रामानंद नावाचा एक अध्यात्मिक युवक साधनेसाठी आश्रमात दाखल झाला. गुरूने त्याला दीक्षा देऊन गुरूमंत्र दिला. दुसऱ्या दिवशी सकाळी आश्रमाच्या मैदानावर ३००-४०० गावकऱ्यांना गोळा करून रामानंद “ॐ-ऐं-ही-क्ली-फट स्वाहा” हा मंत्र जोरजोराने त्यांच्याकडून वदवून घेत होता.
तेवढ्यात गुरूजीचे तेथे आगमन झाले. त्यांनी हा प्रकार पाहून रामानंदला बोलावून विचारले हा काय प्रकार आहे ? रामानंदने सांगितले, गुरूजी तुम्ही दिलेला मंत्र हा गावकऱ्यांकडून वदवून घेत आहे. गुरूजींनी कारण विचारले असता, रामानंदतीर्थ म्हणाला तुम्ही तर सांगितले ना, हा मंत्र पठण केल्यामुळे स्वर्गप्राप्ती होते. तेव्हा गुरूजी म्हणाले रामानंद मी तुला हे पण सांगितले हा गुप्त-मंत्र आहे, हा जर कोणाला सांगितलास तर तुला नरकात जावे लागेल. तरीही तू असे का केले? त्यावर हसत रामानंद म्हणाला, गुरूजी शेकडो लोकांना स्वर्ग मिळत असेल तर माझी नरकात जायची कधीही तयारी आहे. हाच साधक रामानंदतीर्थ म्हणून पुढे गुरूपदी विराजमान झाला.
स्वामी विवेकानंद म्हणायचे, “तुम्ही किती निःस्वार्थ आहात, यावर तुमचं यश अवलंबून आहे. मला अशी थोडीच माणसं द्या, जी शुध्द व चारित्र्यसंपन्न आहेत. त्याच्या मदतीने मी संपूर्ण जग बदलून टाकीन.”
दुसऱ्यांचे भले चिंतनारा सद्गुणी माणूस हा नेहमी सुखाचा अधिकारी असतो. दुसऱ्यांचे भले करताना अर्जित केलेले पुण्य हे त्याची पारलौकिक गती देखील सुखद करत असते. बुद्धांना भक्तांनी विचारलं, “भगवान आमच्या वाईट वेळेला आमच्या मदतीला कोण येईन ? आई-वडिल-पत्नी- मुले?” भगवान म्हणाले, “यातील कोणीही नाही, तर तुम्ही केलेले ‘पुण्य’ हेच तुमच्या कामाला येईल.” सद्गुण हा नितीमत्तेचा पाया आहे.
सद्गुणांच्या आचरणालाच पतंजली यम-नियम पालन व भगवान बुद्ध शीलपालन असे म्हणतात. सद्गुणी व नितीमान माणसाच्या भोवती सर्व शुभशक्ती विहार करत असतात. तो सर्वत्र यशस्वी व प्रिय होतो. गुलाबाचा सुगंध हा वाऱ्याच्या दिशेने जातो. पण सद्गुणी माणसाचा सुगंध हा चारही दिशेला पसरतो.
म्हणून सुखी जीवनासाठी नितीमान होणे गरजेचे आहे. महात्मा गांधी म्हणाले होते, “नितीमूल्यांशिवाय असलेले शिक्षण हे त्या व्यक्तीच्या, राष्ट्राच्या, देशाच्या अहिताला कारणीभूत ठरते.”
लाकूडतोड्याची गोष्ट तुम्हाला ठाऊकच असेल, नदीकिनारी झाडावरील फांदी तोडताना कुऱ्हाड हातातून सटकून नदीत खोलवर पडली. पोटापाण्याचं साधनच नदीत बुडालं म्हणून नदीकिनारी रडत बसलेल्या लाकूडतोड्याची देवाने परिक्षा घेण्याचे ठरवले. देवाने त्याच्या समोर प्रकट होऊन कुन्हाड पाण्यातून काढण्याचं आश्वासन देऊन पाण्यात बुडी मारून प्रथम सोन्याची नंतर चांदीची कुऱ्हाड काढून त्याला हीच का विचारलं. त्याने सोन्याच्या व चांदीच्या कुऱ्हाडीला माझी नाही असे म्हणताच त्याने त्याची लोखंडी व सोन्या-चांदीच्या तीनही कुऱ्हाडी बक्षिस दिल्या व सुखी होशील असा आशीर्वाद दिला.
नीतीमान माणसाच्या शब्दाला व कृतीला एक शक्ती प्राप्त होते. संत गाडगेमहाराजांची एक किरकोळ देहयष्टी होती. झिजलेल्या खडाव व हातात झाडू असलेली व्यक्ति नितीमत्तेच्या जोरावर संपूर्ण मंत्रिमंडळ वाकवायची. एकही मंत्री गाडगेबाबा समोर खुर्चीत बसून बोलत नसे. पहिल्यांदा बाबांना खुर्चीवर बसवायचे मगच मंत्रीमहोदय खुर्चीत बसत.
पार्वतीबाई माळी नावाच्या निरक्षर बाईने गावात दारूबंदी विरूद्ध आंदोलन करून – दारूचे धंदे उध्वस्त केले. पार्वतीबाईला पत्रकारांनी विचारलं, गुंडाविरूध्द आवाज उठवलास, तुझ्या जिवाला धोका होऊ शकतो. तुला भिती वाटली नाही का ? तेव्हा आपला पदर सावरत पार्वतीबाई म्हणाली, साहेब त्यात काय भ्यायचे ? “जिथ आहे नीती तिथे कसली भिती ।”
भगवान बुद्ध म्हणतात, तुम्ही आजारी पडलात तर सर्व संपत्ती खर्च करून बरे व्हा, तुमचा एखादा अवयव तोडावयाची वेळ आली तर तोडून टाका पण शरीर वाचवा, कारण शरीर व मन हे एकत्र असून त्याच्या साह्याने मुक्तीपर्यंत जाता येते. पण जर तुमचे शील म्हणजे सद्गुण आणि नितीमत्ता भंग होत असेल तर जीव गेला तरी चालेल पण शील तोडू नका. तो सुखाचा पाया आहे. म्हणून सद्गुण व नीतीमान जीवन जगण्यासाठी एकदा का होईना ‘विपश्यना’ शिबिराचा लाभ घ्या. पाप कर्मापासून दूर रहा कर्म हे कर्मफल दिल्याशिवाय नष्ट होत नाही.
‘तू लाख करे चतुराई ।
कर्म का खेल मीटे ना रे भाई।’
आपला परिवार नागेबाबा परिवार
-डॉ. दत्ता कोहिनकर
(सुखी जीवनाची गुरुकिल्ली अर्थात मनाची मशागत या पुस्तकातून)
