एकोपा…

राजेश व समीर आपल्या ग्रुपला घेऊन ट्रेकिंगला चालले होते. ट्रेक जंगलामधला होता. दोघेही आपापल्या ग्रुपचे टीम लिडर होते. चालता चालता राजेशला एका झाडाखाली रामफळ सापडले. भरपूर भूक लागल्यामुळे राजेश त्या रामफळावर ताव मारू लागला. रामफळ खूप गोड होते. समीरने त्याच्याकडे निम्मे रामफळ देण्याची मागणी केली. पण राजेशने त्याला हिणवले व त्याला थोडेही रामफळ दिले नाही. उलट तो हिणवत त्याला म्हणाला, ‘अरे तू खाल्लं काय आणि मी खाल्लं काय एकच ना?’ आणि तो कुत्सितपणे त्याच्याकडे बघून हसत हसत रामफळ फस्त करू लागला. सगळ्या विद्यार्थ्यांसमोर राजेशने समीरचा असा अपमान केल्यामुळे समीरला त्याचे खूप तीव्र दुःख झाले. अर्थात, राजेशच्या मनात समीरला दुखवायची अजिबात इच्छा नव्हती. पण राजेशच्या अशा वर्तनामुळे समीर मनोमन दुखावला गेला होता. ट्रेकिंग करत करत पुढे गेल्यानंतर बराच वेळाने समीरला एक पेराचे झाड दिसलं. त्या झाडाखाली पेर पडलेला त्याला सापडला. समीरने ते पेर उचलल, हे राजेशने पाहताच तो समीरला म्हणाला, ‘अरे ते पेर नाहीये, ते विषारी फळ आहे. खाऊ नकोस.’ पण मागच्या वेळेला राजेशने केलेल्या अपमानामुळे समीर चिडला होता. त्याने राजेशचे काही एक ऐकले नाही व त्याने मुद्दाम त्याच्यासमोर ते फळ खाणे चालू केले. शेवटी ते फळ विषारी असल्यामुळे त्याला उलट्या होऊ लागल्या. आणि त्याला विषबाधा झाली भयंकर उलट्या व त्रास होऊ लागल्यामुळे त्याला जवळच्या हॉस्पिटलमध्ये हलवावे लागले. परिणामी सगळ्या ट्रेकचा बट्ट्याबोळ झाला.
म्हणून मित्रांनो, एकोप्याने राहण्यातच गोडी असते. ज्या क्षणी आपण आपल्या लोकांना दुखावतो, त्यांना मानसिक त्रास देतो, त्या क्षणी आपल्या लोकांमध्ये बेबनाव निर्माण होण्याची दाट शक्यता असते. हा बेबनाव एकोप्याला मारत असतो. म्हणून नेहमी समोरच्याचा आदर करा, समोरच्याचा अपमान होईल असे वर्तन करू नका. तरच एकोपा टिकतो. कारण एकटा माणूस या पृथ्वीतलावर मोठे काम करू शकत नाही. त्यासाठी संघाची गरज असते.
भगवान बुद्ध म्हणतात, ‘एकमेकांवर प्रेम करणारा, एकमेकांचा आदर करणारा, एकमेकांना समजून घेणारा पडत्या काळात एकमेकांना साथ देणारा, एकमेकांच्या प्रगतीसाठी झटणारा असा संघ नेहमी पुढे जातो.’ त्यामुळे एकोपा टिकवण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्या…

 

आपला परिवार नागेबाबा परिवार

-डॉ. दत्ता कोहिनकर

(सुखाचा पासवर्ड या पुस्तकातून)

error: Content is protected !!