अभय आणि शिल्या दोघे सुसंस्कृत प्रेमळ सुशिक्षित पती-पत्नी अभय मला ऑफिसवर भेटायला आला होता. बोलतांना खूप वैतागलेला वाटत होता शिल्पापासून खूप मानसिक त्रास होतो. सर तिला नीट समजावून सांगा अशी विनवणी त्याने माझ्याजवळ केली. दोघांशी बोलल्यानंतर लक्षात आले शिल्पा – अभयची खूपच काळजी घेत होती. अभयला कामानिमित्त बऱ्याचदा बाहेरगावी जावे लागे. शिल्पा त्याला विमानाचं तिकिट घेतलं कां ? कुठे उतरणार आहेस ? तिथला पत्ता घेतला का ? ते हॉटेल चांगले आहे का ? रूमाल – पाकिट घेतलं का ? पाकिटात एटीएम नीट ठेवले का ? मोजे – औषधे – कानटोपी घेतली का ? अशा अनेक प्रश्नांनी बेजार करून सोडत असे. शिल्पा त्याला लहान बाळासारखेच वागवतेय असे अभयला मनोमन वाटे. ती त्याच्यावर अविश्वास दाखवतेय, ती त्याला लहान बाळच समजते असे त्याला वाटे. शिल्पाच्या बडबडीने, अति काळजी घेण्याने अभय पूर्णतः वैतागला होता. खरोखर मित्रांनो, आपल्याला काय करावेसे वाटते यापेक्षा आपल्या जोडीदाराला काय हवे आहे यावर विचार करून त्याच्या स्वाभिमानाला तडा जाऊ न देता मदत करणे महत्वाचे आहे.
अलीकडे लहान मुलेही आई जास्त सूचना करू लागली की, आई तू चूप बैस – आम्हाला कळतंय, जास्त शिकवू नकोस असे उद्धटपणे बोलू लागली आहेत.वरील घटनेत स्त्री ही निसर्गतः खूप काळजीवाहू असते हे अभयला माहित असणे व पुरूष हा स्वाभिमानी व अहंकारी असतो हे शिल्पाला माहित असणे गरजेचे होते.
जेव्हा स्त्री पुरूषावर प्रेम करते तेव्हा पुरूषांच्या सर्वांगीण वाढीसाठी ती पूर्णतः स्वतःला झोकून देते ती त्याला सारख्या सुचना करू लागते तिला वाटते ती जणू त्याचे संगोपनच करत आहे तर पुरूषाला वाटते ती त्याला आपल्या मुठीत ठेवू पाहतेय स्त्री-पुरूषांच्या जडणघडणीत निसर्गतः फार मोठा फरक असतो. तो समजून घेणे गरजेचे आहे.
स्त्रियांना राजकारणात फारसा रस नसतो शिक्षणाची त्यांना अधिक आवड असते. स्त्रियांना अपशब्द उच्चारणे आवडत नाही. घरातील सर्वांची काळजी घेणे हे त्या आपले कर्तव्य समजतात. पुरुष कोणत्याही क्षणी घराबाहेर पडू शकतात स्त्रीला हे शक्य नसते. पुरुषांची अनेक कामे स्त्रिया करू इच्छीतात. मात्र पुरूषांना स्त्रियांची कामे करावयास कमीपणा वाटतो पुरूष थोडे आजारी पडले कि औषधोपचार आरंभ करतात, स्त्रिया मात्र अनेक आजार अंगावर काढतात. स्वार्थ हा भाव त्यांच्या मनात मूळ धरू शकत नाही. सेवा व समर्पण ही त्यांची नैसर्गिक वृत्ती असते. पुरूष विश्रांती घेण्यासाठी आतुर असतात. स्त्रियांना वेळ मिळाला तरी त्या काही ना काही काम करतच राहतात. विश्रांतीकडे कानाडोळा करतात. पुरूष आपल्या बँकेच्या खात्यावर लक्ष ठेवून असतात. याउलट स्त्री ही भरलेल्या घरालाच बँक समजत असते. स्त्रियांना खूप बोलावेसे वाटते. पुरूषांच्या तिप्पट त्या बडबड करत असतात व हे नैसर्गिकरित्या घडत असते. पुरुषांच्या प्रेमाच्या अविष्काराची सुरवात शरीराकडून सुरू होते. तर स्त्रिच्या प्रेमाचं अभिव्यक्तीकरण मनापासून सुरू होऊन शरीरापाशी थांबते. पुरूषांचा स्वभाव हा खोडकर व खेळकर असतो. वेळ मिळेल तेव्हा त्यांचा हा स्वभाव ते प्रकट करत असतात. तर स्त्रियांचा स्वभाव हा कायमस्वरूपी काळजी करणारा असतो. त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येकाची त्या काळजी करत असतात. स्त्रियांच्या भाषेत तुलनेने सौम्यता, शालीनता, आर्जव अधिक असते. घराबाहेर पडून वेळ उगीचच वाया घालवणे त्यांना आवडत नाही. पुरूष काय वाटते ते स्पष्ट बोलतात. स्त्रीया आपल्या भावना व्यक्त करताना स्पष्टपणे न सांगता अप्रत्यक्षपणे व्यक्त करतात.
स्त्रियांना आपल्या भावना व्यक्त करण्याची पण भिती वाटते म्हणून प्रत्येक गोष्टीबद्दल त्या ‘ठिक आहे’, ‘छान आहे’, असे म्हणण्याचा प्रयत्न करतात. स्त्रिया स्वतःच्या गरजा नाकारतात. कुटूंबात संघर्षाची ठिणगी पडू नये म्हणून त्या स्वतःच्या भावनांना दडपून टाकतात. अनेक पती-पत्नी एकाच मुद्यावरून वादविवादाला सुरूवात करतात आणि पाचच मिनिटात ते बोलण्याच्या पद्धतीवरून भांडू लागतात.
मुळातच स्त्री व पुरूष यांनी एकमेकांच्या नैसर्गिक स्वभावाचा अभ्यास केल्यास कुटूंब व्यवस्थेत शांतता नांदू शकते. म्हणून स्त्रियांनी पुरूषांना न मागताच सल्ले देणे, त्याच्यावर नियंत्रण ठेवणे, त्याच्याबदद्ल सारख्या तक्रारी करणे, त्यांना सारखं सुधारण्याचा प्रयत्न करणे आणि विचारपूस करणे व पुरूषांनी स्त्रीचे म्हणणे पूर्ण न ऐकणे, स्त्रिला उगीचच उपदेश देणे, अस्वस्थतेला तुच जबाबदार आहे असे वक्तव्य करणे, तिच्या भावना व गरजांना दुय्यम स्थान देणे, तिला कमी लेखणे, कटाक्षाने टाळून दोघांनीही एकमेकांना समजुन घेणे आवश्यक असते. त्याचे व तिचे नाते हे एखादया बगीच्याप्रमाणे असते. जर ते हिरवेगार रसरशीत व्हावे असे वाटत असेल तर त्या बगीच्याला नियमितपणे समजूतदारपणाची मशागत करून अनावश्यक तण बाजूला सारून प्रेमरूपी फुल उमलण्यासाठी दोघांनी पुढाकार घ्यायला हवा तरच दोघांचेही जीवन आनंदी हाईल.
आपला परिवार नागेबाबा परिवार
-डॉ. दत्ता कोहिनकर
(सुखी जीवनाची गुरुकिल्ली अर्थात मनाची मशागत या पुस्तकातून)
