त्याने त्या निर्जन बेटावर झावळ्यांची, पानांची एक झोपडी बांधली. त्यात तो राहू लागला. मासे मारून, फळं तोडून खाऊ लागला. कधीतरी एखादं जहाज जवळून जाईल आणि आपली सुटका होईल, अशी त्याला आशा होती.
तो सतत देवाची प्रार्थना करत असायचा. एक दिवस तो फळं गोळा करून परत आला. तेव्हा त्याची झोपडी जळत होती, धुराचे लोट आकाशात उठत होते. ते दृश्य पाहून तो वेडापिसाच झाला. परमेश्वराला कोसू लागला. तू निर्दय आहेस, माझा आसरा हिरावून घेतलास. देव आहेस की सैतान, असं बोलू लागला. तेवढ्यात एक जहाज त्याच्या बेटाच्या दिशेने येताना दिसलं. त्या जहाजवाल्याने त्याला जहाजामध्ये घेतलं.
बेटावरून सुटका होऊन जहाजावर आल्यावर त्याने कॅप्टनला विचारलं. ‘या बेटावर मी अडकलोय, हे तुम्हाला कसं समजलं?’
कॅप्टन म्हणाला, ‘तू धुराचा सिग्नल दिला होतास ना, त्यावरून.’
मित्रांनो,
निसर्गाची यंत्रणा ही बुद्धीच्या पलीकडे असते. त्यामुळे पृथ्वीवर माणूस उपराच.
आपला परिवार नागेबाबा परिवार
-डॉ. दत्ता कोहिनकर
(सुखाचा पासवर्ड या पुस्तकातून)
