गोष्ट काल्पनिक आहे. एका साधूला ठराविक मंत्राच्या साह्याने लोखंडाला सोने करण्याची सिद्धी प्राप्त झाली होती. एका दरोडेखोराला ही गोष्ट कळताच त्याने त्या साधूला पकडून डोंगरावर नेले व लोखंडाला सोने करायचा मंत्र मला सांग, नाहीतर जीवे मारण्याची धमकी दिली. त्या साधुने त्या दरोडेखोराला सांगितले, पहाटेच्या वेळी सूर्योदयापूर्वी आंघोळ करून एकांतात हा मंत्र म्हण, तो मंत्र त्याने एका कागदावर दरोडेखोराला लिहून दिला. परंतु त्याने दरोडेखोराला सांगितलं, हा मंत्र म्हणताना डोळे मिटल्यानंतर मनामध्ये अजिबात ‘माकड’ येता कामा नये. नाहीतर मंत्र फलित न होता लोखंडाचे सोने होणार नाही. दरोडेखोर खूप खुश झाला. त्याने साधुला सोडून दिले व दुसऱ्या दिवशी सकाळी उठून सूर्योदयापूर्वी एकांतात तो डोळे मिटून मंत्र म्हणू लागला परंतु मंत्र म्हणण्यापूर्वी मनामध्ये माकड यायला नको असा तो वारंवार स्वतःशी बोलत होता. त्यामुळे सारखं माकड मनासमोर येत होतं. त्याने मनामधून माकडाला दूर करण्यासाठी खूप प्रयत्न केले. तेवढ्याच वेगाने ते माकड त्याच्या मनामध्ये येत राहिले. त्यामुळे त्या माणसाला फलश्रुती झाली नाही. मनामध्ये हा विचार नको,असं म्हणून ज्या वेळेला तुम्ही त्या विचारांना दूर लोटायला जाता, तेव्हा ते विचार जास्त वेगाने येतील हे आठवायला नको म्हणल्यानंतर, वारंवार तेच आठवेल. म्हणून जे काही विचार चाललेत, जे काही आठवणीत येत आहे, त्याला साक्षीभावाने स्वीकार करा व आपल्या श्वासाला जाणत रहा. कुठल्याही विचारांना प्रतिसाद न दिल्यास हळूहळू त्याची तीव्रता कमी होते व ते निघून जातात.
एखाद्या दरवाजावर अर्धवट लोटलेल्या अवस्थेत, ‘कृपया, आत डोकावू नका’ असं लिहिलं तर आत डोकावण्याची तीव्र इच्छा निर्माण होते. मनाला वारंवार असं करू नको, तसं करू नको, हे सांगण्यापेक्षा ‘हे कर’ हे प्रेमाने समजून सांगा. ते मनाने ऐकण्यासाठी रोज सकाळ, संध्याकाळ श्वासाच्या साह्याने ध्यानाचा सराव करा. यात तुमच्या आयुष्याचे हित दडलेले आहे.
आपला परिवार नागेबाबा परिवार
-डॉ. दत्ता कोहिनकर
(सुखाचा पासवर्ड या पुस्तकातून)
