सामर्थ्य शब्दांचे

सुदर्शन इंडस्ट्री खूपच तोट्यात आल्यामुळे मेहता साहेबांनी पुण्यातील कारखान्यात व्ही. आर.एस. जाहीर केली व ज्यांना व्ही. आर. एस. घ्यावयाची नाही त्यांनी कंपनीच्या इंदौर येथील विभागात काम करण्यासाठी रूजू व्हावे असे पत्रक काढले. बऱ्यापैकी रिटायरमेंटला आलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या तेथे जास्त होती. व्ही.आर.एस. साठी ते पुढे आले. तरूण मुलांनी नाईलाजाने इंदौरला जाण्याची तयारी दर्शवली.
कारखान्यातील नेतेगिरी करणारे ७ कर्मचारी एकत्र आले व इतर कर्मचाऱ्यांना भडकावून व्ही.आर.एस. ला विरोध करण्यासाठी प्रयत्न करू लागले. त्यांनी गेटवर तंबू टाकून उपोषण चालू केले. व्यवस्थापनाने कायदेशीर सर्व बाजू पूर्ण केल्यामुळे उपोषणाची कोणीही दखल घेत नव्हते. बऱ्याच कर्मचाऱ्यांनी नियमानुसार व्ही. आर.एस. घेऊन आपला गाशा गुंडाळला.
मेहता साहेबांच्या राजकीय, सामाजिक व आर्थिक वजनामुळे राजकारणी, पोलीस, प्रशासन सगळ्यांनी उपोषणकर्त्यांवर दबाव आणला. हतबल उपोषणकर्ते कोर्टात वकीलाला जाऊन भेटले. अध्यात्मिक व नैतिक मुल्ये जपणारे देवमाणूस अॅड. भट्टाचार्य यांनी सगळा वृत्तांत ऐकून कर्मचाऱ्यांचे समुपदेशन केले. मेहतांनी सर्व कायदेशीर बाबी पूर्ण केल्या असून, कोर्टात केस दाखल करणे म्हणजे कित्येक वर्षे ताटकळत राहणे व पैशाचा व वेळेचा अपव्यय करण्यासारखे असल्याचे त्यांना पटवून दिले. मेहता या व्यक्तीकडे अमाप पैसा, राजकीय ताकद, प्रशासन, अनेक वकील यासारख्या अनेक गोष्टी असल्याने त्यांना हात जोडून नम्रतेने कमीपणा घेऊन प्रेमाने जिंकण्याची युक्ती सांगितली.
उपोषणकर्त्यां कर्मचाऱ्यांनी मेहता साहेबांची वेळ घेतली. मिळालेल्या वेळेनुसार केबीनमध्ये प्रवेश मिळताच भट्टाचार्य वकीलांनी सांगितल्याप्रमाणे सातही कर्मचाऱ्यांनी कमरेत वाकून मेहता साहेबांना “जय जिनेंद्र” म्हणून प्रणाम केला.
त्यांचा लीडर शामभाऊ मेहतांना म्हणाला, साहेब गावावरून पुण्यात आल्यावर तुम्ही आम्हाला नोकरी दिली, रहावयास जागा दिली. तुमच्या कृपेने आमची आज दोन मजली घरं झाली तुमच्या कृपेने मुला-मुलीची शिक्षणं झाली. पायजमा-कुडता जाऊन शर्ट-पॅट-बुटात रहावयाला शिकलो. तुमच्या कृपेने दुचाकी विकत घेतली, तुमच्या कृपेने मुलामुलींची लग्नं केली. साहेब तुमच्याच कृपेने पुण्यात स्थिरस्थावर झालो. तुमच्याच कृपेने कुटूंबाच्या पोटात दोन घास जाताहेत. साहेब वडिलांसारखं तुम्ही आजवर आम्हाला सांभाळलं, चुकलं साहेब आमचं. पोरांना असं रस्त्यावर उघडे टाकू नका. तुमच्याशिवाय साहेब आहे तरी कोण आम्हाला ? हे बोलताना शाम रडू लागला. इतर कर्मचारी पण डोळे पुसू लागले. मेहता साहेबांना ह। प्रकार पाहून गहिवरून आले. त्यांनी सगळयांना जवळ घेऊन चहा सांगितला व सातही जणांना पूर्वीच्या कर्मचाऱ्यांच्या रकमेपेक्षा जास्त रकमेचे चेक देऊन त्यांच्या मुलामुलींच्या शिक्षणासाठी व लग्नासाठी वाटेल ती मदत करण्याची इच्छा प्रकट केली. कारण कर्मचाऱ्यांच्या नम्रतेने व गोड शब्दांतून कृतज्ञता व्यक्त केल्यामुळे तेथे पालक व मुलांचे कौटूंबिक वातावरण तयार झाले होते.
कर्मचाऱ्यांच्या कृतज्ञतेच्या शब्दांनी व वडीलासमान नाते प्रकटण्याच्या पध्दतीमुळे व शब्दांच्या सामर्थ्यामुळे मेहता भारावून गेले होते. शब्दांच्या सामर्थ्यामुळे कर्मचाऱ्यांचा प्रश्न मिटला होता. केवढी ही शब्दांची ताकद ! म्हणून तर तुकाराम महाराज म्हणतात
‘आम्हा घरी धन-शब्दांचीच रत्ने, शब्द शब्दांचीच शस्त्रे-यत्न करू।’
शब्द हे शस्त्र आहे. ते जपूण वापरायला शिकणे ही एक साधनाच आहे. तलवारीने मान कापली जाते -विषारी शब्दांनी मन कापले जाते. तलवारीचा घाव पुसला जातो-विषारी शब्दांचा घाव पुसला जात नाही.
शब्द हसवतात -शब्द रडवतात,
शब्द रामायण लिहतात
-शब्द महाभारत लिहतात ।
शब्द रामायण घडवतात -शब्द महाभारत घडवतात ।
म्हणून सुखी जीवनासाठी शब्दांचे महात्म्य समजून घेणे गरजेचे असते
ज्याच्याकडे सौजन्य – शिष्टाचार व चार गोड शब्द आहेत. त्यांचे बोलणे आपल्याला मोहात पाडते. ती व्यक्ती आपल्यावर जादू करते. त्याचे विचार आपण मान्य करतो.
संवादाला शब्दांनी श्रीमंती येते. समर्थांचा ‘दासबोध’ हा गुरूशिष्यांचा संवाद आहे. गीता हा कृष्णार्जुन संवाद आहे. प्लेटो व सॉक्रेटिस यांचे जीवन हा एक संवादप्रवाहच होता. माणूस हा बुद्धीमान प्राणी त्यांचे शब्दसामर्थ्य, त्यांचे जीवन घडवते. अन्य प्राणी बोलू शकत नाही. पशुपक्षी फक्त चिवचिव- कावकाव करतात. माणसासारखी विकसित मज्जासंस्था कोणाच्याही वाट्याला आली नाही. विचार व भावना यांना गोड व प्रेमाचे शब्दरूप देऊन संवाद साधण्याचे बळ फक्त माणसाच्याच ठायी असते. म्हणून ३२ दाताच्या आत विराजमान झालेली जीभ वाकडी-तिकडी न चालविता मधुर व रसाळ शब्द बोलू लागली व त्याला विनम्रतेची जोड देता आली की जीवन उन्नत होण्याच्या प्रक्रियेला आरंभ होतो. म्हणून तर म्हणतात ना,

मीठे पाणी मे – जहर ना तुम घोलो,
जब भी कुछ बोलो – सोचके तुम बोलो

संत महंत म्हणतात,

शब्दांमुळे दंगल । शब्दांमुळे मंगल ।
शब्दांचे हे जंगल । जागृत रहावे।।

 

आपला परिवार नागेबाबा परिवार

-डॉ. दत्ता कोहिनकर

(सुखी जीवनाची गुरुकिल्ली अर्थात  मनाची मशागत या पुस्तकातून)

error: Content is protected !!