बदल

 

मुंबईवरून व्यवसायानिमित्त बऱ्याचदा पुण्यात येणाऱ्या सचिन ओसवाल नावाच्या माझ्या परिचयाच्या व्यापाऱ्याला मी टॅक्सीचालक रामप्रसादचा फोन नं. दिला होता, व त्याच्या उत्कृष्ट सेवेची व इमानदारीची स्तुती केली होती. सचिनने रामप्रसादला फोन करून सकाळी ११ वा. लोहगाव विमानतळावर बोलाबले होते. विमानतळावर बरोबर ११ वाजता विमानातून उतरल्यानंतर सचिनशेठला रिसिव्ह करण्यासाठी ‘वेलकम सचिन ओसवाल’ असा बोर्ड घेऊन रामप्रसाद थांबलेला सचिनला दिला. सचिनने त्याला हस्तांदोलन करताच त्यांच्या हातातली बॅग घेऊन त्यांच्या डोक्यावर ऊन लागू नये म्हणून छत्री घरत रामप्रसादने कारचा दरवाजा उघडून आत बसवले. अत्यंत चकाचक-स्वच्छ गाडी, नीटनेटका पोषाख व पॉलीश केलेले बुट, गाडीत दरवळत असलेला परफ्युमचा सुगंध, टेपवर वाजत असलेले गीतरामायण, सचिनला फार प्रसन्न वाटले.
त्याने त्वरित एसी चालू करून सचिनशेठला बिसलरीची सिलबंद छोटी बाटली पाणी पिण्यासाठी दिली व त्यांची आवड विचारून जुनी गाणी टेपवर लावली. गाडीत वर्तमानपत्र, मासिके ठेवली होती. हॉटेलवर पोहचल्यावर त्याने सामान रूमवर ठेवून उत्कृष्ट अशी सेवा दिली होती. ती पण मीटरच्या दरातच. रामप्रसादचे टाईम-कीपीग-स्वच्छता-सेवाभाव-मैत्रीची वृत्ती यासारख्या चांगल्या गुणांमुळे रामप्रसादने सचिनसारख्या अनेक उद्योगपतीची भने जिंकली होती. पूर्वी गबाळयासारखा राहणारा भाड्याची टॅक्सी चालवून जेमतेम पोट भरणारा रामप्रसाद एका ‘बदल घडवा’ या व्याख्यानाने प्रभावित होऊन स्वतःत बदल करून लोकांना उत्कृष्ट सेवा देत देत ४ टॅक्सीचा मालक झाला होता.
मित्रांनो जग हे परिवर्तनशील आहे, असे भगवान बुध्द म्हणतात भगवद्‌गीतेत पण सांगितले आहे,
जो आज तुम्हारा है, वो कल किसी और का,
परसो किसी और का रहेगा ।
परिवर्तन संसार का नियम है।
म्हणून बदलाचा आनंदाने स्वीकार करून सकारात्मक विचारांच्या आधारे जीवनाला आकार देणे आपल्याच हातात असते.
रूटीन कामातील आयुष्यातील बदल हा आपणास नको असतो गौतम बुध्द म्हणतात बदलाचा त्रास होत नाही, त्याला आपण जो विरोध करतो त्याचा आपल्याला त्रास होत असतो.
काळानुसार काही कंपन्यांनी आपली उत्पादने न बदलल्यामुळे आज त्यांचे अस्तित्व नष्ट झाले आहे. तुटे हुए फुल का रंग भी बदल जाता है मनुष्य को परिस्थिती की अनुरूप बदलना जरूरी होता है। बदल घडवण्यासाठी मनाची मशागत करणे जरूरीचे असते. किरण बेदींनी तिहार तुरुंगात ध्यानाच्या व योगाच्या माध्यमातून कैदयांच्या मनोवृत्तीत बदल घडवला होता. सकारात्मक बदल घडवण्यासाठी सज्जन लोकांच्या संगतीत राहणे गरजेचे असते. अंगुलीमाल गौतम बुध्दांच्या व वाल्या नारदमुनीच्या संपर्कात येऊन पूर्णतः बदलून गेले होते.
चोराला पकडण्यासाठी मागे लागलेल्या गावकऱ्यांना चकवण्यासाठी चोर पळता पळता शर्ट काढून मंदिरातील भस्म अंगाला लावून तेथे ध्यानाला बसतो. गावकरी संत समजून त्या चोराच्या पाया पडून येथून चोराला पळताना पाहिले का म्हणून विचारतात. साधे साधुचे ढोंग घेतल्यानंतरही गावकरी पाया पडतात तर खरा साधु झालो तर काय? या विचाराने चोर संन्यास घेतो व त्यांचे जीवनच बदलून जाते. आपण कितीही वाईट कामे केलेली असली तरी जे झाले गेलं-गंगेला मिळाले, लेट गो म्हणून सोडून द्या व बदलाच्या जहाजात बसून नैतिक मूल्यांची जोपासना करा.
कलिंगामध्ये लाखो लोकांच्या मृत्यूला कारणीभूत झालेल्या सम्राट अशोकाने पश्चातापाची कास धरली नसती तर ते मनोरूग्ण होऊन जीवन संपवण्याच्या विचारापर्यंत गेले असते त्यांनी जे झाले त्याबदद्ल स्वतःला माफ केले व बुद्धविचारांच्या बळावर चंड अशोक -धर्म अशोक झाले व करूणा-मैत्रीचे राज्य त्यांनी करून दाखवले.
वृक्षारोपणाच्या मोहीमा राबवताना सद्‌गुणांची व सद्भावनेची रोपे लावण्यासाठी बदलाला सामोरे जा. स्वतःमध्ये सकारात्मक बदल करा पूर्वी दिल एक मंदिर होते आता ते दिवाना व पागल झाले आहे.
एखाद्या गावात संत किंवा विचारवंत आला आणि त्याच समयी एखादी सिनेतारका आली तर माणसे कोणत्या दिशेला वळतील ? या प्रश्नाचे उत्तर शोधताना बदलाचे महात्म्य कळते. आयुष्यात कधी मान-अपमान, हानी-लाभ, निंदा -प्रशंसा अशा समविषम बदलाला सामोरे जावेच लागते. लोक बदलतात, स्थिती बदलते, नाती बदलतात, आपण बदलतो, निसर्ग बदलतो, शरीर व मनाचे व्यापार बदलतात, त्यावेळेस आपले चित्त समतेत ठेवून सकारात्मक बदल स्वीकारा व जीवन उन्नत करा.

 

आपला परिवार नागेबाबा परिवार

-डॉ. दत्ता कोहिनकर

(सुखी जीवनाची गुरुकिल्ली अर्थात  मनाची मशागत या पुस्तकातून)

error: Content is protected !!