लग्नानंतर काही महिन्यातच एकत्र कुटूंबात होत असलेल्या वादामुळे विजयची पत्नी माहेरी निघून गेली. तिला चांगल्या पगाराची कायम स्वरूपी नोकरी असल्यामुळे तिने व तिच्या घरच्यांनी विनयचा प्रचंड अपमान करून नाते संपुष्टात आल्याचे विनयला सांगितले.
या गोष्टीचा विनयच्या मनावर तीव्र आघात झाला. त्याने स्वतःची मालमत्ता, घर, दुकान वगैरे भावाच्या ताब्यात दिले व विनय नोकरीच्या जवळच घर भाड्याने घेऊन राहू लागला. समाजसेवा व अध्यात्मात त्याने मन रमवले.
नंतर विनयच्या स्वकष्टार्जित कमाईने उभारेल्या घरावर भावाने मालकीहक्क सांगितला व विनयला तेथे येण्यास देखील प्रतिबंध केला. मालमत्तेच्या वादात बहिणीने देखील विनयला अपमानास्पद वागणूक दिली. विनयची मालमत्ता बळकावण्याचा प्रयत्न करून रक्ताच्या नात्यांनी त्याला असहाय केले. विनय एकटा पडला. जीवन एवढं अनित्य आहे का? हा प्रश्न पडलेल्या विनयला मी थरमॅक्स कंपनीच्या अध्यक्षा अनु आगा यांना पतिनिधनानंतर वर्षभराच्या आतच तरूण मुलाचा दुर्देवी अपघाती मृत्यू, आठवड्यातच त्यांच्या सासूचा व आवडत्या श्वानाच्या मृत्यूचा घटनाक्रम सांगितला व अशा कठिण परिस्थितीत एकाकी पडलेल्या अनु आगा सकारात्मक विचार व विपश्यना ध्यान साधनेच्या साह्याने न खचता उभ्या राहिल्या व आंतरराष्ट्रीय पारितोषिक विजेत्या उद्योगपती म्हणून उदयास आल्याची माहिती सांगितली आपण काय गमावले यापेक्षा आपल्याकडे आता काय आहे व आपण काय करू शकतो यावर संपूर्ण लक्ष्य केंद्रीत करावयास सांगितले व ध्यानधारणा करण्याचा सल्ला देऊन त्यांच्याकडे आज असलेल्या महत्वपूर्ण सकारात्मक गोष्टींची यादी लिहण्यास सांगितली.
पाच आकडी पगाराची नोकरी, स्वतःचे घर, उत्तम आरोग्य, शेकडो मित्र मैत्रिणी, मानसन्मान, सामाजिक प्रतिष्ठा, अध्यात्मिक बळ, बँक बॅलन्स, चार चाकी, सबळ व निर्मळ मन, अशा अनेक गोष्टींची यादी लिहिल्यावर विनयला स्वतःची श्रीमंती समजून आली व मनाने उभारी घेतलेल्या विनयला मी त्याच्या कारमध्ये ऐकण्यासाठी एक सीडी दिली ज्यात गाण्याचे बोल होते,
“रूक जाना नही, तू कही हार के,
काँटो पे चलके मिलेंगे, साये बहार के।”
खरोखर मित्रांनो आपल्या अवतीभोवतीच्या जगात आर्थिक कमकुवतपणा, शारिरिक आजार, अपंगत्व, प्रियजनाचा मृत्यू, प्रेमभंग, घटस्फोट, वैवाहिक जीवनातील वादळे, अपमान, फसवणूक, प्रियवियोग, अप्रियसंयोग, वृध्दापकाळ, एकाकीपणा अशा अनेक समस्या आहेत. श्रीसमर्थ रामदास स्वामी म्हणतात.
“जगी सर्व सुखी असा कोण आहे,
विचारी मना तूचि शोधूनी पाहे।”
म्हणून दूःखाला पूर्ण ताकदीनिशी सामोरे जा. त्यासाठी शरीर व मनाची सबलता वाढावा. सकारात्मक विचारांची त्यास जोड द्या. मंगेश पाडगांवकरांनी म्हटल्याप्रमाणे “पेला अर्धा भरला की सरला ?” हे आपल्याच मानण्यावर
आहे.
पोलिओमुळे अपंग झालेल्या एका मुलीने पायातली शक्ती वाढवण्यासाठी वयाच्या पाचव्या वर्षी पोहायला सुरवात केली. जबरदस्त इच्छाशक्तीच्या जोरावर तिने १९५६ मध्ये मेलबर्न येथील ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळविले. शेली मान हे तिचं नाव. मित्रांनो विनयसारखा असा प्रसंग कोणाच्याही जीवनात येऊ शकतो. परवाच विनय भेटला होता. ध्यानधारणेमुळे त्याला खूप लाभ झाला होता. आनंदी व प्रसन्न विनयला पाहून मी त्याच्या हातात हात देत म्हटले – विनय कसा आहेस ? त्यावेळेस विनय कृतज्ञता व्यक्त करत म्हणाला, सर सगळा खेळ विचारांचाच असतो, सकारात्मक विचार व ध्यानधारणेमुळे माझी हिम्मत खूप वाढली. आता माझ्यासारख्या अनेक लोकांना दुःखमुक्तीचा रस्ता दाखवण्यासाठी मी रात्रंदिवस कार्य करायचं ठरवलं आहे.
त्यावेळेस मला खालील गाण्याचे बोल आठवले,
“सुनके तेरी पुकार -संगे चलने को कोई,
हो ना हो तैयार -हिम्मत ना हार,
चल-चला चल फकीरा चल चला चल ।”
खरोखर मित्रांनो
“कोण म्हणतं जीवनात प्रत्येक वेळी काटेरी डंख आहेत, डोळे उघडून बघा प्रत्येकाला उडण्यासाठी फुलपाखरासारखे पंख आहेत.”
श्री श्री रविशंकरजी म्हणतात,
“जिंदगी छोटी है -हर बात में खुश रहो,
जो आज तुम्हारे पास नही-उसके याद में खुश रहो,
क्यों कलकि चिंता करते हो- अपने आज में खुश रहो,
क्यो चाहते हो -हर वक्त साथ किसीका,
कभी -कभी अपने आप में खुश रहो,
जिंदगी छोटी है -हर बात में खुश रहो ।।”
आपला परिवार नागेबाबा परिवार
-डॉ. दत्ता कोहिनकर
(सुखी जीवनाची गुरुकिल्ली अर्थात मनाची मशागत या पुस्तकातून)
