विचारांचे सामर्थ्य

निता अजितला घेऊन माझ्याकडे आली होती अलीकडे अजित फारच उदास, बेचैन व निराश असतो असे तिने मला सांगितले. मी, निताला बाहेर बसायला सांगितले व अजितला बोलते केले बोलता बोलता अजितच्या डोळयात अश्रू तरळले व म्हणाला सर २ महिन्यांपूर्वी आईची आणि माझी निताच्या वागण्यावरून निता घरी नसताना भांडणे झाली. भांडणामध्ये आई ने आम्हा दोघांवर केलेल्या आरोपांमुळे माझा क्रोधाग्नी भडकला व मी, रागाच्या भरात आईवर हात उगारला व धक्का बुक्की केली ‘आई सारखे जगात दुसरे दैवत नाही असे बऱ्याचदा वाचले होते त्यामुळे क्रोध शांत झाल्यावर मला माझी चूक समजून आली व पश्चातापाने माझ्या मनाला घेरले तेव्हा पासून मला रात्री झोप येत नाही त्यातूनच हे नैराश्य आलं आहे. आणि ही गोष्ट मी कोणाला सांगू पण शकत नाही.
अजित रडून शांत झाल्यानंतर मी त्याला म्हणालो, अजित क्रोध आवरता न आल्यामुळे तुझ्याकडून हे कृत्य घडलं आहे. मी देखील क्रोधाच्या भरात आईला अपशब्द वापरले होते. क्रोध शांत झाल्यानंतर मात्र मी तीची पाय धरून माफी मागीतली होती. ज्याला आनंदाने जगायचे आहे त्याने पूर्वताप किंवा पश्चाताप न करता चुक झाली की, समोरच्या माणसाची माफी मागून ती परत न करण्याचा दृढ संकल्प करावा. मनुष्य विकारांच्या अधीन झाला की त्याच्याकडून चुका होऊ शकतात.
सम्राट अशोकाने कलिंगाच्या युद्धात लाखो माणसं मारली. या कृत्याचा त्याने पश्चाताप केला असता तर त्याला नैराश्याने घेरले असते आणि तेथेच अशोकाची कारकीर्द संपून पुढील इतिहास घडलाच नसता सम्राट अशोकाने प्रज्ञापुर्वक विचार करून बुद्धांच्या मार्गाने जायचे ठरवले. चंड अशोक मनातील विचार बदलून धर्म अशोक झाला.
आपले सर्व आयुष्य हे आपल्या विचारांवर अवलंबून असते नकारात्मक विचारांनी मन उदास होते. उदास मनाने शरीर शिथील पडते व नैराश्य येते ज्या वेळेला मनात नकारात्मक विचार येऊन एखादया घटनेविषयक भय जागृत होते त्या वेळेला आयुष्यात यापेक्षाही वाईट घटना घडू शकली असती, असा विचार करून मन स्थिर करणे आवश्यक असते जेव्हा आपल्याजवळ एखाद्या गोष्टीचा अभाव आहे या विचाराने मन त्रस्त होते, त्या वेळेस आपल्यापेक्षा जास्त कमतरता असलेल्या लोकांचा विचार केला की, आपल्या विचारांचा प्रवाह सकारात्मकतेकडे सुरू होतो.
खूप प्रयत्न करून अपयश आल्यानंतर निराश न होता त्यापेक्षा आणखी काही चांगलं आयुष्यामध्ये यश मिळणार असेल म्हणून हा एक विश्राम आहे असा विचार करावा काही वेळेस मोठी झेप घेण्यासाठी दोन पाऊले मागे यावे लागते.
माजी राष्ट्रपती डॉ अब्दुल कलाम हवाई दलात भरती होऊ शकले नाहीत, कारण निवड समितीने पहिल्या ८ विद्यार्थ्यांची निवड केली अब्दुल कलामांचा नंबर नववा होता परंतु ते अपयश त्यांना भारत देशाचे राष्ट्रपती होण्यासाठी नियतीने दिले होते.
चित्रपट अभिनेते अमिताभ बच्चन निवेदकाच्या परिक्षेत नापास झाले. जो आवाज त्यावेळी निवेदक बनण्याच्या लायकीचा मानला गेला नाही तोच आवाज चित्रपटसृष्टीत श्रेष्ठ ठरला. त्यामुळे अपयश आले तरी नकारात्मक विचार न करता, खचून न जाता, सकारात्मक विचार करा. नकारात्मक विचारांनी युक्त असे मन जीवनात दुःख आणते. हाच विचार सकारात्मक केला असता दुःख मुक्तीच्या रस्त्यावर आपली वाटचाल सुरू होते.
गरम तव्यावर पाणी पडले तर चर चर करून त्याची वाफ होते व हवेत उडून जाते. मात्र हिरव्या पाण्यावर पडलेले दवबिंदूंचे थेंब मोत्याचे रूप घेऊन डोलू लागतात. नकारात्मक विचारांनी युक्त दुःखी मन हे गरम तव्यासारखे असते, तर सकारात्मक विचारयुक्त समाधानी मन कमळाच्या हिरव्या पाणावरील पाण्यासारखं असते. म्हणुन आपण आपल्या मनाला कसे घडवायचे हे आपल्याच विचारांवर अवलंबुन असते.
नदीच्या किनाऱ्यावरील झाडावर एक माकड त्याच्या मैत्रीणीसह गप्पा मारत बसले होते. अचानक आकाशवाणी झाली.. “जो कोणी आकाशवाणी संपल्या संपल्या पाण्यात उडी मारेल तो राजकुमार किंवा राजकुमारी बनून बाहेर येईल.
आकाशवाणी संपताच माकडीनीने पाण्यात उडी मारली व राजकुमारी बनून बाहेर येते. माकड तिला म्हणतो वेडे आकाशवाणी खोटी ठरली असती तर, त्यावेळेस माकडीण म्हणते अरे जरी आकाशवाणी खोटी ठरली असती तरी मी पाण्यातून बाहेर येताना माकडीनच राहिले असते. पण मी त्वरित सकारात्मक विचार करून संधीचा लाभ घेतल्याने आता मी राजकुमारी झाली आहे, तू मात्र माकडच राहिलास. आपल्या मनातील आवाज ही एक आकाशवाणीचं असते. या आकाशवाणीला सकारात्मक विचारांची जोड देऊन आनंदाने जीवन जगा. आपल्या जीवनाची उर्ध्वगती किंवा अधोगती करण्याची ताकद ही आपल्या विचारांवरच अवलंबून असते. तुम्ही जसा विचार कराल तसेच तुम्ही व्हाल. म्हणून नेहमी सकारात्मक विचार करा, सकारात्मक लोकांच्या संगतीत रहा, ‘तुच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ हे बोधवचन आपल्या जीवनात खरोखर उतरवण्यासाठी सकारात्मक विचारांना सकारात्मक कृतींची जोड द्या.

 

आपला परिवार नागेबाबा परिवार

-डॉ. दत्ता कोहिनकर

(सुखी जीवनाची गुरुकिल्ली अर्थात  मनाची मशागत या पुस्तकातून)

error: Content is protected !!