लोकांना मदत करा

अचानक पहाटेच्या सुमारास बिल्डिंगमध्ये एका फ्लॅटमध्ये आजोबांच्या कण्हण्याचा आवाज आला. थोडी गडबड कानी आली. मी लगेच दार उघडून त्यांच्या घरापाशी गेलो. पाहतो तर काय, आजोबा अस्वस्थ झाले होते. त्वरित मी त्यांच्या मुलाला व कुटुंबियांना आधार देत आजोबांना दवाखान्यात नेण्यासाठी त्यांना चलवायला लागलो. परंतु त्यांना चालता येत नव्हते. त्वरित मी बेडवरील एक बेडशीट घेतले. त्या बेडशीट वर आजोबांना झोपवले आणि मी व त्यांच्या घरच्यांनी ते बेडशीट सावकाश उचलून, लिफ्टमधून आजोबांना खाली आणून कारमध्ये बसवले. आणि आम्ही आजोबांना दवाखान्यात घेऊन गेलो व दवाखान्यात त्वरित उपचार चालू केले. मी त्यांच्या घरच्यांना मानसिक आधार दिला. आर्थिक देखील काही मदत लागली तर सांगा, म्हणून सांगितले.
मित्रांनो, या ठिकाणी मी वाचलेली एक घटना, ज्या घटनेने आयुष्यात मला प्रभावित केले. ती पुढील प्रमाणे –
साबरमती आश्रमात ओट्यावर कस्तुरबा आणि कुसुमबेन झोपल्या होत्या. रात्रीची वेळ होती. एकदम पावलांचा आवाज झाल्यामुळे कस्तुरबा जाग्या झाल्या. त्यांनी कुसुमबेनला उठवलं. पाहतात तर काय, महात्मा गांधीच्या बिछान्यावर कोणीही नव्हतं, तो रिकामा होता. त्यांनी विचार केला महात्मा गांधी कुठे गेले असतील? म्हणून त्या दोघी दरवाजा उघडून आश्रमाच्या आवारात गांधीजींना शोधू लागल्या. तद्नंतर बऱ्याच अंतरावर त्यांना गांधीजी दिसले. त्या दोघीनी जाऊन गांधीजींना विचारले, ‘अहो काय झालं, तुम्ही इकडे का आलात?’
त्यावेळेला गांधीजी म्हणाले, ‘रस्त्यावर कुणालातरी बहुतेक काहीतरी मार लागला असावा किंवा काहीतरी चावलं असावं, म्हणून तो खूप आक्रोश करत होता. त्याचा आवाज ऐकून मी येथे पळत आलो. कारण संकटसमयी दुसऱ्याची मदत करावी हा माझा स्वभाव आहे. आणि ही मदत करताना वेळ आणि काळ पाहू नये. तातडीने मदत करणे हीच खरी माणुसकी आहे, हाच खरा धर्म आहे. महात्मा गांधी नेहमी लोकांच्या मदतीसाठी बाहेर पडत.
म्हणून मित्रांनो, कोणी संकटात असेल तर आपला जास्त विचार न करता, वेळकाळ बाजूला ठेवून तातडीने त्याला मदत करा व माणुसकी जपा.

 

आपला परिवार नागेबाबा परिवार

-डॉ. दत्ता कोहिनकर

(सुखाचा पासवर्ड या पुस्तकातून)

error: Content is protected !!