।। व्यक्तिमत्त्व ।।

व्यक्तिमत्त्व हे फक्त सौम्य आचरणातून, वागण्यातून दिसते व विकास पावते असे नाही. काही व्यक्ती कडक आचरण, शुद्धता व शुचिर्भूतपणा पाळतात. अशा व्यक्तीचे बोलणे गोड, प्रासादिक व रसाळ असते व ते तासन्तास श्रवण करावेसे वाटते. उदा. श्रीशंकराचार्यांचे वागणे व बोलणे शुद्ध व पवित्र असते. प्रत्यक्ष भगवान शंकराचा वास त्यांच्यात आहे असे जाणवते. त्यांना पाहिले की, मनात आदरभाव निर्माण होतो व दर्शन घेतल्यानंतर प्रसन्नता वाटते.

 

जर आचरण शुद्ध व कडक ठेवले तर वागण्यातून व्यक्तिमत्त्व निर्माण होते. अगोदर कर्तव्य लक्षात घ्या. ज्ञानदेवांनी स्वतःचे कर्तव्य समजून गीता उत्तमप्रकारे सांगितली. भगवंत मुखातून उच्चारलेली मूळ संस्कृतात असलेली गीता महाराष्ट्रातील सामान्य लोकांना कळणार नाही म्हणून अनेक उदाहरणे देऊन साध्या सोप्या मराठी भाषेत गीता समजावून सांगण्याचे महान कार्य केले म्हणून लोक ज्ञानदेवांना देव मानू लागले. तुकारामांनी साध्या सोप्या मराठी भाषेत रचलेले अभंग व गाथा अलौकिक ठरली. ते वेदांताचे सार आहे असे लोक मानू लागले. तुकाराम महाराज केवळ श्रीपांडुरंगाची पूजा करीत होते म्हणून श्रेष्ठत्वाला गेले असे नाही तर ते त्यांच्या श्रेष्ठ कृतीने व सेवेने श्रेष्ठत्वास गेले.

 

‘तत्त्वमसि’ या महान वाक्याचा अर्थ लक्षात घेतला पाहिजे. तुम्ही तुमच्या मनाचे पावित्र्य व उंची वाढवा. नेमके काय करायची गरज आहे हे लक्षात घ्या. हे जर समजले व कृती केली तर तुम्हाला कितीतरी पटीने समाधान मिळेल. ज्याने हे जाणले आहे त्याने इतर लोकांना सांगावे. ज्ञानाचा उपयोग दुसऱ्याला करून द्यावा. सत्कर्म करण्यास प्रवृत्त करावे. अशा रीतीने व्यक्तिमत्त्वाचा विकास होत राहतो. ज्याला अनुभव येतो तोच पुन्हा पुन्हा याविषयी तुम्हा लोकांना सांगतो. गुरुपरंपरा ही मानवी नसून ईश्वरी आहे आणि ईश्वरानेच हे धडे घालून दिल्यामुळे किंवा ईश्वरानेच ही परंपरा चालू ठेवल्यामुळे त्याचे अनुकरण केले तर सर्वसामान्य मानव हा महामानवसुद्धा होऊ शकतो.

 

                                                                                                            आपला परिवार नागेबाबा परिवार

 

लेखक – अज्ञात

error: Content is protected !!