रामभाऊंनी काबाडकष्ट करून मुलामुलीची शिक्षणं व लग्नं केली पत्नीच्या मृत्यूनंतर रामभाऊ मनाने खूप खचले. अशातच त्यांना अर्धांगवायूचा झटका येऊन किचितमे अपंगत्व आले. यातच मधुमेहाने त्यांना बेजार केले होते. या आजारपणात मुलगा व सुनबाईंनी त्यांच्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केले. घरातील अडगळ म्हणून त्यांना वागवले जाई. वेळेवर चहा-न्याहारी पण मिळत नसे. मुलाने गोड बोलून सर्व मालमत्ता स्वतःच्या नावावर अगोदरच करून घेतली होती. परावलंबीत्व व अवहेलना, एकटेपणा सहन न झाल्याने रामभाऊंना नैराश्य आले होते.
रामभाऊंनी स्वतःकडे आयुष्यभर दुर्लक्ष करून सगळ्यांसाठी जीवाचे रान केले होते. रामभाऊंसारखी वेळ कोणावरही येऊ शकते म्हणून मित्रांनो घरातील मंडळीच्या प्रगतीसाठी, सुख-समाधानासाठी झटताना स्वतःकडे दुर्लक्ष करू नका. गटांगळ्या खात बुडणाऱ्या बोकडाला दोन पहिलवानांनी वाचवले व बुडताना तू काय ओरडत होतास असे विचारले. त्यावेळेस तो म्हणाला “दुनिया बुडाली-दुनिया बुडाली” म्हणजेच मी बुडलो की दुनिया बुडाली. म्हणून स्वतःवर प्रेम करा. रोज शरीरासाठी व्यायाम करा. प्राणायामाला विशेष महत्व दया. दीर्घश्वसनाने मन शांत व सबल होते. आपला उत्साह, आनंद व रोगप्रतिकारक्षमता यांचे श्वसनाशी असणारे नाते समजून घ्या.
‘पाणी’ हे जीवन आहे. रक्ताची द्रवता सांभाळणे व विषारी द्रव्यांचा निचरा घडवणे हे काम पाणी करत असते, रोज भरपूर पाणी प्या. फळे, भाज्या, धान्य यातील सत्व विविध प्रक्रियांनी संपुष्टात न आणता त्याचा आस्वाद घ्या, प्रकृतीनुसार आहार घ्या. रक्ताभिसरण नीट व्हावे यासाठी दहा सूर्यनमस्कार रोज घाला. व्यायाम व आसने यात सातत्य ठेवा. थोडा वेळ पायघडी घालणे, पाय उंचावर ठेवणे, पडल्या पडल्या सर्व रा ताणून धरणे, शवासन करणे हे आपल्याला सहजशक्य असते त्याचा आळस करू नका.
दिवसभर उभ्याने सर्व व्यवहार चालू असताना त्यासाठी सायंकाळी विपरीतकरणी, सर्वांगासन, शीर्षासन करा झगमगता प्रकाश, रणरणत ऊन, जागरणे, टी.व्ही जास्त जवळून पाहणे टाळा भरपूर विश्रांती घ्या रोज कमीतकमी ६ तासांची झोप घ्या.
भरपूर हसा, हसण्यामुळे शरीरातील सकारात्मक उर्जा प्रवाहित होते हसताना विशिष्ट स्नायूंची हालचाल व स्नायूंना बसणारे धक्के यामुळे मानसिक ताण ओसरतो. आपले मित्र व मैत्रिणी यांच्याबरोबर सहलीला जा, भावभावना व्यक्त करा, नात्यात दृढता व पवित्रता आणा. माणसे ओळखायला शिका, समर्थ म्हणतात, “वाट पुसल्याविणा जाऊ नये। फळ ओळखल्याविणा खाऊ नये ।” आपले आवडते छंद जोपासा वेळावेळी वैद्यकीय तपासण्या करून घ्या एकाच व्यक्तीमध्ये किवा वस्तूमध्ये सर्वस्व शोधू नका. प्रेमाचे रूपांतर पाशात होऊ देऊ नका मनाच्या सबलतेसाठी रोज ध्यानाला वेळ काढा आपण आपले शरीर व मन सबल सशक्त व शुद्ध ठेवल्यास जीवनात उर्जारूपी चैतन्य स्फुरते शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याला घरातील सर्वांनी जरी दुर्लक्ष केले तरी एकटे आनंदाने जगता आलं पाहिजे, एवढी धनसंपदा स्वत. कडेच ठेवा पैसा हा दुःखनिवारण व रोगनिवारणासाठी कामाला येतो.
आपले घर बांधण्यापूर्वी आपण प्लॅन काढतो. मालमत्तेचा वारंवार तपशील तपासतो, कपडेलत्ते कसोशीने खरेदी करतो. मुलाबाळांच्या आयुष्याचे प्लॅन आखतो. पण स्वतः बद्ल कसलाच विचार करत नाही. घर कसे असावे, घरात किती लोक व कसे असावेत यापेक्षा आपण स्वत. शेवटच्या श्वासापर्यंत कसे असावे हे महत्वाचे आहे. म्हणून स्वतःवर लक्ष केंद्रीत करा. वरील गोष्टीतील रामभाऊंनी स्वतःवर सुरवातीपासून लक्ष केंद्रीत केले असते व स्वतःची तब्येत, मनाची सबलता, धनसंपदा व्यवस्थित जपली असती तर आज रामभाऊंना नैराश्य आले नसते. यातून योग्य बोध घ्या व स्वतः स्वतःला जपा.
आपला परिवार नागेबाबा परिवार
-डॉ. दत्ता कोहिनकर
(सुखी जीवनाची गुरुकिल्ली अर्थात मनाची मशागत या पुस्तकातून)
