लोकप्रियता

तुम्हाला लोकप्रिय व्हायचं असेल तर सर्वात महत्त्वाचा मार्ग म्हणजे इतरांच्या अभिरुचीबाबत रस घेणे. इतरांना जे आवडतं त्याच्याविषयी त्या माणसाशी बोलणं. प्रत्येक माणसाला आपल्याला कोणीतरी चांगलं म्हणावं अशी इच्छा असते. आपलं गुणगान करावं अशी इच्छा असते. त्यामुळे समोरच्या व्यक्तीमधील चांगले गुण पाहून त्याचं कौतुक केलं की, तुम्ही लोकप्रिय व्हाल. तुम्ही इतरांशी जशी वागणूक ठेवता तशाच इतर व्यक्ती तुमच्याशी वागू लागतात. त्यामुळे इतर जणांबरोबर वागताना नेहमी सकारात्मक पद्धतीने वागा. त्या व्यक्ती तुमच्याशी तशाच पद्धतीने वागतील,
जास्तीत जास्त मित्र बनवण्याचा प्रयत्न करा. मित्रांना नेहमी मदत करा. त्यांचा आदर करा. इतरांशी वागताना तुम्ही दयाळू वृत्ती दाखवा. तुम्ही जे काही लोकांना देता तेच तुमच्याकडे गुणाकार पद्धतीने येत असते. लक्षात ठेवा आपल्याला कोणी मदत केली तर, आभार मानायला अजिबात विसरू नका. धन्यवाद, थैंक्यू हे शब्द तुमच्या मनाच्या तिजोरीत नेहमी असू द्या व वारंवार त्याचा वापर करा. जगामध्ये बदल घडवण्यापेक्षा आपल्या स्वतःमध्ये बदल घडवा. विनोद बुद्धी नेहमी असू द्या. शब्द हे शस्त्र आहे त्यामुळे बोलत असताना दुसऱ्याला आनंद होईल अशीच वाक्य वापरा. तुम्हाला जर एखाद्या गोष्टीबाबत किंवा व्यक्तीबाबत कौतुकास्पद किंवा अम्बाल उद्गार काढायचे नसतील तर, काहीच बोलू नका. तुमचे तोंड बंद ठेवा. पण इतरांवर टीका करणे टाळा. टीका केल्यामुळे तुमचे व्यक्तिमाद तुम्ही सुधारू शकत नाही. कुठल्याही व्यक्तीशी बोलताना त्याच्या डोळ्यांत डोळे घालून बोला. समोरची व्यक्ती बोलत असताना त्याचं पूर्ण ऐकून घेण्याचा प्रयत्न करा. चांगले ऐकणारा व्हा. इतर व्यक्ती बोलत असताना तुम्हाला कंटाळा आला असे अजिबात दाखवू नका. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इतरांना उपदेशाचे डोस पाजणे सोडा. कुणी तुम्हाला सल्ला विचारला तर, त्याला आवडत असलेल्या गोष्टीबाबतच सल्ला द्या. त्याला ज्या गोष्टी कराव्याशा वाटतात, तेच त्याला करायला सांगा. कारण मानसशास्त्र म्हणते, ‘माणसाला नेहमी जे करावंसं वाटतं. तोच सल्ला समोरच्या माणसाकडून अपेक्षित असतो.’ तुमच्याकडे एखाद्या माहितीची कमी असेल तर त्या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तीकडे तुम्ही जा, त्यांना सांगा की, ‘साहेब, या क्षेत्रात तुम्ही दिग्गज आहात. कृपया त्याबाबत मला तुम्ही मार्गदर्शन कराल का?’ त्यांचं भरभरून कौतुक करा. त्यांच्या ‘यशाचे रहस्य’ तो तुमच्यासमोर खुलं करायला तयार होतो. नेहमी इतरांना मदत करत चला. इतरांना सुखी करण्याचा प्रयत्न करा. लक्षात ठेवा तुम्ही जे काही देत असता, ते कित्येक पटीने तुम्हाला मिळत असते. हा निसर्गाचा नियम आहे. इतरांसाठी तुम्ही टाळ्या वाजवल्या तर निसर्ग तुमच्यासाठी टाळ्या वाजवण्यासाठी लोकं उभी करत असतो.
तुम्हाला सुख हवे ना, मग इतरांना सुखी करा…

 

आपला परिवार नागेबाबा परिवार

-डॉ. दत्ता कोहिनकर

(सुखाचा पासवर्ड या पुस्तकातून)

error: Content is protected !!