एकेदिवशी सायंकाळी एक गृहस्थ त्यांच्या नेहमीच्या आवडत्या खुर्चीत बसले आणि वर्तमानपत्र वाचायला लागले. त्यांचा छोटा मुलगा त्यांच्याजवळ बसला. “बाबा, चला आपण खेळू या,” मुलगा उत्साहात म्हणाला. पण हे गृहस्थ वाचण्यातच दंग होते.
“चला ना बाबा खेळायला. आपण मज्जा करू,” छोटा मुलगा म्हणाला. बाबांनी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. ते वर्तमानपत्र वाचत राहिले.
मुलानं फारच हट्ट धरला. तरीही बाबांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. शेवटी बाबांना एक कल्पना सुचली. वर्तमानपत्रातल्या एका पानावर जगाचा नकाशा होता. त्यांनी ते पान बाजूला काढलं. ते कापून त्याचे छोटे छोटे तुकडे केले. ते सगळे एकत्र केले आणि मुलाला म्हणाले, “हं, आता हे तुकडे जुळव बघू.” बाबांना वाटलं मुलगा आता बराच वेळ त्यात रमेल.
मुलांकडे भन्नाट कल्पना असतात आणि त्यांच्याकडून मोठ्या माणसांना खूप काही शिकायला मिळतं. मोठ्यांसाठी ते गरजेचंही असतं. तर हा छोटा मुलगा काही मिनिटांत परत आला आणि त्यानं बाबांना तो नकाशा अगदी अचूकपणे लावून दाखवला.
“तू कसं काय केलंस हे?” बाबांनी आश्चर्यचकित होऊन विचारलं.
“सोप्पं होतं बाबा. कागदाच्या मागच्या बाजूला एका माणसाचा चेहरा होता. तो मी जुळवला. मग इकडे नकाशा आपोआप जुळला.”
किती अभिनव कल्पना! नाही का?
तुम्ही स्वतःला जुळवलंत तर तुमचं जगही व्यवस्थित जुळलेलं असेल. व्यवस्थितच का, छानच जुळलेलं असेल.
आपला परिवार नागेबाबा परिवार
लेखक – अज्ञात
