स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्यांच्या कोचीग क्लासच्या निरोप समारंभाला मी व कलेक्टर मारूतराव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होतो. तणावमुक्ती या विषयावरचं माझं मार्गदर्शन संपलं व मारूतराव बोलायला उभे राहिले ते म्हणाले, “मित्रांनो ग्रॅज्युएशन झाल्यावर लगेचच आई बापानं माझं लग्न लावून दिलं. मी एम. पी. एस. सी. ची परिक्षा तीनदा दिली. त्यात अपयश आलं. मग मी यु.पी.एस.सी.ची परिक्षा दोनदा दिली. त्यातही नापासच झालो घरातील लोकं, आता बसं कर तुझे नाटक – गुपचूप मिळेल ती नोकरी कर किंवा शेती कर म्हणून हिणवू लागले. दोस्तांमध्ये चर्चा, गावात अपयशाची दवंडी, सगळीकडे लोकं टर उडवू लागले”.
“नातेवाईकांमध्ये चर्चा रंगू लागली. बायको पण धुसफूस करू लागली, आदळ- आपट करून स्वतःच्या नशिबाला वारंवार दोष देवून माझी इज्जत काढू लागली. मित्रांनो दैव बलवत्तर म्हणून यु.पी.एस.सी. च्या परिक्षेत तिसऱ्या वेळेस पास झालो. सगळया प्रक्रिया पूर्ण केल्या. कलेक्टर म्हणून जिल्हयावर माझी नेमणूक झाली. सरकारने मला बंगला व दारात दिव्याची गाडी दिली. मोठी केबीन, पी.ए., हाताखाली माणसे आली. त्या दिवसापासून माझी बायकोपण माझ्याशी खूप चांगली वागायला लागली आहे. मला इज्जत दयायला लागली आहे.” भाषणाचा शेवट करताना मारूतराव म्हणाले “मित्रांनो जे ध्येय निवडाल त्यात पूर्णतः स्वतःला झोकून दया, कितीही वेळा अपयश आलं तरी खचून जाऊ नका. लोकांच्या टिकेकडे दुर्लक्ष करा. रात्रंदिवस बसता-उठता, खाता-पिता, झोपेत अगदी स्वप्नातही त्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करा व विजयश्री खेचून आणा. तुम्ही जर स्वतःला सिध्द केलं नाही तर लक्षात ठेवा जिला तुम्ही अर्धांगीनी म्हणता ती बायकोपण तुम्हाला विचारणार नाही. म्हणून स्वतःला सिध्द करा.”
आपला परिवार नागेबाबा परिवार
-डॉ. दत्ता कोहिनकर
(सुखी जीवनाची गुरुकिल्ली अर्थात मनाची मशागत या पुस्तकातून)
