दहा मित्र प्रवासाला निघाले होते. एकत्र प्रवासात मजा येत होती. त्यांना वाटेत एक नदी लागली नदी ओलांडणार कशी? त्यांनी एक युक्ती केली एकमेकांचे हात पकडून, परस्परांचा आधार घेत घेत त्यांनी पैलतीर गाठला परंतु पैलतीरी गेल्यानंतर त्यांपैकी एकाच्या मनात शंका आली की, आपण सारेजण नदी ओलांडून आलोत का? की आपल्यापैकी कुणी नदीतून वाहून गेला?
या शंकेने त्याला अस्वस्थ केले. तो चटकन पुढे झाला आणि त्याने सर्वांना मोजण्यास सुरुवात केली तीन-चार वेळा मोजले तरी नऊच। सर्वांनाच फार दुःख झाले. एकजण वाहुन गेला म्हणून सारे शोक करू लागले त्यांचा शोक ऐकून एका वाटसरूने त्यांची चौकशी केली.
त्यांनी शोकाचे कारण सांगताच त्याने सर्वांकडे पाहिले. बरोबर दहाजण होते. त्या दहांपैकी एकाला बोलावून त्याने परत मोजण्यास सांगितले. त्याने मोजले तर नऊच ! तेव्हा तो वाटसरू म्हणाला, ‘अरे, दहावा तूच आहेस’ स्वतःला मोजावयाचे विसरल्याने सारा घोटाळा होत आहे.
जीवनातल्या सर्व घोटाळ्यांचे कारण, स्वतःला विसरणे हेच असते. म्हणून समर्थ म्हणतात, ‘अहमात्मा हे। कदापि विसरो नये. स्वतःला कधीही विसरू नका. स्वतःवर प्रेम करा व जीवनाचा आनंद घ्या.
आपला परिवार नागेबाबा परिवार
-डॉ. दत्ता कोहिनकर
(सुखाचा पासवर्ड या पुस्तकातून)
