सुखाचा महामंत्र

 

 

बंधु आणि भगिनींनो, आधुनिक स्पर्धेच्या युगात सर्वांनाच असंख्य समस्यांना तोंड द्यावे लागते. त्या सोडविताना मला श्री समर्थ रामदास स्वामीचा श्लोक आठवतो, समर्थ रामदास म्हणतात…

“जगी सर्व सुखी असा कोण आहे,
विचारे मना तुची शोधुनी पाहे”

याचाच अर्थ सर्वांच्या आयुष्यात काहीतरी दुःख आहेच. तथागत भगवान गौतम बुद्धांनी चार आर्यसत्य सांगताना जीवनजगताचे अंतिम सत्य सुख नसून “दुःख” हेच सांगितले आहे.
अशा दुःखांनी वेढलेल्या आयुष्यात सुखी राहण्यासाठी, व आनंदी राहण्यासाठी काही सोप्या गोष्टी, सवयी माझ्या व्याख्यानात सांगत असतो. त्यातील काही गोष्टी आपल्यापुढे ठेवत आहे.

 

  • १) A for Adjestment जुळवुन घ्यायला शिका –
    एका महापुरुषाने निसर्गाला विनंती केली होती. “ये निसर्गा या जगात मी जे बदल करू शकतो ते बदलण्याची ताकद मला दे, जे मी बदलू शकत नाही त्याच्या बरोबर जुळवून घेण्याची कुवत मला दे व मी काय बदलू शकतो व काय बदलू शकत नाही हे समजण्याचा शहाणपण निसर्गा मला लाभू दे.

 

  • २) B for Bottle मद्यापासून दूर रहा –
    शितपेये टाळा, मित्रांनो, ज्या कुणाला छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब अविडकर, महात्मा फुले यांना आदरयुक्त प्रणाम करावयाचा असेल त्यांनी आत्ताच शपथ घ्या, “मी आयुष्यात दारूच्या थेंबालाही स्पर्श करणार नाही. दारूची नशा करी संसाराची दुर्दशा”.

 

  • ३) C for Company अर्थात संगत-
    पावसाच्या पाण्याचा थेंब गरम तव्यावर पडला तर त्याचे क्षणात बाष्प होते, हाच थेंब समुद्रावर पडला तर तो खारा होतो, गंगेत पडल्यास तो पवित्र होतो, असे म्हणतात. गटारात पडल्यास दुर्गंधीयुक्त होतो, मृग नक्षत्रात शिंपल्यात पडल्यास मोती होतो. थेंब तोच असतो, तो कोठे पडतो त्यावर त्या थेंबाचे भवितव्य अवलंबून असते त्याचप्रमाणे मनुष्याचे भवितव्य त्याच्या संगतीवर अवलंबून असते.
    समर्थ म्हणतात- “मना तुची रे एक क्रिया करावी । सदा संगती सज्जनांची धरावी ।।”
    यासाठी सतत सज्जनांच्या संगतीत रहा.

 

  • ४) D for Diet अर्थात आहार –
    आपण जसे खाल तसेच आपण व्हाल. त्यासाठी जीवनात आहाराला अनन्य साधारण महत्त्व आहे. सकस, पौष्टिक पचण्यास सुलभ, नियंत्रीत व शाकाहारी आहार अतिशय गुणकारी आहे.
    शाकाहारी का असावा यांची अनेक कारणे आहेत. त्यासाठी मांसाहारी प्राणी व माणसातला फरक आपण लक्षात ठेवावा. मांसाहारी प्राण्याचे दात सुळे असतात, माणसाला तसे दात नसतात. वाघ-सिंहासारखे प्राणी जिभेने पाणी पितात. माणूस ओठाने पाणी पितो. (सर्व शाकाहारी प्राणी ओठाने पाणी पितात. उदा. गाय, म्हैस, शेळी, माकड, इ. तसेच या प्राण्यांचे दात सुळे नसतात.) मांसाहारी प्राण्यांच्या आतड्यांची रचना मांस पचविण्याची असते, माणसाच्या आतड्याची क्षमता शाकाहार पचविण्याची असते. मांसाहारी प्राणी अल्कधर्मी असतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मांसाहारी प्राणी मांसाहारामुळे हिंस्र असतो मांसाहार मनुष्यातील हिंस्त्र भावनांना उतेजन देतो. निसर्गाच्या नियमांनुसार अत्यंत कमी बुध्यांक असलेले मांसाहारी प्राणी सुद्धा भुकेलेले असल्यावर गवत खात नाही व शाकाहारी प्राणी भूकेले असल्यावर मांस खात नाही बुद्धीवान मनुष्य मात्र अभक्ष भक्षण करून अनेक संकटे ओढावून घेतो आहे.
    सूक्ष्म स्तरांवर विचार केल्यास लक्षात येईल की, मांसाहारासाठी प्राण्यांची हत्या करताना त्यांच्या मनात राग, द्वेष, भीतीचे विकार तरंगीत होऊन त्याच्या शरीराच्या अणुरेणूत पसरतात. असे मांस भक्षण केल्याने आपण सुखी व्हाल का? कारण जसे आपण खाल तसेच आपण व्हाल.

 

  • ५) E for Empathy दुसऱ्याच्या बाजूने विचार –
    दुसऱ्याच्या भूमिकेत अथवा त्याच्या बाजूने विचार करा. आपले बरेच प्रश्न तिथेच संपतात.

 

  • ६) F for Family अर्थात कुटूंब-
    कुटुंबात आपण दुसऱ्याने सुधारण्याची अपेक्षा करतो. वडील म्हणतात- मुलगा सुधारला पाहिजे, मुलाची इच्छा असते वडिलांनी सुधारावे. पत्नी म्हणते पतीने सुधारावे. पतीची इच्छा असते पत्नीने सुधारावे.
    संत श्रेष्ठ कबीर म्हणतात –
    “बुरा देखने मै चला बुरा न दिखीया कोय।
    जब अपने अंदर झाका मुझसे बुरा न कोय।।”
    त्यासाठी सर्वप्रथम आत्मपरीक्षण करा, स्वतःपासून प्रेमाचा अविष्कार करा.

“घर असावे घरासारखे- नकोत नुसत्या भिंती ।
परस्परांवर प्रेम असावे- नकोत नुसती नाती।।

  • ७) G for God अर्थात निसर्गशक्ती-
    निसर्गशक्तीची विविध धर्म / संप्रदायानुसार विविध रुपे आहेत. निसर्गाचा नियम आहे “जसे कर्म – तसे फळ” ईश्वर म्हणजे सत्य. सत्याला सामोरे जा. पापाचा नाश करा. भगवान बुद्धांची शिकवण त्यासाठी मार्गदर्शक आहे. ते म्हणतात “सर्व पापांपासून दूर रहा, कुशल कर्म करत रहा, आपल्या मनाला, चित्ताला, निर्मळ करा, तुमचे उत्तम, मंगल होईल”.

 

  • ८) H for Habit अर्थात सवय-
    चांगल्या सवयी वाढवा, वाईट सवयी दूर करा.

 

  • ९) Ego अर्थात अहंकार-
    अहंकार हा आपला सगळ्यात मोठा शत्रू आहे. आपल्या दुःखाला कारणीभूत ठरणारा हा विकार दूर करणे अतिशय महत्त्वाचे आहे.
    तुकाराम महाराज म्हणतात- “महापुरे झाडे जाती, तेथे लव्हाळे वाचती.

” पुज्य विपश्यनाचार्य गोयंकाजी म्हणतात-
“मत कर, मत कर बावला अहंकार, अभिमान।
बडो-बडो रुस्तमका, मिट गया नामोनिशान।”
म्हणून सतत विनम्र रहा-
“जिसके मन प्रज्ञा जगी,
होय विनम्र विनित।
जिस डाली को फल लगे, झुकने की ही रित॥

ज्ञानी, ताकदवान माणूस अतिशय विनम्र असतो. जग जिंकणारा सिकंदर सुद्धा रिकाम्या, हाताने आला. रिकाम्या हाताने परत गेला. त्यामुळे अहंकार दूर करण्याचा प्रयत्न करा.

 

  • १०) J for Jokes अर्थात विनोद बुद्धी-
    आठवड्यातून एकदा का होईना, आपल्या कुटुंबाबरोबर मनमोकळे हसा. अर्थात कुणालाही न दुखविता. सुहास्य हा अनमोल अलंकार आहे व तो कुणाच्याही मुखकमलावर शोभून दिसतो. हसणे हे आरोग्यासाठी अतिशय चांगले आहे हे आधुनिक शास्त्रानेही सिद्ध केले आहेच.
    चला तर मग हसण्यासाठी सकाळ मध्ये वाचनात आलेली ग्राफिटी अतिशय संदर आहे- ‘तुम्हाला कोणी लागेल असं बोलल्यानंतर अजिबात दुःखी होऊ नका, कारण सगळेच समजदार व हुशार नसतात’ हा! हा! हा!
    संतांची वचने सांगतात, ‘स्वतः सुखी व्हायचे असेल तर हत्या करू नका, खोटे बोलू नका, व्यसनं करू नका. कारण तुम्ही बारकाईने तपासले तर वरील सर्व दुष्कृत्यात तुम्ही दुसऱ्याला दुःख देत असता व संतांनी सांगितल्याप्रमाणे दुसऱ्याला दुःखी केल्यावर स्वतः सुखी कसे व्हाल ।’
    हे सर्व कथन करायला सोपे आहे पण आचरणात आणण्यास अतिशय कठीन आहे. कारण मन आपल्या ताब्यात नाही निर्मळ नाही, सबळ नाही. जीवन आनंदाने जगण्यासाठी, समता आवश्यक आहे. मन निर्मळ बनविण्यासाठी सर्वप्रथम ते ताब्यात ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी ध्यानधारणा ही आपली गरज आहे त्यासाठी “विपश्यना” ही एक शास्त्रोक्त ध्यान पद्धती आहे.
    ‘विपश्यना’ म्हणजे एखादी गोष्ट जशी आहे तशी जाणण्याचा प्रयत्न करणे. विपश्यना ध्यान पद्धती भगवान बुद्धांनी शोधून काढली व पूर्ण ज्ञान प्राप्त केले. बुद्ध ही ज्ञानाची परमोच्च अवस्था आहे.

 

दहा दिवसांच्या विपश्यना शिबिरात ही साधना शिकविली जाते. ही साधना आपल्या श्वास व शरीरातील संवेदनांशी निगडीत आहे. जाती, वर्ण व पंथांशी संबंधीत नाही. राज्य शासनाने सुद्धा या साधनेसाठी आपल्या अधिकारात १४ दिवसांची परावर्तीत रजा मंजूर केली आहे.
पुणे शहरात आळंदी जवळ मरकळ व स्वारगेट येथे विपश्यना ध्यान केंद्रे आहेत. स्वारगेट येथील केंद्रावर लहान मुलांना सुद्धा एक व दोन दिवसांची शिबिरे पूर्णपणे निःशुल्क असतात. शिबिराचा खर्च शिबिराचा हा लाभ घेतलेल्या जुन्या साधकांच्या व स्वयंसेवकांच्या दानातून केला जातो. या शिबिरासाठी कुठल्याही प्रकारची फी आकारली जात नाही.
विपश्यना वेबसाईट : http://www.vridhamma.org

 

आपला परिवार नागेबाबा परिवार

-डॉ. दत्ता कोहिनकर

(सुखी जीवनाची गुरुकिल्ली अर्थात  मनाची मशागत या पुस्तकातून)

error: Content is protected !!