सकाळच्या रम्य प्रहरी केंद्रात फिरत असताना आचार्य सत्यनारायण गोएंकाजींचा एक दोहा कानावर पडला,
जिसके मन में प्रज्ञा जगी होय विनम्र विनित।
जिस डाली को फल लगे झुकने कि है रीत।।
मला महात्मा गांधीची आठवण झाली. एकदा गांधीजी चार्ली चॅप्लीनला भेटण्यासाठी त्यांच्या छोट्या घरी गेले. भेटून झाल्यावर गांधीजींनी चॅप्लीनला विचारले. “आमच्या प्रार्थनेची एक झलक तुम्हाला पहायची आहे का?” चॅप्लीनने उत्तर दिले की त्याचं घर खूपच लहान असून प्रार्थना करणार कोठे? गांधीजी म्हणाले तुम्ही सोफ्यावर बसा, आम्ही खाली बसून प्रार्थना करू. त्याप्रमाणे त्यांनी केलं सुद्धा. पुढे चॅप्लीनने लिहलंय, गांधीजी व त्यांच्या साथीदारांना माझ्या पुढेच जमिनीवर बसण्याची बिलकुल लाज वाटली नाही पण मी मात्र त्यांच्यापुढे वर सोफ्यावर बसून खाली पाहताना खजिल झालो होतो. खरोखर मित्रांनो आयुष्यात महत्त्कार्य करताना विनम्रता या गुणाचा विकास करावा लागतो. अहंकाराचा त्याग करावा लागतो. सिकंदरने जग जिंकले होते. मृत्यूपत्रात त्याने अंत्ययात्रेच्या वेळेस माझ्या हाताचे तळवे आकाशाकडे मोकळे दिसतील अशा पद्धतीने माझी अंत्ययात्रा काढा असा उल्लेख केला होता. मृत्यूपत्राच्या माध्यमातून सिकंदरने आपल्या सर्वांना एक संदेश दिला होता, “मी सिंकदर मी जग जिंकले पण खाली हाताने आलो होतो आणि खाली हातानेच परत चाललोय.” म्हणून कितीही पैसा, प्रतिष्ठा, सत्ता मिळवली तरी वृथा अभिमान बाळगू नका,नेहमी नम्र रहा.
“म्हणतात ना महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे वाचती” महापूराच्या विरोधात उभे राहणारे वृक्ष उन्मळून पडतात. याउलट नदीपत्रातील लव्हाळ्याची पाती सकाळच्या वेळी सुर्यकिरणांनी न्हाऊन निघतात. विनयशीलतेचे महिमा सांगताना बसवेश्वर विचारतात, गाय आपल्या पाठीवर बसणाऱ्यांना कधी दूध देईल का? ज्याला दूध हवे त्याने गाईच्या पायाशी बसावयास शिकले पाहिजे.
बहिणाबाई चौधरींच्या काही स्फुट ओव्या आहेत. एका ओवीत बाभळीचे पान केळीच्या पानाशी बोलते.
फाट आता टराटरा नाही दया तुफानाला।
हाले बाभळीचे पान बोले केळीच्या पानाला ।।
बाभळीचे पान तसे अगदी लहान, केळीचे पान तुलनेने महान सोसायट्याच्या वाराला केळीचे पान अडवू पाहते व आपला उर फोडून घेते. बाभळीचे पान वाऱ्याला कौतुकाने कुरवाळते त्यामुळे वारा त्या लहानग्याला खांद्यावर घेऊन नाचतो. संत तुकाराम महाराज म्हणतात, “लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा ।”
हे लहानपण म्हणजे आपले अवमूल्यन नव्हे तर हे असते सभ्यतेचे सार. सभ्यतेमुळे माणूस संयमी शांत आणि नम्र होतो. विद्या विनयेत शोभते. खरोखर निसर्गाला नम्रतेचे आसन आवडते. नम्र माणसाच्या मागे सगळ्या शुभशक्ती उभ्या राहतात. परंतु आधुनिक युगात बऱ्याचदा सद्गुणी माणसाला लोक त्रास देतात. त्यावेळी तुम्हाला जशाच तसे उत्तर देता आले पाहिजे. मेणाहून मऊ असणारे विष्णुदास प्रसंगी वज्राहून कठोर होत असतात असे तुकाराम महाराजांच्या अभंगात वाचावयास मिळते. त्यामुळे वेळप्रसंगी वज्रासारखे कठोर व्हायला शिकले पाहिजे मात्र त्यावेळी अंर्तमनात प्रचंड मंगलमैत्री असू द्या व विनम्रता म्हणजे लाचारी किंवा दुर्बलता नसून निष्कपट, निष्कलंक, निराग्रही सरलता, मनाची शुद्धता आहे ही विनम्रता आचरणात आणण्यासाठी मनाला ध्यानाची जोड द्या.
आपला परिवार नागेबाबा परिवार
-डॉ. दत्ता कोहिनकर
(सुखी जीवनाची गुरुकिल्ली अर्थात मनाची मशागत या पुस्तकातून)
