भाईच्या हातचा चहा

आपल्याला आयुष्य अनेक संधी देत असते. आपण त्या कशा घेतो यावर सारे अवलंबून असते. गेलेली संधी प्रत्येकवेळी परत येते असे नाही एका ट्रेनिंग निमित्त बँकेत गेलो होतो, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिल्यानंतर बँके मॅनेजरच्या केबिनमध्ये बसलो गप्पा सुरू असतानाच एक व्यक्ती आली आणि टेबल पुसले. मग मला चहा आणून दिला मला त्याचा चेहरा ओळखीचा वाटत होता.
तोही माझ्याकडे पाहून हसला, तेव्हा मला आठवले हा माझ्या वर्गात आमचा मॉनिटर होता. सर्वसाधारणपणे शाळेत हुशार, धीट मुलांना मॉनिटर केले जाई. तसाच तो होता, धडधाकड आणि हुशारही पण नंतर त्याच्या हुशारीच्या कौतुकाने त्याचा मार्ग चुकला आणि तो मवालीगिरीच्या, गुंडगिरीच्या मार्गाला गेला. शिक्षण केव्हाच मागे सुटले आणि भाईगिरीने त्याला जाळ्यात ओढले. साहजीकच शिक्षण नाही, त्यामुळे उत्तम कमाईचे साधनही मिळाले नाही. आर्थिक परिस्थिती बिकट झाली. कुटुंबाचीही परिस्थिती हलाखीची झाली, आजारपण, निर्धनअवस्था यामुळे तो नैराश्यात गेला होता. आता ओळखीने बँकेच्या इमारतीच्या कोपऱ्यात त्याला चहाचा गाडा लावायला जागा मिळाली होती. त्या टपरीवर चहा विकून तो आता गुजराण करत होता.
मी आज त्याला ३०-३५ वर्षांनी पाहिले. शिक्षणाची कास धरलेल्या परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांनी प्रेरित होत मी उच्च शिक्षण घेतले होते. खूप अभ्यास केला होता. महात्मा फुलेंचे वाक्य आठवले,

‘विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नितीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शुद्र खचरे, एवढे सारे अनर्थ एका अविद्येने केले.’

म्हणूनच मित्रांनो, खूप शिक्षण घ्या. खूप अभ्यास करा. स्वदेशे पुज्यते राजा – विद्वान सर्वत्र पुज्यते.

 

आपला परिवार नागेबाबा परिवार

-डॉ. दत्ता कोहिनकर

(सुखाचा पासवर्ड या पुस्तकातून)

error: Content is protected !!