एक अतिशय सुंदर महिला विमानामध्ये चढली आणि आपली सीट शोधू लागली. तिने पाहिलं, की तिची सीट एका दिव्यांग व्यक्तीच्या शेजारी होती. त्या दिव्यांग व्यक्तीला दोन्ही हात नव्हते. ती महिला दिव्यांग व्यक्तीच्या शेजारी बसावे लागणार म्हणून आढेवेढे घेत होती.
ती सुंदर महिला एअर होस्टेसला म्हणाली, “मी या सीटवर आरामात बसून प्रवास करू शकणार नाही. माझ्या शेजारी बसलेल्या व्यक्तीला दोन्ही हात नाहीयेत.” हे सांगून तिने त्या एअर होस्टेसला आपली सीट बदलून देण्याची विनंती केली.
एअर होस्टेसला त्या महिलेच्या वागण्याचे खूपच आश्चर्य वाटले. तिने संकोचाने विचारले, “मॅडम, तुम्ही मला याचं कारण सांगू शकाल का?”
त्या महिलेने उत्तर दिले, “मला असे लोक आवडत नाहीत. मी अशा व्यक्तीच्या शेजारी बसून प्रवास करू शकणार नाही.”
शिकलेल्या आणि विनम्र दिसणार्या त्या महिलेचे असं बोलणं ऐकून एअर होस्टेसला खूपच आश्चर्य वाटले. ती महिला परत जोर देऊन म्हणाली की, “मी त्या सीटवर बसू शकत नाही. म्हणून मला दुसरीकडे सीट द्या.”
एअर होस्टेसने रिकामी सीट शोधण्यासाठी आजूबाजूला नजर फिरवली. परंतु कोणतीच सीट रिकामी नव्हती.
एअर होस्टेस त्या महिलेला म्हणाली, “मॅडम इकॉनॉमी क्लास मध्ये एकही सीट रिकामी नाही, परंतु प्रवाशांची सोय बघणे ही आमची जबाबदारी आहे. मी विमानाच्या कॅप्टनशी बोलते, तोपर्यंत तुम्ही धीर धरा आणि कृपया काहीतरी पेय घ्या.” हे बोलून ती एअर होस्टेस कॅप्टन बरोबर विचार विमर्श करण्यास निघून गेली.
काही वेळाने, परत आल्यावर एअर होस्टेस त्या महिलेला म्हणाली, “मॅडम आपल्याला जी गैरसोय झाली त्याबद्दल आम्ही दिलगीरी व्यक्त करतो. या संपूर्ण विमानामध्ये फक्त एकच सीट रिकामी आहे आणि ती प्रथम श्रेणी मधे आहे. मी आमच्या टीम बरोबर चर्चा केली आणि आम्ही एक असाधारण निर्णय घेतला आहे. आमच्या कंपनीच्या इतिहासात असे पहिल्यांदाच घडत आहे की इकॉनॉमी वर्गातील एका प्रवाशाला प्रथम श्रेणीमध्ये पाठवले जात आहे.”
महिलेला खूपच आनंद झाला. परंतु ती काही प्रतिक्रिया देण्याआधीच एअर होस्टेस, त्या दिव्यांग व्यक्ती जवळ गेली आणि त्यांना नम्रतेने म्हणाली, “सर, कृपया माझ्या बरोबर प्रथम श्रेणीमधे चला. आमची इच्छा नाही, की आपण एका असभ्य अशा प्रवाशा बरोबर प्रवास करून, त्रास करून घ्यावात.”
हे ऐकून सगळ्या प्रवाशांनी टाळ्या वाजवून या निर्णयाचं स्वागत केल. ती सुंदर दिसणारी महिला कोणाच्याही नजरेला नजर देवू शकत नव्हती.
तो दिव्यांग व्यक्ती उभा राहिला आणि म्हणाला, “मी एक माजी सैनिक आहे आणि एका संरक्षण मिशनच्या दरम्यान झालेल्या बॉम्बस्फोटांमध्ये मी माझे दोन्ही हात गमावून बसलो. प्रथम मी जेंव्हा या महिलेच बोलणं ऐकलं, तेंव्हा मी विचार करत होतो, की मी आपला जीव धोक्यात घालून आपले दोन्ही हात गमावले, ते कोणाच्या संरक्षणासाठी? परंतु, जेव्हा मी बघितले की तुम्ही सर्वजणं विमानाच्या कॅप्टनच्या निर्णयावर खूष झालेले आहात, तेंव्हा आता मला स्वतःचा अभिमान वाटतो आहे, की मी आपल्या देशासाठी आणि या देशातील लोकांसाठी माझे दोन्ही हात गमावले.” आणि एवढं बोलून ते एअर होस्टेस बरोबर प्रथम श्रेणी कडे निघून गेले. सीटवर बसलेली ती सुंदर महिला, अत्यंत खजील झाल्यामुळे मान खाली घालून बसली होती.
विचारांमध्ये औदार्य नसेल तर अशा सौंदर्याला काहीच किंमत नसते. लोकांचे मूल्यमापन करणे बंद करायला शिकणे हे आपल्या पैकी बऱ्याच लोकांसाठी खूप गंभीर आणि कठिण स्वरूपाचं काम आहे. कारण एखाद्याच्या परिस्थितीविषयी काहीही माहिती नसतांना त्याबाबत अनुमान लावणे, किंवा त्याच्याबद्दल मत बनविणे हा तर मानवी स्वभाव आहे.
जेव्हा कोणी आपले मूल्यमापन करतो, तेव्हा आपल्यालाही राग येतो आणि त्या परिस्थितीला योग्य ठरवण्याचा आपण प्रयत्न करतो, जीच्यामुळे आपल्याबद्दल असे मत तयार झाले.
हृदयावर आधारित ध्यानाचा अभ्यास आपल्याला आपल्या मानवीय कमतरते मधून बाहेर येण्यासाठी मदत करतो.
आपला परिवार नागेबाबा परिवार
लेखक – अज्ञात
